भावरम्य वास्तववादी चित्रकार


>> दीपक घारे

एनजीएमएच्या कला दालनात प्रवेश केला आणि तीन मजल्यांवर विखुरलेल्या धुरंधरांच्या कलानिर्मितीकडे नजर टाकली तर आपण त्यातल्या विविधतेने स्तिमित होतो. ब्रिटिशांच्या काळातल्या व्हिक्टोरियन युगात आपण प्रवेश करतो. प्रदर्शनाला दिलेलं ‘रोमँटिक रिऍलिस्ट’ हे नाव सार्थ वाटू लागतं. ऍकेडेमिक शैलीतील यथार्थवादी चित्रण पद्धती धुरंधरांनी आत्मसात केली आणि आयुष्यभर ते त्याच पद्धतीने काम करीत राहिले. या अर्थाने ते रिऍलिस्ट म्हणजे वास्तववादी होते, पण त्याला जोडलेला ‘रोमँटिक’ हा शब्द चित्रातील वास्तवतेला एका भावरम्य स्वप्नील जगात घेऊन जातो.

प्रख्यात चित्रकार म.वि. धुरंधर यांच्या 150 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने यावर्षी त्यांच्या कलाकारकिर्दीला एक नवा उजाळा मिळतो आहे. ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या त्यांच्या आत्मवृत्ताची नवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली, तर त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने मुंबईत चालू आहेत. एक भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये तर दुसरे म्युझियमसमोरच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ म्हणजेच एनजीएमए आर्ट गॅलरीमध्ये. यात सर्वात प्रभावी आणि धुरंधरांच्या प्रतिभेचं समग्र दर्शन घडवणारं महत्त्वाकांक्षी प्रदर्शन म्हणून एनजीएमए येथील ‘रोमॅण्टिक रिऍलिस्ट’ या प्रदर्शनाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे प्रदर्शन 13 ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार आहे.

रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचे चित्रकार. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ते शिकले आणि कला शिक्षकापासून डायरेक्टरपर्यंत त्यांनी जे.जे.मध्ये अनेक पदे भूषविली. त्याचबरोबर व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, देवादिकांची पौराणिक विषयांवरची चित्रे, कथाचित्रे, सामाजिक दस्तऐवज असलेली चित्रे, पोस्टकार्डांवरील आणि पाठय़पुस्तकांसाठी केलेली चित्रे, पोस्टर्स, ओलिओग्राफ्स अशा विविध कलाप्रकारांमध्ये त्यांनी खूप मोठय़ा प्रमाणावर कलानिर्मिती केली. विशेष म्हणजे हे सर्व करीत असताना त्यांनी चित्रनिर्मितीचा दर्जा कायम ठेवला.

एनजीएमएच्या कला दालनात प्रवेश केला आणि तीन मजल्यांवर विखुरलेल्या धुरंधरांच्या कलानिर्मितीकडे नजर टाकली तर आपण त्यातल्या विविधतेने स्तिमित होतो. ब्रिटिशांच्या काळातल्या व्हिक्टोरियन युगात आपण प्रवेश करतो. प्रदर्शनाला दिलेलं ‘रोमँटिक रिऍलिस्ट’ हे नाव सार्थ वाटू लागतं. ऍकेडेमिक शैलीतील यथार्थवादी चित्रण पद्धती धुरंधरांनी आत्मसात केली आणि आयुष्यभर ते त्याच पद्धतीने काम करीत राहिले. या अर्थाने ते रिऍलिस्ट म्हणजे वास्तववादी होते, पण त्याला जोडलेला ‘रोमँटिक’ हा शब्द चित्रातील वास्तवतेला एका भावरम्य स्वप्नील जगात घेऊन जातो. हिंदुस्थानी मिथकांना आभासी वास्तवाच्या जगात आणण्याची किमया राजा रविवर्मा यांनी प्रथम केली. ‘रिऍलिस्ट’ धुरंधरांप्रमाणे रविवर्मा आणि त्यांचे शिक्षक वा वरिष्ठ जॉन ग्रिफिथ्स किंवा ग्लॅडस्टन सॉलोमन यांचा पौर्वात्य कलेकडे पाहण्याचा पाश्चात्त्य दृष्टिकोन अशा दोन्ही प्रवाहांच्या खुणा आढळतात. धुरंधरांचा काळ हा प्लेगची साथ, स्वातंत्र्यलढा अशा अनेक संघर्षांनी भरलेला काळ होता, पण त्यांच्या चित्रांमध्ये मात्र सुखी, सौंदर्यासक्त मराठी समाजाचं चित्रण दिसतं. त्यामुळे रोमँटिक हे रोमँटिसिझममधल्या सौंदर्यवृत्तीची आठवण करून देणारं विशेषण समर्पक ठरतं. ‘रोमँटिक रिऍलिस्ट’मध्ये मोहकता आणि वास्तव यांच्यातले अंतर्विरोध नेमकेपणाने व्यक्त होतात.

या प्रदर्शनात धुरंधरांनी केलेली विद्यार्थीदशेतील चित्रे, लग्नसमारंभातील ‘वऱहाडणी’सारखी सुवर्णपदक मिळालेली चित्रे लावलेली आहेत. औंध संस्थानच्या भवानराव पंतप्रतिनिधींसाठी केलेली चित्रे आहेत. व्यक्तिचित्रे आहेत. पुस्तकांसाठी केलेली चित्रे आणि पेनिन्सुलर रेल्वेसाठी केलेली पोस्टर्स लावलेली आहेत. धुरंधरांना नित्यनियमाने स्केचेस करायची सवय होती. बापूबाई आणि गंगूबाई या त्यांच्या प्रथम आणि द्वितीय पत्नींची केलेली दुर्मिळ स्केचेस प्रदर्शनात बघायला मिळतात. त्यांच्या चित्रांचे ओलिओग्राफ्स म्हणजेच शिळामुद्रित चित्रे हे प्रदर्शनाचं आणखी एक आकर्षण आहे. धुरंधरांची चित्रं एकाच ठिकाणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बघायला मिळणं हा एक दुर्मिळ योग आहे. त्याचा फायदा असा की, अनेक दुर्मिळ चित्रे प्रथमच पाहायला मिळतात आणि जी चित्रं आपण मुद्रित स्वरूपात पाहिलेली असतात ती मूळ स्वरूपात पाहिली की, पूर्वी लक्षात न आलेल्या सौंदर्यखुणा लक्षात येतात. शेवटी कलाकृती प्रत्यक्ष पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. विशेषतः ‘वऱहाडणी’ चित्र पाहताना धुरंधरांनी साकारलेले बारीक सारीक तपशील, लग्नसमारंभातल्या स्त्र्ायांच्या समूहाचं चित्रण करताना वापरलेलं रचना कौशल्य, वास्तुरचना आणि परिप्रेक्ष्य यांचा अभ्यास अशा अनेक गोष्टी नव्याने जाणवतात. एका चित्रात धुरंधरांनी दिलरुबा वाजवणाऱया स्त्र्ााrचं पेन्सिलने केलेलं स्केच आहे. आवश्यक तिथे फिकट जलरंग वापरल्याने त्या चित्राला उठाव आला आहे. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित चित्र रचनेच्या वेगळेपणामुळे उठून दिसतं. धुरंधरांच्या बहुतेक चित्रांमध्ये मानवाकृतींची रचना बरोक शैलीची आठवण करून देणारी आणि लयबद्ध असते. या चित्रात मात्र मानवाकृतींची तीन तीन माणसांच्या तीन गटांत विभागणी केलेली आहे. रामदास, तुकाराम आणि शिवाजी महाराज केंद्रस्थानी, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तीन-तीन व्यक्तींचे दोन गट अशी ही रचना आहे.

ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर हे या प्रदर्शनाचे संयोजक (क्युरेटर) असून त्यांनी चित्रांची निवड, त्यांची रचना आणि काळाचे संदर्भ जिवंत करणाऱया पूरक साहित्याची योजना विचारपूर्वक केलेली आहे. धुरंधरांना समकालीन असलेले चित्रकार, दुर्मिळ छायाचित्रे, त्यांची पुस्तके, सुवर्ण पदके यातून धुरंधर आणि त्यांची कला समजायला मदत होते. दिल्ली आर्ट गॅलरी, एनजीएमए दिल्ली व मुंबई, औंध, सांगली, कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालये, कलासंग्राहक राजन जयकर अशा अनेकांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आकाराला आले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने धुरंधरांच्या या साऱया कलाकृती असलेले मोठय़ा आकाराचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.

व्रतस्थ आणि नेमस्त
धुरंधरांच्या कलानिर्मितीला हिंदुस्थानी कलेच्या इतिहासात तीन दृष्टींनी महत्त्व आहे. पहिलं कारण म्हणजे त्यांनी कला शिक्षक म्हणून मुंबई स्कूल परंपरेतील अनेक विद्यार्थी घडवले. दुसरं कारण म्हणजे चित्रकार म्हणून कलेप्रति समर्पणवृत्ती, कलेचा सराव आणि अखंड कलानिर्मिती ही मूल्यं रुजवली. तिसरं कारण म्हणजे उपयोजित कलेतील इलस्ट्रेशन, पोस्टर असे विविध प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. उपयोजित कलेतील ते आद्य चित्रकार तर होतेच, पण त्यांच्या संस्कारांचे अवशेष आजच्या उपयोजित कलेमध्येही दिसतात. महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढय़ाच्या संघर्षाला समांतर अशी शिक्षणप्रसार, समाजप्रबोधन, शहरांचा विकास यासाठी झटणारी, ब्रिटिश सत्तेशी जुळवून घेणारी समाजसेवकांची मोठी फळी होती. नेमस्त वृत्तीच्या धुरंधरांचं या दुसऱया फळीशी नातं होतं. आजचं राजकीय, सामाजिक वातावरण अधिकच आक्रमक आणि आक्रस्ताळी होत चाललं आहे. अशा वेळेस धुरंधरांसारख्या व्रतस्थ आणि नेमस्त प्रतिभावंतांचं महत्त्व नव्याने जाणवल्याशिवाय राहत नाही.

(लेखक ज्येष्ठ कलासमीक्षक आहेत.)
[email protected]