संस्थापकांचा तंटा म्हणजे पँथरचा इतिहास नव्हे!

>> दिवाकर शेजवळ

पँथरचे संस्थापक कोण, हा कालबाह्य आणि निरर्थक वाद म्हणजे त्या संघटनेचा इतिहास नव्हे. तसेच तिचा इतिहास हा बरखास्तीपर्यंतच्या तीन- पाच वर्षांपुरता नसून 1972 ते 1989 असा 17 वर्षांचा आहे. या कालखंडातील पँथरच्या संघर्ष पर्वाचा इतिहास हा कुण्या तथाकथित इतिहासकाराच्या गाठीशी नव्हे, तर राज्यभरातील पँथर्सच्या जिव्हांवर आहे. त्याचे संकलन यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात झाले पाहिजे.

दलित पँथर स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाचा प्रारंभ आज शनिवारी (9 जुलै) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत आहे. त्याचा समारोप पुढील वर्षी जुलैमध्ये मराठवाडय़ात संभाजीनगर येथे होणार आहे. वर्षभरात हा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात साजरा होणार आहे.

‘पँथर’च्या बरखास्तीनंतर उभी हयात ‘दलित’ शब्दाचा विटाळ मानण्यात घालवलेले काही जण त्या संघटनेची स्थापना आणि तिच्या इतिहासातील ‘वाटेकरी’ होण्यासाठी कुठलीच कसूर सोडेनासे झालेत. त्यासाठी जेमतेम तीन वर्षांच्या सहभागाचे भांडवलही त्यांच्यासाठी पुरेसे ठरले आहे.1972 ते 1989 अशी 17 वर्षे संघर्ष केलेल्या पँथरच्या सुवर्ण महोत्सवातील ही सर्वात ‘रंजक’ गोष्ट आहे.

1972 सालात स्थापन झालेल्या दलित पँथरचे दोन अध्याय आहेत. पहिला दलित पँथर आणि दुसरा भारतीय दलित पँथर. मूळच्या दलित पँथरचे 7 मार्च 1977 रोजीच्या बरखास्तीपर्यंतचे आयुष्य केवळ पाचच वर्षांचे. त्यातूनही इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीचा 21 महिन्यांचा म्हणजे 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 हा कालखंड वगळला तर जेमतेम तीनच वर्षे ती संघटना कार्यरत होती. राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर हे पाच जण त्या संघटनेचे म्होरके होते, पण ढाले-ढसाळ यांच्यातील वादातून दलित पँथर बरखास्त करून राजा ढाले- ज. वि. पवार यांनी ‘मास मूव्हमेंट’ नावाची संघटना स्थापन केली होती.

मात्र, ढाले यांचा पँथर बरखास्तीचा अवसानघातकी निर्णय पँथर्सनी स्वीकारला नाही. यासंदर्भात प्रख्यात दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे म्हणतातः पँथर मुंबईत जन्मली, मुंबईत बरखास्त झाली, पण मुंबईबाहेरच्या असंख्य छावण्या आणि कार्यकर्त्यांनी पँथरला कधीच बरखास्त होऊ दिले नाही. कारण त्यांच्या लेखी पँथर ही संघटना नव्हती, तर ती एक जिवंत विद्रोही भावना होती. पँथरच्या चळवळीमुळे माझ्यातली पारंपरिक लाचारी समूळ नष्ट झाली आणि मीही निषेधाचा जाहीरनामा झालो. मला माझ्या आईपेक्षाही पँथर जवळची वाटू लागली होती, असेही लिंबाळे यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे, तर पँथर बरखास्तीचा निर्णय घेणाऱ्या राजा ढाले यांची भावना नेमकी त्याउलट होती. ‘‘मी जन्म दिलेल्या मुलाच्या नरडीचा घोट घेण्याचा अधिकार मला आहे’’ असे ते मानायचे, म्हणायचे. तसे वक्तव्य केल्यावरून ढाले यांची सभा कल्याणनजीकच्या मोहने येथील पँथर्सनी बंद पाडली होती.

पँथरला संजीवनी नामांतर मागणीची

अखेर बरखास्तीनंतर महिनाभरातच 10 एप्रिल 1977 रोजी संभाजीनगर येथील एका बैठकीत पँथरचे पुनरुज्जीवन करून भारतीय दलित पँथरची स्थापना करण्यात आली. त्यासाठी प्रा अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाढे, एस. एम. प्रधान, प्रीतमकुमार शेगावकर, दयानंद मस्के, टी. एम. कांबळे आदींनी पुढाकार घेतला होता. त्या बैठकीनंतर भारतीय दलित पँथरतर्फे 12 ऑगस्ट 1977 रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी विधिमंडळावर काढण्यात आलेला मोर्चा अक्षरशः तुफानी ठरला. त्या मोर्चाने पँथरला संजीवनी आणि नवी ताकद तर दिलीच, शिवाय, दलित पँथरच्या मूळच्या संस्थापक नेत्यांना विस्मृतीत ढकलले आणि प्रा अरुण कांबळे, रामदास आठवले,गंगाधर गाढे, एस. एम. प्रधान यांची नवे पँथर नेते म्हणून समाजात ओळख प्रस्थापित केली.

पँथरच्या त्या मोर्चानंतर वर्षभरातच विद्यापीठ नामांतराचा ठराव विधिमंडळात एकमताने संमत झाला होता, पण त्याविरोधात मराठवाडय़ात आगडोंब उसळल्यामुळे ठरावाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. त्यासाठी तब्बल 16 वर्षे भारतीय दलित पँथर आणि दलित मुक्ती सेना या दोनच संघटनांनी निरंतर संघर्ष केला. त्यात नामदेव ढसाळ यांचा अपवाद वगळता पँथरचे अन्य तथाकथित संस्थापक कुठेच नव्हते हे वास्तव आहे. पँथरचा खरा इतिहास हा तर दुसऱया अध्यायात म्हणजे भारतीय दलित पँथरच्या कालखंडात घडला आहे. ही पँथर 1989 च्या रिपब्लिकन ऐक्यात विलीन होईपर्यंत राज्यात सर्वात शक्तिमान संघटना म्हणून कार्यरत राहिली होती. तिचे नेतृत्व प्रारंभीच्या काळात प्रा. अरुण कांबळे यांनी तर नंतर प्रदीर्घ काळ रामदास आठवले यांनी केले. पँथरचे संस्थापक कोण, हा कालबाह्य आणि निरर्थक वाद म्हणजे त्या संघटनेचा इतिहास नव्हे. तसेच तिचा इतिहास हा बरखास्तीपर्यंतच्या तीन- पाच वर्षांपुरता नसून 1972 ते 1989 असा 17 वर्षांचा आहे. या कालखंडातील पँथरच्या संघर्ष पर्वाचा इतिहास हा कुण्या तथाकथित इतिहासकाराच्या गाठीशी नव्हे, तर राज्यभरातील पँथर्सच्या जिव्हांवर आहे. त्याचे संकलन यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात झाले पाहिजे.

दलित पँथर ही साहित्यिकांनी उभारलेली हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिली चळवळ आहे, असे पंथरमधील एक अग्रणी, साहित्यिक अर्जुन डांगळे हे सांगतात. पँथरचे संस्थापकत्व हे दलित साहित्यालाच देऊन त्या संघटनेचा संस्थापक कोण हा चघळला जाणारा वाद एकदाचा संपवा असेही त्यांचे म्हणणे आहे, पण पँथर ही विद्रोही दलित साहित्याचे अपत्य असल्यामुळेच त्या साहित्यातील धर्मचिकित्सा दुर्दैवाने त्या संघटनेची भूमिका बनली होती हे मान्य करावे लागेल.

ढाले-ढसाळ यांच्या नेतृत्वाखालील पँथरने धर्मचिकित्सेवर भर देत एका धर्मग्रंथाचे दहन केले होते. तसेच हिंदू देव-देवतांवर भाषणांतून प्रहार केले होते. त्यातून वरळीची दंगल घडली. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी म्हणजे एप्रिल 1999 मध्ये महाड येथे एका धर्मग्रंथाचे दहन करतानाच पँथर नेते भाई संगारे यांच्यासारखा मोहरा आंबेडकरी चळवळीला गमवावा लागला, पण दलित पँथर आणि भारतीय दलित पँथर यांच्या चळवळीतील भूमिकांमध्ये गुणात्मक फरक दिसून आला, हे इथे आवर्जून नमूद करावे लागेल. भारतीय दलित पँथरच्या काळात रामदास आठवले आणि त्यांच्या सहकाऱयांनी मात्र धर्मचिकित्सेला फाटा दिला होता. ओबीसींसाठीचा मंडल आयोग, अनुशेष, बेरोजगारी, श्रमजीवी झोपडीवासीयांच्या निवाऱयाचे रक्षण असे प्रश्न धसास लावण्यावर सारे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच 1990 च्या दशकाच्या प्रारंभापर्यंत पँथरची जनमानसातील स्वीकारार्हता, जनाधार आणि राजकीय उपयुक्तताही वाढू शकली. आता केंद्रीय राज्यमंत्री असलेले ‘पँथर’ रामदास आठवले यांनी नामदेव ढसाळ यांना तर कधी दूर लोटले नाहीच. राजा ढाले यांच्याशी चार दशके राहिलेला दुरावा संपवून टाकून ढाले यांचाही त्यांनी अखेरच्या काळात ‘मौलिक’ सन्मान केला. ही आपल्या पूर्वसूरींबाबत दाखवलेली कृतज्ञतेची भावनाच आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि दलित चळवळीतील अग्रणी आहेत.)

[email protected]