मुद्दा : सोपे व सुखद स्वप्न

2

>> ज्ञानेश्वर गावडे

1972च्या मोठय़ा दुष्काळापासून महाराष्ट्रात कुठे ना कुठे दुष्काळ पडतच चालला आहे. त्यामुळे पेयजलाचे दुर्भिक्ष सालाबादप्रमाणे येतच आहे. कारण महाराष्ट्रातील भूजल पातळी खोलवर जात आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्जन्यमानावर पडत आहे. हबशातून होणारा पाण्याचा पुरवठा दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे महत्त्वाचे कारण की, पावसाचे पाणी जिरवण्यासाठी लागणाऱया मोकळय़ा जागाच कमी पडत चाललेल्या आहेत. शहरे ताडमाड आणि खेडी खड्डय़ात पडत चाललेली पाहून झपाटय़ाने होणारे शहरीकरण आत्मनाशाला कारण तर ठरणार नाही याची साधार भीती वाटते. 1947 साली देशातील खेडय़ांमधील लोकसंख्येचे प्रमाण 80 टक्के होते ते दरवर्षी बदलत जाऊन सध्या 50 टक्के असे झालेले आहे आणि येत्या 30 वर्षांत 20 टक्के जनता खेडय़ात तर शहरात 80 टक्के लोकसंख्या फुगणार आहे असा या विषयावरील तज्ञ मंडळींचा होरा आहे. शहरी राहणीचे आकर्षण, खेडय़ातील खडतर जगणे, नकोशी वाटणारी मंडळी यांचे व्यस्त प्रमाण वाढतच आहे. शाश्वत शेती म्हणजे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविला पाहिजे. जमिनीतील ओल टिकवून त्याद्वारे जीवसृष्टी वाचविली पाहिजे, अधिकतम जागांचे हरीकरण व पर्यावरण टिकवले पाहिजे. वास्तविक, हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतीचे व शेतकऱयांचे जीवन सुस्थितीत राहिले पाहिजे, उद्योगधंदे व कारखाने ज्या वेगाने वाढतात. त्याउलट वेगाने शेती व शेतकऱयांचे जीवन कमीतकमी होत चालले आहे. मानवी प्राण्यांची, जीवसृष्टीची गरज मूलभूत म्हणजे अन्नधान्य सकस उत्पादनाची आहे. त्यासाठी हिरवाईची जरुरी आहे. जीवसृष्टी टिकवायची व वाढवायची असेल तर पावसाच्या रूपाने जमिनीवर पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत जिरला जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. जगात सर्वत्रच कार्बन आवरण वाढत आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. जीवसृष्टीचा नाश होत आहे. कार्बनचे कवच अधिक घट्ट होत आहे. या संकटातून देशाला वाचवायचे असेल तर खेडी वाचली पाहिजेत. खेडय़ातील जनताच शाश्वत शेती करून वसुंधरा सुजलाम् व सुफलाम् करू शकते. खेडी वाचवा, पर्यावरण टिकवा.