माणुसकीची प्रयोगशाळा

>> डॉ. अशोक कुलकर्णी

आमची डॉ. विकास आमटेंशी झालेली भेट अविस्मरणीय ठरली. आम्ही सगळे डॉ. भारती आमटेंचे एमबीबीएसचे क्लासमेटस्. सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. काहींना ते आधीच भेटले होते. अकोल्याची अलका तामणे तिच्या हॉस्पिटलला लागणारं बरंचसं सामान आनंदवनकडून घेते हे त्यांच्या लक्षात होतं. संभाजीनगरची जयश्री बर्दापूरकर भारतीची खास मैत्रीण. तिचाही उल्लेख झाला. मी माझं नाव सांगितल्याबरोबर त्यांनी “अरे! या या हेडमास्तर, तुमची कधीपासून वाट पाहत होतो’’ असं म्हणून माझ्याशी हस्तांदोलन केलं. कष्ट केलेल्या माणसाचा तो हात आहे हे जाणवलं.

विकासभाऊंचं मनोगत ऐकताना मात्र सगळे मंत्रमुग्ध झाले होते. अत्यंत मोजक्या शब्दांत त्यांनी आनंदवनाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी आणि केलेले कष्ट सांगताना त्यात अतिशयोक्तीचा कुठेही लवलेश नव्हता. आनंदवन प्रकल्पाची शेती, इथं होत असलेली उत्पादनं, प्रकल्पात होत असलेला बायोगॅस/ सौर ऊर्जेचा वापर, खतनिर्मिती, तेल, मीठ आणि साखर सोडता जवळपास सर्व अन्नाबाबत असलेली स्वयंपूर्णता, खास अपंगासाठी असलेल्या शाळा, ‘संधीनिकेतन’ हे निवासी प्रशिक्षण केंद्र, रुग्णालय, कृत्रिम अवयव केंद्र, कुष्ठरोगी, अपंग आणि वृद्ध यांच्यासाठीच्या वसाहती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री इत्यादीबाबत आपल्या साध्या, ओघवत्या भाषेत विकासभाऊंनी हे सगळं विश्व आमच्यासमोर उभं केलं. मग लक्षात आलं की, सर्वंकष विकासाचं हे हिंदुस्थानात पुनरावृत्त (रिपीट) करता येणारं, अनुकरणीय आणि अवघड पण प्रयत्नसाध्य (फिजिबल) असं हे मॉडेल आहे. आधी केलं, दाखवलं आणि मगच बोलून दाखवलं असं हे बोलणं पटण्यासारखं होतं हे नक्की.

कामात आपली पत्नी भारती हिच्या योगदानाचा उल्लेख आला तेव्हा आपल्याला तिच्याकडे म्हणावं तितकं लक्ष देता आलं नाही, तरीही तिने मुलांचं संगोपन/ शिक्षण संस्कार आणि आनंदवनात भरपूर योगदान दिलंय हे सांगताना भावनाविवश होऊन त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ते पाहून आमच्याही डोळ्यात पाणी आलंच. हे सगळं सांगताना विकासभाऊंच्या मिस्कील स्वभावाचाही प्रत्यय आला. त्यामुळे वातावरण गंभीर न राहता प्रसन्नच राहिलं. विकासभाऊंनी मनोगताचा समारोप केला. यानंतर ताडोबाचा कार्यक्रम ठरला.

यासाठी आनंदवनवासीय शौकतखान आणि विजय यांनी केलेली मदत न विसरण्यासारखीच. सुदैवानं वाघीण आणि तिच्या बछडय़ाचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही हेमलकसाला प्रस्थान केलं. हा प्रवास जर्मनीतल्या ब्लॅक फॉरेस्टच्या प्रवासाची आठवण व्हावी इतका रम्य झाला. वाटेत नागेपल्लीला जगन मचकले आणि त्यांची पत्नी मुक्ता यांची भेट झाली. आनंदवन ते हेमलकसा हे अंतर २३० किमी. तेव्हा वाटेत मुक्कामाला सोईस्कर म्हणून बाबांनी हे केंद्र उभं केलं. जगनभाऊ नांदेड जिह्यातले. त्यांनी या केंद्राची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू आसपासच्या गावातल्यांना त्यांनी प्रथमोपचार द्यायला सुरुवात केली. मिळालेल्या जमिनीवर शेती, डेअरी असे उद्योग त्यांनी केले. हेमलकसा आणि आनंदवन यांच्यात संपर्क केंद्र म्हणून नागेपल्लीचं महत्त्व आहे. इथल्या लोकांशी संपर्क साधायला म्हणून त्यांची ‘माडिया’ भाषा कशी आत्मसात केली तो किस्सा त्यांच्या तोंडूनच ऐकण्यासारखा. त्यांच्या मनोगतावरून बाबांनी ताकदीचे कार्यकर्ते जवळ केले होते याचा अंदाज आला.

डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी या दांपत्याची भेट म्हणजे आमच्यासाठी एक आगळीवेगळी संधीच होती. ही भेट मनमोकळय़ा आणि खेळीमेळीच्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपात झाली. अजिबात सुविधा नसताना वैद्यकीय सेवा पुरवताना आलेल्या अडचणी, काही गंभीर तर मजेशीर प्रसंग सांगताना त्यांना मंदाताई पण मधूनमधून साथ देत होत्या. आदिवासी त्यांच्यावरील विश्वासामुळे आपसातील भांडणं सोडवायला कसे येत आणि आपणही आपल्या सिक्स्थ सेन्थमुळे कसा न्याय दिला त्याचे त्यांनी सांगितलेले किस्से रंजक असेच होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचे ‘प्राण्यांचे अनाथालय’ दाखवले. हे दाखवताना त्यांची नात तिच्यासाठी खास केलेल्या बाबागाडीतून सोबत होती. प्राणिसंग्रहालयातले बिबळय़ा, विषारी-बिनविषारी साप, अस्वल, हरीण, माकड, काटेरी सायाळ, सरडे इत्यादी पाहताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. जवळच असलेल्या तीन नद्यांच्या संगमाला आम्ही भेट दिली. अत्यंत रमणीय अशा त्या परिसरातून पाय निघता निघत नव्हता.

हेमलकसाला रात्री मुक्काम केल्यानंतर आम्ही सोमनाथला आलो. सोमनाथ ही बाबा आमटेंची शेतीच्या प्रयोगांची प्रयोगशाळा. इथं अरुण कदम यांनी सोमनाथ हे भारतीताईंचं माहेर आहे आणि तुम्ही भारतीताईंचे मित्र, म्हणजे सोमनाथचे पाहुणे आहात असं म्हणून आमचा कब्जाच घेतला. तरुणाई आणि कुष्ठरोगी यांनी नावारूपास आणलेला प्रकल्प असं सोमनाथचं वर्णन करता येईल. तरुणांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून इथं जंगल साफ करणं, घरं बांधणं, तलाव/ विहिरी खोदणं, लहान बंधारे बांधणं ही कामं झाली. इथल्या वस्तीत राहणारे कुष्ठरोगी त्यावर तांदूळ, गहू, तूर, कापूस, हरबरा, हळद, भाजीपाला अशी अनेक पिकं घेतात. इथं आम्ही प्लॅस्टिक-टायर-काँक्रिट वापरून तयार केलेला नाल्यावरचा बंधारा (स्पिल-ओव्हर डॅम) पाहिला. त्यानं अडवलेले पाणी गुरुत्वाकर्षणाद्वारे खाली जाते. खाली आणखी छोटे बंधारे आहेत. शिवाय अनेक गावतळी आहेत. त्यातल्या पाण्यावर सुमारे १२०० एकर शेतीवरचा हा सामुदायिक शेतीचा प्रयोग एकदा तरी बघावा असाच आहे. या वर्षी पाऊस ३०-४० टक्केच झाला, तरी नजर जाईल तिथवरची शेती नुसती फुलारलेली. याचं रहस्य सांगायला कोणा कृषीतज्ञाची गरज नव्हती. लोकबिरादरी प्रकल्पाची मीठ, तेल आणि साखर वगळता अन्नधान्याची सगळी गरज तर या शेतीतून भागतेच, वर उत्पन्नाचा मोठा हिस्सा यातून येतो.

इथून निघताना अरुणभाऊंनी पुलंचं एक वाक्य सांगितलं- “सोमनाथला आलं की आयुष्याच्या बॅटऱया चार्ज होतात’’. सोमनाथच का? बाबांनी सुरू केलेल्या कोणत्याही प्रकल्पाला जा, हाच अनुभव येईल. सध्या आमच्या बॅटऱया चार्ज्ड आहेत.

[email protected]