दुष्काळाला उत्तर रोजगार हमी योजना


>> अश्विनी कुलकर्णी

आपल्या राज्यातील बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी कुटुंब आहेत आणि ही ती कुटुंबे आहेत की, ज्यांना रोजगार हमीची अनेक अर्थाने गरज आहे. दुष्काळात तर आहेच, पण एरवीसुद्धा आहे. दुष्काळात जर रोजगार हमी योजना सुरू ठेवली तर लोकांच्या हाताला काम मिळेल. सन्मानाने कमवलेल्या कमाईतून अन्नधान्याची खरेदी करून वर्षभर पोटाला पुरेसं अन्न तरी मिळवता येईल. आजच्या काळात तरी महाराष्ट्रात कोणी भुके झोपता कामा नये ही आपल्यावरची जबाबदारी आहेच. त्यामुळे रोजगार हमी योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पोहोचणे महत्त्वाचे ठरते.

आज जवळजवळ अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. नोव्हेंबर महिन्यातच आपल्या सरकारने दुष्काळ जाहीर केला. विविध शासन निर्णयांतून आपल्याला सवलतींबद्दल सांगण्यात आले, पण हे सर्व वाचताना प्रकर्षाने जाणवते ते हेच की, दुष्काळाचा सामना करण्यासाठी रोजगार हमी योजनेशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. रोजगार हमी योजना, जी चाळीस वर्षांपूर्वी दुष्काळातच सुरू झाली आणि आपल्या रोजगार हमी योजनेमुळेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना निर्माण झाली, त्या रोजगार हमी योजनेकडे महाराष्ट्र सातत्याने दुर्लक्ष करत आलेला आहे हे आपले दुर्दैव! दुष्काळ झाला याचा अर्थ शेतीचे उत्पन्न कमी झालेले आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक जिरायती शेती होते. त्यात उत्पन्न कमी झालेले आहे. म्हणजे घरातले अन्नही कमी आणि कृषीमालातून मिळणारी कमाईही कमी. मग जर हातात पैसा नाही तर पूर्ण वर्ष कसं करणार?

हा आपल्याकडील जिरायती शेती करणाऱया सर्वच कुटुंबांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपल्या राज्यातील बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी कुटुंब आहेत आणि ही ती कुटुंबे आहेत की, ज्यांना रोजगार हमीची अनेक अर्थाने गरज आहे. दुष्काळात तर आहेच, पण एरवीसुद्धा आहे. दुष्काळात जर रोजगार हमी योजना सुरू ठेवली तर लोकांच्या हाताला काम मिळेल. सन्मानाने कमवलेल्या कमाईतून अन्नधान्याची खरेदी करून वर्षभर पोटाला पुरेसं अन्न तरी मिळवता येईल. आजच्या काळात तरी महाराष्ट्रात कोणी भुके झोपता कामा नये ही आपल्यावरची जबाबदारी आहेच. त्यामुळे रोजगार हमी योजना प्रत्येक शेतकऱयाच्या घरी पोहोचणे महत्त्वाचे ठरते.

रोजगार हमीबद्दलचे काही मोठे गैरसमज महाराष्ट्रात आहेत, तेही मोडून काढणे गरजेचे आहे. रोजगार हमी योजना म्हणजे खड्डे खोदणे नि खड्डे बुजवणे असे मुळीच नाही. असे पूर्वीही नव्हते नि आताही नाही. रोजगार हमी योजनेतून सर्वात मोठय़ा प्रमाणात कामे ही कृषीशी निगडित, जलसंधारणाची आणि मृद्संधारणाची होतात. जलयुक्त शिवारातीलसुद्धा अधिकतर कामे ही रोजगार हमी योजनेतूनच केली जातात. त्यामुळे रोजगार हमी योजनेत पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे जे वेगवेगळे उपचार केले जातात, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही कामे या वर्षी तर हाताला काम देतातच, पण पुढच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी गावागावातून पाणी साठवण क्षमता वाढवतात. प्रत्येक गावातून छोटे बंधारे, शेततळी झाली, मृद्संधारणाची कामे झाली, वरच्या बाजूला पाणी अडवण्याची / जिरवण्याची कामे झाली तर त्यातून भूगर्भाची पातळी तर वाढेलच, पण पाणी साठवण्याची क्षमताही वाढते.

जेव्हा खरिपात पावसाचा ताण पडतो तेव्हा याचा खूप उपयोग होतो. पाऊस कमी झाला म्हणजे दुष्काळ असे फक्त नसून पाऊस हवा तेव्हा न होणे किंवा नको तेव्हा जास्त होणे यानेसुद्धा कृषी उत्पन्नात घट होते. खरिपात एकदम 10-12 दिवसांच्या पावसाचा ताण पडला तर मात्र गावातच जर पाणी असेल, तलाव असेल, तळे असेल, भूगर्भाचं पाणी वाढलं म्हणून विहिरीला पाणी असेल तर पीक वाचवण्यासाठी या पाण्याचा नक्कीच उपयोग करता येतो. म्हणून रोजगार हमी योजना ही दुष्काळात हाताला काम देऊन कमाई तर देतेच, पण त्याचबरोबर पुढच्या दुष्काळाशी सामना करण्यासाठी आपल्याला तयार करते.

मागच्या वर्षी डिसेंबरअखेरीस रोहयोची अधिक कामे निघाली होती. या वर्षी दुष्काळ आहे तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कामे कमी कशी काय? रोजगार हमी योजनेची कामे मागणी आली की, सुरू होतात हे नियमाप्रमाणे खरे असले तरी जेव्हा घरकुलाची, शौचालयाची कामे निघतात तेव्हा मागणीची वाट न बघता कामे काढली जातात. तसेच या वर्षी रोजगार हमीचे एक तरी सार्वजनिक काम स्थानिक प्रशासनाने स्वतःहून काढले पाहिजे. लोक कामावर येतील. मग त्यांची कामाची गरज किती आहे हे लक्षात येईल.

गेली कित्येक वर्षे रोजगार हमीतून एका कुटुंबाला एका वर्षात सरासरी 50 दिवसही काम मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. केंद्र शासनाकडून आपल्या राज्याला 100 दिवसांचा कामाचा निधी मिळू शकतो, तोसुद्धा आपण पूर्ण वापरत नाही आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे पूर्ण वर्षभर कामाची हमी आहे.

महाराष्ट्रातल्या 24 जिह्यांत 20 टक्क्यांपेक्षा जास्त लोक गरिबीत आहेत. द सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सेसप्रमाणे (2011) ग्रामीण महाराष्ट्रात 37 टक्के कुटुंबांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन शेती आहे आणि 44 टक्के कुटुंबांचे अंगमेहनत करून मजुरी कमावणे हे आहे. याचा अर्थ जी छोटी, जिरायती शेती करणारी कुटुंबे आहेत ती शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत आणि खरिपाच्या नंतर काम शोधणारीही आहेत. त्यांनाच गावात काम मिळाले नाही तर जवळच्या शहराच्या नाक्यावर येऊन उभे राहावे लागते. ग्रामीण भागातील गरिबी दूर झाली नाही, तर ती वाट शोधत शहरात येऊन पोहोचते. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी हे याचे एक सयुक्तिक उत्तर आहे.

([email protected])