हिंदुस्थान, अफगाण, इराण विरुद्ध पाकिस्तान

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

हिंदुस्थान, अफगाणिस्तान व इराण हे तिन्ही देश पाकिस्तानी दहशतवादाने त्रासले आहेत. तेव्हा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे सार्वकालिक सत्य आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या विरुद्ध आपण अफगाणिस्तान आणि इराणच्या जोडीने एक नवीन आघाडी उघडू शकतो. त्याशिवाय पाकिस्तानातील न मिटवता येण्यासारखी जातीय दरी रुंद करणे, स्वतंत्र शियास्तानाच्या मागणीला बळ देत राहणे हिंदुस्थानच्या हिताचे आहे. पंजाबी नसलेल्या पाकिस्तानी लोकांच्या स्वातंत्र्य चळवळींना यश मिळवून देणेदेखील हिंदुस्थानच्या फायद्याचेच ठरेल.

पाकिस्तानातील सिंध, बलुचिस्तान आणि एनडब्ल्यूएफपी ही राज्ये गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. तिथे फुटीर चळवळी अस्तित्वात आहेत. या प्रांतांत तर पैशाने काहीही विकत घेता येऊ शकते अशी अवस्था आहे. अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील लष्करी कार्यवाहीदरम्यान भरपूर पैसा वापरला होता. हिंदुस्थानही छुपे युद्ध, बलुचिस्तान आणि एनडब्ल्यूएफपी या पाकिस्तानी प्रांतांत सर्व उपाय वापरू शकतो. एकदा का पाकिस्तानी सैन्य छुप्या युद्धात गुंतले आणि तालिबानी कारवायांत एनडब्ल्यूएफपीमध्ये गमावत आहेत तसे त्या सैनिकांचे प्राण जाऊ लागले की, त्यांना जम्मू आणि कश्मीरातील छुप्या युद्धाची पूर्वतयारी करणाऱया दहशतवाद्यांना आधार देणे थांबवावे लागेल. पाकिस्तानने हिंदुस्थानास आणि हिंदुस्थानी सैन्यास, अफगाणिस्तान, नेपाळ व बांगलादेशात आणि अगदी सोमालियातही लक्ष्य केलेले आहे. मग आपणदेखील त्यांना सर्वच देशांत याच पद्धतीने ‘लक्ष्य’ करू शकत नाही का?

हिंदुस्थानने पाकच्या हद्दीत घुसून ‘बालाकोट’ येथील दहशतवादी एअर स्ट्राइक केल्यानंतर इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची थेट धमकी दिली आहे. हिंदुस्थानप्रमाणे इराणही पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी कारवायांनी त्रस्त आहे. पुलवामा येथे पाकधार्जिण्या जैश-ए-महंमदने आत्मघाती हल्ला केला, त्याच दिवशी पाकिस्तानच्या भूमीतच सक्रिय असलेल्या जैश-ए-अदल या अतिरेकी गटाने इराण-पाक सीमेवर हल्ला करून इराणच्या 27 सैनिकांना ठार केले होते.

पाकिस्तानातूनच इराणविरोधी दहशतवादी कारवाया सुरू असतात, पण पाकिस्तान या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे इराण सरकार आणि सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. काही दिवसांतच पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या हल्यात 10 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. मागील काही वर्षांत हिंदुस्थान आणि इराणने दहशतवादविरोधी लढय़ातील सहकार्य आणखी मजबूत केले आहे. हिंदुस्थानच्या सैन्य तैनातीमुळे पाकिस्तानने इराण, पाकिस्तान सीमेवरील तैनात असलेले आपले सैन्य तिथून हलवून हिंदुस्थान सीमेकडे वळवले आहे. त्यामुळे इराण सीमा उघडी पडली आहे. याचा फायदा घेऊन आपण इराणच्या मदतीने पाकिस्तानविरुद्ध एक नवी आघाडी उघडू शकतो का?

याचबरोबर पाकिस्तानबाबत इराण व बलुची स्वातंत्र्यप्रेमी यांनीही आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला यापुढे अनेक आघाडय़ांवर लढावे लागेल. शक्यता आहे की, भविष्यात हिंदुस्थानही पाकिस्तानमधल्या अंतर्गत असंतोषाला सक्रिय पाठिंबा देऊन पाकिस्तानचा डाव उलटवू शकतो. पाकिस्तानमधल्या पंजाबी वर्चस्वावर नाराज असलेले अनेक गट पाकिस्तानमध्ये आहेत. इराण व अशा गटांच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तानला आपली शक्ती इतरत्रही वापरावी लागेल व त्या प्रमाणात हिंदुस्थानवरील ताण कमी होईल. हिंदुस्थानने असे प्रत्युत्तर द्यायचे ठरविले तर दहशतवादी संघटनांचा काटा काढण्यासाठी पुढे विमान हल्ला करण्याऐवजी अशा गटांचाही उपयोग करता येईल. एकदा हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर द्यायचे हे ठरले की, अनेक मार्ग दिसू लागतात. आजवर हिंदुस्थानने असा विचारच न केल्याने आपले पर्याय मर्यादित राहिले. एकदा पाकिस्तानप्रमाणे हिंदुस्थाननेही ते पर्याय स्वीकारले तर हिंदुस्थानची प्रतिघात करण्याची क्षमता कितीतरी अधिक आहे. त्यातून पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.

अफगाणिस्तान हे जागतिक महाशक्तींचे स्मशान बनले आहे. इस्लामच्या ज्या तलवारीने तीन महाशक्तींचा (ग्रेट ब्रिटनचा 19व्या शतकात अमेरिका आणि रशिया या महाशक्तींचा वर्तमान शतकात) पराभव केला, ती हिंदुस्थानचाही पराभव करू शकेल असे पाकिस्तानात आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सला (आयएसआय) वाटते. मात्र हिंदुस्थानी सैन्याने कश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर दहशतवाद जर वाढला तर त्याला तोंड देण्यास सैन्याची तयारी आहे.

पाकिस्तानचा शेजारी देश म्हणजेच अफगाणिस्तानबरोबरील व्यापार घटून निम्म्याच्याही खाली आल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता पाकिस्तानला अफगाणिस्तानने चांगलाच दणका दिला आहे. दोन्ही शेजारी देशांमधील द्विपक्षीय व्यापार कधीकाळी 5 अब्ज डॉलर्सवर होता, तोच आता थेट दीड अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला आहे. अर्थातच दोन्ही देशांतील व्यापारघटीमध्ये सर्वात मोठी भूमिका वठवली, ती हिंदुस्थानच्या सहकार्याने इराणी सागरकिनाऱयावर उभारण्यात आलेल्या चाबहार बंदराने!

अफगाणिस्तानची गुप्तहेर संस्था अतिशय सक्षम आहे. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तारेचे कुंपण बनवणे सुरू केले आहे. असे हिंदुस्थानने 2003 मध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर होते. म्हणूनच पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्याकरिता आपण अफगाणी गुप्तहेर संस्थांचा आणि अफगाणिस्तानचा वापर करू शकतो. त्यामुळे या सीमेवरील कमी झालेल्या पाकिस्तानी सैन्याचा फायदा आपण पाकिस्तानविरुद्ध अजूनही आघाडी उघडू शकतो. आपले मुख्य लक्ष्य असावे पाकिस्तानचे आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय.

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करून आपण यामधील पाकिस्तानी कश्मीरला हिंदुस्थानच्या बरोबर जोडणे गरजेचे आहे. याशिवाय अफगाणिस्तान सीमेजवळील वजिरीस्तान आणि फाटा या प्रदेशांना अफगाणिस्तानबरोबर जोडले जावे. सिंध आणि बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला यश मिळाल्यानंतर ते स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित केले जावेत. म्हणजेच सध्याच्या पाकिस्तानमध्ये फक्त पाकिस्तान पंजाबच राहील. त्यामुळे पाकिस्तानची हिंदुस्थानविरुद्ध दहशतवादी कृत्ये करण्याची क्षमताही कमी होईल. आपण हे करू शकतो का? हे करण्यासाठी आपण काही कारवाई सुरू केली आहे का? या सगळय़ा प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणाऱया काळामध्ये नक्कीच मिळू शकतील, परंतु सर्वात महत्त्वाचे पाकिस्तानचे तुकडे होणे हे हिंदुस्थानसाठी दहशतवादविरोधी लढाई जिंकण्याकरिता जरूरी आहे.