दखल – विठ्ठल-पुंडलिकाची नवी कहाणी

>> देवेंद्र जाधव

पुंडलिकाने वीट फेकली आणि अठ्ठावीस युगांपासून पांडुरंग या विटेवर उभा राहून भाविक भक्तांना दर्शन देत आहे. पुंडलिक आणि पांडुरंगाच्या भोळ्या भक्तीची कहाणी आपल्या सर्वांना माहीतच आहे, पण हाच पुंडलिक सध्याच्या आधुनिक जमान्यात कसा वागतोय, पांडुरंग आणि पुंडलिक या दोघांचं नातं सध्याच्या काळात कसं बदललं आहे याची रंजक कहाणी म्हणजे गंगाराम गवाणकर लिखित ‘संगीत विठ्ठल विठ्ठल’ हे नाटक. मुळात गंगाराम गवाणकर हे नाव ऐकलं की, लगेच डोळ्यांसमोर ‘वस्त्र्ाहरण’ नाटक येतं. गंगाराम गवाणकर यांची मालवणी भाषेवर असलेली विलक्षण हुकमत आपण ‘वस्त्र्ाहरण’ नाटकातून पाहिली. याच गंगाराम गवाणकर यांचं ‘संगीत विठ्ठल विठ्ठल’ हे नाटक वाचून एक निखळ आनंद मिळतो.

नाटकाच्या मुख्य पात्राचं नाव आहे पुंडलिक. हा पुंडलिक सरकारी नोकरीत कामाला. विठ्ठलाच्या भक्तीत कायम तल्लीन असलेला. पुंडलिकाचं बायको, मुलगा, मुलगी असं चौकोनी कुटुंब. शहरात निवडणुकांचं वारं जोरात सुरू आहे आणि पुंडलिकाची सामान्य माणसांमधील लोकप्रियता बघता त्याच्या बायकोला महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट देऊन जागा जिंकावी. बायकोला निवडणुकीत उभं करण्यासाठी पुंडलिकाने 25 लाखांची रक्कम खर्च करावी, असा स्थानिक राजकारण्यांचा डाव आहे. पुंडलिक मात्र या गोष्टीला सपशेल नकार देतो.

पुढे हेच राजकारणी पुंडलिकाच्या बायकोला भेटून तिच्या समोर असं काही चित्र रंगवतात की, पुंडलिकाची बायको निवडणुकीला उभं राहण्याची स्वप्नं बघते. पुंडलिक घरी आल्यावर बायको आणि मुलं पुंडलिकाला फैलावर घेऊन त्याच्या समोर 25 लाखांची मागणी करतात. आयुष्य प्रामाणिकपणे जगणाऱया पुंडलिकसमोर मोठा पेच उभा राहतो. एका बाजूला स्वतःची तत्त्वं, दुसऱया बाजूला कुटुंबाची इच्छा अशा द्वंद्वात पुंडलिक सापडतो आणि शेवटी विठ्ठलाला शरण जातो.

भोळ्याभाबडय़ा पुंडलिकाच्या हाकेला विठ्ठल प्रसन्न होतो. पुंडलिकाचं गाऱहाणं ऐकल्यावर विठ्ठल पुंडलिकाला एक युक्ती सांगतो. ती युक्ती कोणती? पुंडलिक या कौटुंबिक संकटातून सुटेल का? पांडुरंग पुंडलिकाची मदत कशी करेल? याची कहाणी म्हणजे ‘संगीत विठ्ठल विठ्ठल’ हे नाटक.

नाटकाची कथा खूप साधीसोप्पी आहे. मुळात लेखक गंगाराम गवाणकरांनी पुंडलिकाचा साधेपणा आपल्या मनावर बिंबवला आहे. प्रामाणिकपणे काम करणारा पुंडलिकासारखा माणूस सध्याच्या काळात व्यवस्थेत कसा भरडला जातो, याचंही चित्रण नाटकात योग्य रीत्या दाखवलं आहे. नाटकाचा शेवटी एक सुखद धक्का आहे.

संगीत विठ्ठल विठ्ठल
लेखक : गंगाराम गवाणकर
प्रकाशक : डिंपल प्रकाशन
पृष्ठे : 68, मूल्य: रुपये 100/-