सांस्कृतिक दुवा

>> धनश्री देसाई

इंदुरात होळकरांच्या छत्रछायेत मराठी राजभाषेची वृद्धी झाली. मराठीबरोबरच हिंदी भाषाही वाढत होती, परंतु पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या अनेकांचे इंदुरात वास्तव्य झाले आणि मग हळूहळू मराठीतून होणारा कारभार हिंदीकडे वळू लागला. इंदुरात मराठी, संस्कृती लोप तर नाही पावणार ना? असे प्रश्न उद्भवू लागले. कारण हिंदी शाळा उघडू लागल्या आणि मराठी शाळा हळूहळू बंद होऊ लागल्या. तेव्हा २५ वर्षांपूर्वी जयंत भिसे आणि त्यांच्यासोबत अकरा जणांनी मिळून मराठी सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी ‘सानंद न्यास’ ही संस्था उभारली. अर्थात जयंत भिसे हे अत्याधिक उत्साही आणि कामसू असल्याने सारी दारोमदार त्यांच्यावरच आली. जयंत भिसे हे लहानपणापासूनच नाटय़ क्षेत्रात काम करणारे असल्याने ते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप सक्रिय असतात. त्याचबरोबर खो-खोमध्येही ते राष्ट्रीय पातळीतील खेळाडू आहेत. मराठी नाटकांमुळे, मराठी कार्यक्रमांमुळे मराठी माणसे जोडली जातात आणि जर मराठीच नाही वाचवू शकलो तर येणाऱया पिढीला काय देणार? असा गंभीर प्रश्न इंदुरमधील मराठी जनांसमोर उभा ठाकला असताना सुधाकर काळे यांनी असा प्रस्ताव ठेवला की, आपण एक संस्था उभारून त्यात महिन्याला एक किंवा वर्षाचे काही कार्यक्रम आखू. किमान त्यामुळे मराठी साहित्य, संस्कृती, नाटकं हे इकडील प्रत्येक व्यक्तीला बघायला मिळेल. त्यानंतर संस्था स्थापन झाली आणि सानंद न्यास असे तिचे नामकरण झाले. संस्था उभारायला फार प्रयास करावे लागले नाहीत. कारण इंदूरकरांच्या मनात जयंत भिसे यांच्याबद्दल आणि मराठी माणसांबद्दल असलेली श्रद्धा खूप मोठी होती. त्यांचा विश्वास होता की, जर इंदुरात मराठी साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपायला भिसे यांच्याकडून काही होत आहे तर ते उत्कृष्ट असेच असेल. सुधाकर काळे, स्व. जयंत महाजन, सुभाष देशपांडे अशा अनेक लोकांनी मोठा हातभार लावून सानंद न्यास मोठे केले. आज न्यासाचे तब्बल ४ हजार ५०० सदस्य आहेत आणि त्यातर्फे वर्षभरात मोठे कार्यक्रम असतात. ज्यात दिवाळी पहाट, शास्त्राrय संगीताचा ‘सानंद फुलोरा’ आणि एकूण १२ नाटकं असतात.

ही नाटकं मध्य प्रदेशातील मराठीजनांना पाहता यावीत आणि महाराष्ट्रातल्या कलाकारांना इंदूरच्या कलाप्रेमी लोकांना भेटता यावे, त्यांच्या कलेला एक मंच मिळावा, त्याचबरोबर इंदूरच्या मराठी रसिकांना दर्जेदार मराठी नाटकं पाहता यावीत, मराठी साहित्य मिळावे हाच हेतू सानंद न्यास स्थापन करण्यामागे होता. शिवाय महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांचा सांस्कृतिक दुवा म्हणूनही सानंद न्यास आज ओळखला जातो.

सानंदचे दरवर्षी मुलांसाठी बालनाटय़सारखे उपक्रम, मराठी नाटकांबरोबरच मराठी चित्रपट, चर्चासत्र असे उपक्रम सुरू असतात. जयंत भिसे काका यांचा जवळपास सर्वच मराठी संस्थांशी सतत संपर्क असतो. कारण ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ असा त्यांचा स्वभाव आहे. इंदूरच्या देवी अहिल्या विश्व विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी पत्रकारिता व मॅनेजमेंटच्या आपल्या प्रोजेक्टसाठी सानंद न्यास हा विषय निवडला यावरूनही सानंद न्यास आणि जयंत भिसे यांच्या कार्याची ओळख पटते.

जयंत काकांचा चेहरा बघून कोणी म्हणणार नाही की ते इतक्या मोठय़ा संस्थेचे कारभार सांभाळतात आणि तेही शांतपणे. हिंदुस्थानात तरी इतका मोठा मराठी श्रोतावर्ग कुठल्याही संस्थेत नाही आणि त्यातूनही निर्गर्वी स्वभावाचे जयंत काकांसारखे संचालक असले तर संस्था अजून फुलत असते.

महाराष्ट्रातल्या नामवंत कलाकारांनाही जयंत भिसे काकांचे खूप कौतुक वाटते. इंदूर आणि सानंद न्यास हे अगत्याचे दुसरे नाव. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मराठीसाठी त्याची कळकळ आणि माय मराठीचे संस्कार त्याला उत्कृष्ट कार्य करण्यास भाग पाडत असतात. इंदूरचे सानंद न्यास हे त्याचे उत्तम उदाहरण.

[email protected]