मी पुलंचा चाहता

3

>> अतुल परचुरे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. खळखळून हसण्यास शिकवणाऱया पुलंच्या विनोदाला कारुण्याची झालर होती. मराठी साहित्याची बाराखडी जाणणाऱ्या या असामीने महाराष्ट्राच्या मनात कायमचं घर केलं. त्यांच्या व्यक्तिचित्रणात स्वत:ची कथा न शोधणारा वाचक विरळाच. 8 नोव्हेंबरपासून पुलंच्या जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होत आहे. त्यानिमित्त आपल्या लेखणीने अमरत्व साधलेल्या पुलंचे व्यक्तिमत्त्व उलगडणारे हे शब्दपुष्प…

पुलंचं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही. पुलंचा विनोद कळायला मराठी भाषेची बलस्थानं ठाऊक असायला हवीत. मला प्रामाणिकपणे वाटतं की, इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांना जर आपण थिएटरपर्यंत आणू शकलो तर त्यांनाही पुलंची नाटकं आवडतील. पण त्यांनी ‘व्यक्ती आणि वल्ली’ वाचलं असेल तर त्यांचा आनंद द्विगुणित होईल हे नक्की!

मी पुलंचा फॅन, चाहता. मला पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तक पूर्ण पाठ. मी माझ्या वेगवेगळय़ा नाटकांत मग्न होतो. त्या काळात ‘व्यक्ती आणि वल्ली’ रंगमंचावर आणण्याची चर्चा चालू होती. मला वाटलं त्यातल्या पुलंच्या भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी कोणाला तरी हा रोल मिळणार. मला या नाटकात रोल मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आणि मला निर्मात्याचा फोन आला, ‘तू व्यक्ती आणि वल्ली’मधील पुलंचा रोल करशील का?’ माझी पर्सनॅलिटी किंवा माझं बाह्य व्यक्तिमत्त्व तरुणपणाच्या पुलंसारखं काहीसं तेव्हा होतं. मला विचारण्यापूर्वीच निर्मात्याने पुलंनाच विचारलं होतं की, अतुल परचुरेंना ही भूमिका द्यायची का? पु.ल. लगेच ‘हो’ म्हणाले. त्यामुळे मी ही भूमिका करायला नकार देणं शक्यच नव्हतं. माझी पुलंशी ओळख नव्हती आणि त्या काळात त्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती, पण त्यांची विनोदबुद्धी तशीच तीव्र होती.

एकदा साहित्यसंघात ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग होता आणि पु.ल. नाटक बघायला आले होते. मी त्यात शामची भूमिका करत होतो. माझं काम त्यांना अतिशय आवडलं. ते म्हणाले, ‘तुझं काम पाहताना सतीशची आठवण होते,’ या त्यांच्या कॉमेंटमुळे खूप आनंद झाला. सतीश दुभाषी आणि पु.ल. यांच्या चेहऱयात साम्य होतं याची मला पुन्हा जाणीव झाली. तेवढय़ात ते खुर्चीवरून उठताना मी त्यांना हात द्यायला गेलो. ते चटकन म्हणाले, ‘नाही रे, हल्ली थोडा वेळ लागतो. कारण स्टार्ट घ्यावा लागतो.’ इतका त्यांचा विनोद उत्स्फूर्त होता. नाटक संपल्यावर त्यांनी पेटीवर ‘कृष्ण मुरारी’ गाणं वाजवून दाखवलं. त्यांनी माझं नाटक पाहणं, पेटीवर गाणं वाजवून दाखवणं हा मी माझा गौरव समजतो. रुपारेल कॉलेजच्या प्रांगणात चतुरंग संमेलनात पुलंना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. तिथे ‘व्यक्ती आणि वल्ली’चा प्रयोग व्हायचा होता. चार हजार प्रेक्षक समोर बसले होते. सुरुवातीला बिरजू महाराज आणि झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम होता. तो संपल्यावर रात्री अडीच वाजता नाटकाला सुरुवात झाली आणि नाटक पावणेसहाला संपले.

नंतरचा प्रयोग बालगंधर्वला होता. पु. ल. नाटकाला आले होते, पण पुलंची लोकप्रियता एवढी की, नाटक संपल्यावर पु.ल. मागच्या दारानं बाहेर पडणार होते, तर त्यांच्या दर्शनासाठी सारा प्रेक्षक गेला. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे दोनशे पन्नास प्रयोग झाले. खरं तर ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक एक ललितगद्य आहे. त्यात पुलंनी एकूण अठरा व्यक्तींवर लिहिलं. त्यातल्या काहीच व्यक्ती आणि वल्ली आम्ही नाटकाचं रूपांतर देऊन सादर केल्या. आपल्याला दहा-पंधरा माणसांचे प्रकार शोधून सापडत नाहीत, पण पुलंनी ‘व्यक्ती’मधल्या निवडलेल्या ‘वल्ली’, किती ग्रेट शब्दकळा! अजूनही ‘व्यक्ती आणि वल्ली’ वाचलं किंवा ऐकलं तर फ्रेश वाटतं हीच त्याची गंमत आहे.

ज्याला हायलाइट म्हणता येईल अशी माझ्या आयुष्यातील न पुसली जाणारी आठवण म्हणजे माझं लग्न ठरलं होतं. पहिली पत्रिका गणपतीला ठेवली. दुसरी पुलंना द्यायला पुण्याला गेलो. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना लग्नाला येणं शक्य होणार नाही माहीतही होतं. त्यांना पत्रिका दिली. त्यांनी मला ‘युवराज’ अशी हाक मारली आणि म्हणाले, ‘प्रकृती बरी असली तर मी लग्नाला नक्की येईन.’ आणि आश्चर्य म्हणजे, लग्नाच्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचा फोन आला म्हणाले, ‘मी येऊ शकणार नाही, पण इथूनच म्हणतो ‘नांदा सौख्यभरे’.

त्यांचं ‘असा मी असामी’ हे फॅण्टास्टिक पुस्तक आहे. त्यात नाटकीय प्रसंग जास्त आहेत आणि त्यातली कॅरेक्टर्स गडद आहेत. धोंडोपंत हे पात्र पुलंच्या जवळ जाणारं आहे. पण ‘असामी असामी’ मला करता आलं नाही याची मला खंत आहे.

पुलंनी माझं ‘नातीगोती’ हे नाटक पाहिलं होतं. मला ते ओळखत होते. ‘व्यक्ती आणि वल्ली’च्या निमित्ताने त्यांच्या माझ्या भेटी झाल्या; पण हक्काने गप्पा मारायला जाऊन त्यांना त्रास द्यावा हे मला योग्य वाटलं नाही. तेव्हा आजारपणाचा त्रास चालू झाला होता. ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकाचा पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त पुण्यात प्रयोग होता. मी शामचं काम करत होतो आणि माझी पत्नी सोनिया गीताचं काम करत होती. पु. ल. नाटकाला आले आणि म्हणाले, ‘मुद्दाम आलो. त्या त्या वयातील माणसं ते ते रोल करत आहेत.’ या वाक्याला अर्थ होता. कारण शामचं काम 50-55 वयाचा कलावंत करायचा. नाटकातल्या शामचं वय 20-25 वर्षं होतं. मी त्यावेळी 25 वर्षांचा होतो म्हणून मला ही कॉमेंट फार आवडली. ‘व्यक्ती आणि वल्ली’ आम्ही झी टीव्हीसाठी मालिकेच्या स्वरूपात केलं. तेथे आम्हाला नंदा प्रधान, भैया नागपूरकर इत्यादी व्यक्ती आणि वल्ली घेता आल्या. नंदा प्रधानची भूमिका सचिन खेडेकरने केली होती. व्यक्ती आणि वल्लीच्या (मालिकेचा आणि नाटकाचा) दिग्दर्शक होता चंद्रकांत कुलकर्णी. त्याला नाटकांची उत्तम जाण आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक रेव्हू फॉर्ममधे आहे. तेव्हा त्याला निवेदनाची जोड द्यायला हवी हे त्यानं जाणलं. चंद्रकांत कुलकर्णी मला म्हणाला, ‘तुझ्या खांद्यावर कॅमेरा आहे. तू शूट करून दाखवायचं.’ म्हणजेच मला दोन पातळय़ांवर काम करावं लागलं. एक म्हणजे, त्यातून बाजूला होऊन नाटकातलं लेखकाचं पात्र होऊन वावरणं हा एक वेगळाच आनंद होता. लोक मला विचारत, पाठांतराचा त्रास होत नाही का? कसा होणार? मुळात मला ‘व्यक्ती आणि वल्ली’ पाठ होतंच आणि पुलंनी मला काम करायला सांगितलं होतं हा सगळा अत्यंत भाग्याचा, आनंदाचा सुवर्णयोग होता.

दुर्दैवाने पुलंचं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही. पुलंची भाषा अलंकारिक नाही, पण त्यांचा विनोद कळायला मराठी भाषेची बलस्थानं ठाऊक असायला हवीत. मला प्रामाणिकपणे वाटतं, इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं, जर आपण त्यांना थिएटरपर्यंत आणू शकलो तर त्यांनाही पुलंची नाटकं आवडतील. पण त्यांनी ‘व्यक्ती आणि वल्ली’ वाचलं असेल तर त्यांचा आनंद द्विगुणित होईल हे नक्की!

पुलंची पुस्तकं वाचायला सुरुवात केली की, अगदी सहजपणे त्यात गुंतून जातो. आपण जे साहित्यविश्व अनुभवत आहोत त्याचा अभिमान वाटू लागतो. परंतु पुढची पिढी या सगळ्याला कुठेतरी मुकणार आहे, याची जाणीव होत राहते. त्यांच्यापर्यंत हा साहित्याचा वारसा पोहोचला पाहिजे असंही वाटतं. पुलं म्हणा किंवा आपले इतर साहित्यिक त्यांचे साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयोगशील प्रयत्न केले जातात. मराठी साहित्य आणि भाषा याची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक मान्यवर साहित्यिक, लेखकांनी ती समृद्ध केली आहे. साहित्यामधील विविध प्रकार त्यामधून आपणासमोर आले आहेत. या साहित्यप्रकारात खऱ्या अर्थाने सहज, निखळ विनोद मांडणाऱ्यांपैकी पु.ल.देशपांडे होते. त्यांच्या नर्म विनोदी लेखनाने रसिक वाचकाच्या मनाला भुरळ घातली आणि यापुढेही ही जादू अशीच होत राहील. असेच वाचकांना मोहवून टाकणारी दुसरी असामी म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. या दोन्ही महान साहित्यिकांच्या विविध साहित्य प्रकारचे अर्थात कलाकृतीचे संकलन करून एक विशेष मनोरंजनाचा खास कार्यक्रम आम्ही सादर करतो. ’आम्ही आणि आमचे बाप’ हा कार्यक्रम काही महिन्यांपासून सादर करत आहोत. एक अभिनेता वा कलाकार म्हणून या महान कलाकारांना वाहिलेली ही एक आदरांजली आहे.

पुलंच्या स्मृतीला प्रणाम!

(लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)