मुद्दा : माथेरानचा कोकण महोत्सव

203

>> चंद्रकांत नाटेकर

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण. पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र. साधारण 803 मीटर किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर वसलेले आणि मुंबईपासून जवळच असलेले हे डेस्टिनेशन. पर्यावरणाचा सुंदर आविष्कार आणि विविधरंगी फुलांचा दरबार पाहायचा असेल तर मे महिन्यातच माथेरानला जायला हवे. इसवी सन 1850 साली मॅलेट नावाच्या इंग्रज ट्रेकर अधिकाऱयाने माथेरानचा शोध लावल्याचे इतिहास सांगतो. 1874 साली माथेरानमध्ये मराठी प्राथमिक जीवन शिक्षण मंदिर ही शाळा सुरू झाली. या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते जयराम भिवा दळवी.

माथेरानच्या लाल मातीत जन्मलेल्या अनेक दिग्गजांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपल्या पारंपरिक संस्कृतीद्वारे निसर्ग आणि पर्यावरण यांचा समतोल साधत सामाजिक संदेश देताना आपल्या कलात्मक शैलीचे वेळोवेळी दर्शन घडविले आहे. माथेरानकरांना पर्यटनाचे महत्त्व पटल्यामुळे येथे 100 टक्के प्लॅस्टिकमुक्त शहर स्वच्छ राखण्यासाठी हा समाज सदैव प्रयत्नशील राहिला आहे. येथील शुद्ध हवा, मिनी ट्रेन सवारी, घोडेस्वारी, हातरिक्षा, पायी रपेट हे येथील मुख्य आकर्षण, यातूनच माथेरानकरांना रोजगार उपलब्ध होत असतो. श्री पिसरनाथ हे येथील ग्रामदैवत आहे.

कोकणातील अनेक पिढय़ा गेली कित्येक वर्षे माथेरान येथे वास्तव्यास असून 18 वर्षांपूर्वी बाळभागवत (भाई) दळवी आणि अजय सावंत यांच्या पुढाकाराने कोकणवासीय समाज संस्थेची स्थापना झाली. बाळभागवत दळवी यांची ही पाचवी पिढी. आज माथेरानमध्ये कोकणातील साधारण दीडशेच्या आसपास कुटुंबे राहात आहेत.

यंदा पहिल्यांदाच कोकणवासीय समाज संस्था, माथेरानच्या वतीने असेम्ब्ली हॉल, माथेरान येथे शनिवार 11 व रविवार 12 मे असे दोन दिवस भव्यदिव्य कोकण महोत्सव आयोजित केला आहे. कोकणवासीय बांधवांना एकत्र आणून कोकणातील संस्कृती जपणे आणि माथेरान या नितांतसुंदर पर्यटनाचे महत्त्व सर्वदूर पसरविणे हा कोकण महोत्सव भरवण्यामागचा उदात्त हेतू आहे. दोन दिवस चालणाऱया या महोत्सवात गुणवंतांचा गौरव, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, कलाकार शरदकुमार व गजानन नार्वेकर यांची मिमिक्री आदी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. फिनिक्स फाऊंडेशनतर्फे कोकणातील विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे या कोकण महोत्सवाचे उद्घाटक असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्याशिवाय माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. या महोत्सवासाठी येणाऱया पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी कोकणवासीय समाज संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सज्ज आहे. बाळभागवत दळवी हे या महोत्सवाचे कार्याध्यक्ष आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या