गतिमंदत्व-निदान, उपचार आणि संगोपन

>> अवधूत सहस्रबुद्धे

गतिमंदत्व आहे याचे अचूक वैद्यानिक निदान हिंदुस्थानात साधारण १९९५ ते २००० यादरम्यान होऊ लागले. ‘राष्ट्रीय मानसिक अपंगत्व संस्था’ यांनी एक पद्धतशीर प्रक्रिया आणि तपासणीची कार्यपद्धती विकसित करून अनेक प्रायोगिक चाचण्या आणि तपासक्रम उपलब्ध केला आहे. त्यानुसार जन्मपूर्व, नवजात आणि जन्मानंतर केल्या जाणाऱया निदान कार्यपद्धती समाविष्ट आहेत.

रक्ततपासण्या, अल्ट्रासोनोग्राफी, मातेच्या उदरपोकळीतून काढलेल्या द्रवाची चाचणी, अर्भकाची आलेखीय तपासणी, उपजत दोष चाचणी इत्यादी प्रायोगिक तपासण्या या जन्मापूर्वी केल्या जातात. जन्मानंतरसुद्धा अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात ज्याद्वारे नवजात मुलात काही मानसिकदृष्टय़ा संशयास्पद त्रुटी आढळल्यास पुढील उपचार ठरवता येतात.

जन्मानंतर साधारण एक महिना ते ३६ महिन्यांपर्यंत मुलाच्या वाढीबद्दल केल्या जाणाऱया तपासण्यांची शास्त्रोक्त यादी आणि त्यांचा घटनाक्रम हासुद्धा या संस्थेमार्फत पालकांना आणि वैद्यकीय तज्ञांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक पद्धती आणि प्रक्रिया वापरून गतिमंदत्वाची तपासणी जन्मानंतर लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करता येतात.

प्रतिबंध
गतिमंदत्व येऊ नये म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारपद्धती आज अस्तित्वात आहेत. हे साधारणपणे तीन स्तरांमध्ये केले जातात.
प्राथमिक – प्रकटीकरण प्रतिबंध.
माध्यमिक – स्वरूप, स्तर आणि प्रतिगमन प्रतिबंध.
सामाजिक – सामाजिक अलगवाद आणि कलंक यांचा प्रभाव रोखणे.

प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार हे जेवढे लवकर करता येतील त्यावर त्याचे यश अवलंबून असते. म्हणूनच त्यानुसार जन्मपूर्व, नवजात आणि जन्मानंतर केल्या गेलेल्या निनादानुसार योग्य ती पद्धती वापरता येते.

जन्मपूर्व – रक्त गटाची अनुरूपता, मातेचे पोषण व लसीकरण, संसर्गापासून संरक्षण, व्यावसायिक धोके इत्यादी.
जन्मावेळी – बाळंत होताना घ्यायची काळजी (स्वच्छता, संसर्गापासून संरक्षण, योग्य साधनांचा वापर इत्यादी.)
जन्मानंतर – प्रतिबंधात्मक चाचण्या, लसीकरण, रोगप्रतिकारक औषधे, मातेचा आहार आणि काळजी.
वरील सर्व गोष्टींची योग्य कार्यवाही केल्यास गतिमंदत्व टाळणे किंवा त्याचा स्तर / प्रतिगमन कमी करणे शक्य आहे.

प्राथमिक काळजी आणि हस्तक्षेप
गतिमंदत्वाच्या निदानात जर काही संशयास्पद मानसिक त्रुटी आढळल्या तर त्या मुलाची लवकर काळजी आणि वैद्यकीय हस्तक्षेप यांना अत्यंत महत्त्व आहे. पालकांचे प्रशिक्षण, मानसिक तयारी आणि पाठपुरावी मार्गदर्शन केल्यास गतिमंद मुलाची पुढील परिवर्तनाची शक्यता वाढते. गतिमंद व्यक्तीने आणि त्याच्या पालकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील क्रिया त्या परिस्थितीशी कशाप्रकारे अनुकूल केल्या आहेत आणि समाजातील इतर सदस्यांना याला कसे अंतर्भूत करून घेतले आहे यावर हस्तक्षेपाचे यश अवलंबून असते.

गतिमंद व्यक्तीला सुरुवातीच्या वर्षात एक कौटुंबिक व्यवस्थापन आवश्यक असते. त्याचे पालक, नातेवाईक, शेजारी, स्वकीय आणि सभोवतालच्या समाजाकडून सक्रिय सहभाग मिळाला तर एकप्रकारचा सहयोगकर्त्यांचा समूह तयार होऊ शकतो. ‘प्रयत्न आणि साधना’ या दोन्ही गोष्टींचा संगम आवश्यक आहे. याला जर योग्य मार्गदर्शन आणि व्यावसायिक सेवा मिळाली तर अशा व्यक्ती आपल्या विशेष
अपंगत्वाचे शिवधनुष्य पेलू शकतात.

संगोपन
गतिमंदत्वाचे प्रकार / स्तर / श्रेणी / वर्तणूक ही प्रत्येक गतिमंद व्यक्तीमध्ये भिन्न असते आणि त्यामुळे अशा व्यक्तींचे संगोपन ही एक अत्यंत अवघड, गुंतागुंतीची आणि सहनशील प्रक्रिया आहे. सानुकुलीत संगोपन म्हणजेच त्या विशिष्ट व्यक्तीच्या अवस्थेप्रमाणे त्याला दिल्या जाणाऱया काळजी आणि पुनर्वसनाची पद्धत वेगवेगळी असते. म्हणूनच अशा व्यक्तीच्या वयाच्या विविध टप्प्यात तज्ञांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने मार्गक्रमणा करावी लागते.

साधारणपणे संगोपनाची प्रक्रिया ही खालील क्रमाने आखली जाते.
– गतिमंद व्यक्ती कुठले कौशल्य / क्षमता आत्मसात करू शकेल याचा अंदाज.
– सध्या कुठल्या गोष्टी/ कार्य करण्यात अनुकूल प्रतिसाद आहे.
– पालकांना आपल्या मुलाने काय उद्दिष्ट साध्य करावे असे वाटते.
– गतिमंद व्यक्तीने कुठले विशिष्ट वर्तणूक सुधारणीचे टप्पे कधी पार करायचे.
– कुठली पद्धती अनुकूल / परिणामी असेल त्याचे नियोजन.
– परिणामांचे मोजमाप आणि सुधारात्मक कृती.

पुढील लेखात आपण बाल्यावस्था/पौगंडावस्था/ प्रौढावस्था यामध्ये संगोपन कसे करावे ते पाहू.

[email protected]