समजा आणि उमजा

199

>>डॉ. अविनाश भोंडवे

गोलमटोल शरीरांचा भार कमी करण्यासाठी वजन कमी करण्याचे आणि निरोगी जीवन जगण्याचे आमिष देणारी अनेक ‘पथ्यकारक आहार पद्धती’ किंवा प्रचलित भाषेत ‘डाएट प्लॅन’ जगभरात अर्थातच पर्यायाने हिंदुस्थानातसुद्धा पाळले जात आहेत. अशाच काही डाएट प्लॅनविषयी.

शरीराला अजिबात श्रम न पडता कार्यभाग साधला गेला पाहिजे, हे आजच्या युगातील जीवनशैलीचे वैशिष्टय़ जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कटाक्षाने पाळले जाते. साहजिकच वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी, शरीराला कसलेही कष्ट न देता, वजन कमी करण्याचे अनेक फंडे प्रसृत होतात. गोलमटोल शरीरांचा भार कमी करण्यासाठी वजन कमी करण्याचे आणि निरोगी जीवन जगण्याचे आमिष देणारी अनेक ‘पथ्यकारक आहार पद्धती’ किंवा प्रचलित भाषेत ‘डाएट प्लॅन’ जगभरात अर्थातच पर्यायाने हिंदुस्थानातसुद्धा पाळले जात आहेत.

या डाएट प्लॅन्सचा प्रणेता कुणीतरी तथाकथित नामांकित आहारतज्ञ असतो. आरोग्याच्या परंपरागत आहाराच्या पद्धतीची मोठय़ा कौशल्याने मोडतोड करून हे प्लान्स बनवले गेलेले असतात. अशा आहारपद्धतीचे काही व्यावसायिक कंपन्यांकडून खूप चातुर्याने प्रमोशन केले जाते. वर्तमानपत्रे, मासिके, टेलिव्हिजन, इंटरनेट, घरोघरी प्रचारक पाठवणे, सोशल मीडियावर अशास्त्राrय मेसेजेस पसरवणे आणि मौखिक प्रसिद्धी अशा सर्व पद्धतीने या डाएट प्लान्सची वारेमाप जाहिरात केली जाते. महिन्याभरात वीस किलो वजन कमी केलेल्या तथाकथित व्यक्तींचे ‘तेव्हा आणि आता’ असे मनाला भुरळ पाडणारे फोटो छापले जातात. कंपनी पुरस्कृत या डाएट प्लॅन्सचा पगडा एवढा घट्ट असतो की, अनेक सुशिक्षित, नामांकित आणि उच्चपदस्थ व्यक्तीदेखील ‘मी अमुक डाएट प्लॅन पाळतो’ असे मोठय़ा अभिमानाने स्नेही जनांना सांगत राहतात. येनकेनप्रकारेन प्रसिद्धी आणि व्यावसायिक नफा कमावणे हा उद्देश या प्रत्येक प्लान्समध्ये आढळून येतो.
याची प्रचीती घेण्यासाठी काही प्रसिद्ध डाएट प्लॅन्सचा विचार करणे आवश्यक ठरते.

1. ऍटकिन्स डाएट – डॉ. रॉबर्ट ऍटकिन्स यांनी या विषयावर 1972 मध्ये एक पुस्तक लिहिले आणि तेव्हापासून वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक जगातला प्रसिद्ध डाएट प्लान मानला जातो. याचे चार टप्पे असतात.

पहिला टप्पा – दोन आठवडय़ांच्या या टप्प्यात रोजच्या आहारात पिष्टमय पदार्थ 20 ग्रॅमपेक्षा कमी ठेवायचे असतात. आहार 14 दिवस, शिवाय 8 ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच पाहिजे. या टप्प्यात वजन कमी व्हायला सुरुवात होते.

दुसऱया टप्पा – पुढचे 14 दिवस पहिल्या टप्प्यातील आहाराला फळे, फळभाज्या आणि डाळी, शेंगदाणे वगैरेची जोड देणे अपेक्षित असते.

तिसरा टप्पा- या टप्प्यात पहिल्यापेक्षा थोडे जास्त गोड आणि पिठूळ पदार्थ खायला हरकत नसते.

चौथा टप्पा – यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील पालेभाज्यांच्या समवेत सकस असे पिठूळ पदार्थ खायला हरकत नसते. मात्र वजन यात कायम राहते.

तोटे – पिष्टमय पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. या डाएटमध्ये त्यांच्यावर निर्बंध आल्यामुळे खूप गळून गेल्यासारखे होते. अनेकांना गरगरल्यासारखे होणे, चक्कर येणे असे त्रास होतात. फळे, तृणधान्ये वर्ज्य केल्याने, शरीरात काही अत्यावश्यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. हे डाएट करणाऱया व्यक्ती बहुतांशी आजच्या जीवनशैलीतील चिप्स, पिझ्झा, वडे, कोल्डिंक्स अशी चटकदार खाद्य-पेये खाण्यास चटावलेले असतात. साहजिकच थोडय़ाच दिवसात ही डाएट सोडून दिली जातात.

2. केटोजेनिक डाएट – याला ‘लो कार्ब हाय फॅट डाएट’ (एल.सी.एच.एफ.) असे म्हणतात. यामध्ये पिष्टमय पदार्थ अगदी कमी खायचे असतात, पण त्याची भरपाई भरपूर तैलयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ खाऊन केली जाते. यामुळे शरीरात ‘केटोसिस’ नावाची एक रासायनिक अवस्था निर्माण होते. यामध्ये पिष्टमय पदार्थांपासून जेवढी ऊर्जा कमी मिळते ती यकृतात साठवलेल्या चरबीतून मिळवली जाते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटते, मात्र प्रथिने योग्य रीतीने त्यांचे कार्य करतात, असा हा फंडा आहे.

तोटे – केटोजेनिक डाएटमुळे होणाऱया केटोसिसमध्ये कमालीचा थकवा येतो आणि डोके सुन्न होऊन जाते. अतिप्रमाणात चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्या रुग्णांना ते धोकादायक ठरू शकते. जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर यांची कमतरता भासू लागते. यामुळे हाडे ठिसूळ होणे, रक्त कमी होणे, अपचन, तसेच चयापचय क्रियेचे त्रास उद्भवू शकतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे केटोसिसमधून केटोऑसिडोसिस ही गंभीर समस्या उद्भवते. यात रक्ताची आम्लता कमालीची वाढते. मधुमेही रुग्णांची रक्तशर्करा 300-500च्या वर जाते. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. मधुमेह नसलेल्या रुग्णांच्या श्वसनावर, मूत्रपिंडांवर आणि यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतात.

3. संपूर्ण शाकाहारी आहार – यात प्राण्यांपासून निर्माण होणारे खाद्यपदार्थ म्हणजे मटण-मासे वर्ज्य केले जातात आणि चपाती, भाकरी, ब्रेड, भाजीपाला, फळे, असे वनस्पतीजन्य पदार्थ स्वीकारले जातात. यामध्ये काही लोक अंडी शाकाहारी मानून ती खातात. तर काही लोक दूध हे प्राणिजन्य मानून तेही घेत नाहीत.

शाकाहारी व्यक्तींनी आहारातील पदार्थांचे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर वजन कमी होते आणि आरोग्य उत्तम राहते. मात्र मांसाहारातून मिळणारी अत्यावश्यक अमिनो ऑसिडस् हे प्रथिनामधील मूलघटक कमी पडतात त्यामुळे शरीराची आणि स्नायूंची वाढ थोडी कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे बी-12 आणि ड-3 या जीवनत्त्वांचा अभाव निर्माण होऊ शकतो.

4. व्हेगन डाएट – खरे तर हा डाएट फंडा नसून एक जीवनपद्धती आहे. पर्यावरण, अहिंसा आणि प्राणिमात्राप्रती सहिष्णुता हे याचे तत्त्व आहे, पण गेल्या काही वर्षांत एक फॅड म्हणून
अनेकांनी याचा स्वीकार केला आहे. यात दूध, सर्वप्रकारचे दुग्धजन्य पदार्थ; अंडी आणि पोल्ट्रीमधील पदार्थ, एवढेच काय मधदेखील प्राणिजन्य मानले जाऊन आहारातून वर्ज्य केले जातात.
तोटे – यामध्ये सुरुवातीला वजन कमी होते, पण वनस्पतीजन्य आहार घेता घेता अति शर्करायुक्त गोडाचे पदार्थ, तेलकट आणि तळीव पदार्थ जास्त खाण्याकडे कल वाढतो आणि उलट वजन वाढ होऊ लागते. त्याचप्रमाणे फळे आणि भाजीपाला यातून खनिजे आणि फायबरसारखे घटक या आहारातून मिळाले, तरी अत्यावश्यक अमिनो ऑसिडस, कॅल्शियम, लोह, ब-12 आणि ड-3 हे घटक खूपच कमीच मिळतात. परिणामतः या व्यक्ती पांढुरक्या पडतात, स्नायू दुबळे पडून, हाडे कमकुवत होऊन कृश दिसू लागतात. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुलनेने घटते आणि त्यांना साथीचे आजार सहज होऊ शकतात.

5. वेट वॉचर्स – जीन निडेच नावाच्या एका गृहिणीने 1963 साली हे डाएट शोधून काढले. मागच्या वर्षी जगप्रसिद्ध अमेरिकन टीव्ही समालोचक ओफ्रा विन्फ्रे हिने या पद्धतीचा वापर करून आपले वजन कमी केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे याला आणखीनच प्रसिद्धी मिळाली. यात आहाराचे नियोजन, व्यायाम आणि सपोर्ट ग्रुप वापरला जातो या पद्धतीत लोक दर आठवडय़ास एकमेकांना भेटून, संयोजकांद्वारे आपल्या अडचणी दूर करतात.

6. इंटरमिटंट फास्टिंग – दीक्षित डायेट- सध्या खूप चर्चेत असलेल्या डॉ. जनार्दन दीक्षित यांच्या आहारपद्धतीमध्ये खालील गोष्टी पाळायला सांगतात.

कडक भूक लागायच्या दोन वेळा ओळखा आणि त्यावेळेसच जेवण करा. जेवण 55 मिनिटांत संपवा. अन्न पोटात गेल्यावर स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवू लागते ते 55 मिनिटे स्त्रवत राहते. दोन वेळा जेवल्यावर ते दिवसातून दोनदाच स्त्रवते. सतत खात राहिल्यावर इन्सुलिन सतत स्त्रवून ते निर्माण करणाऱया पेशी कमकुवत होतात आणि मधुमेह होण्याची शक्यता निर्माण होते. दोन जेवणांमध्ये काही खाऊ नका. अगदी उपास सहन होत नसेल तर पाणी, लिंबूपाणी, लेमन टी घेऊ शकता. या डाएटचा अनेकांना उपयोग झाल्याचे सांगण्यात येते, पण काही जणांना दोन जेवणांच्या मध्ये अजिबात न खाणे जमत नाही. दिवसातून 4 वेळा खाण्याच्या आरोग्यशास्त्राच्या पद्धतीच्या हे विरुद्ध असल्याने बऱयाच डॉक्टरांचा याला विरोध आहे.

ही डाएटस काही दिवसांपुरतीच मर्यादित परिणाम करतात. त्यामुळे जेव्हा पुन्हा नेहमीचा आहार सुरू होतो, तेव्हा हमखास वजन वाढतेच. या प्रकारच्या डाएटस्मध्ये ‘बॉडी फॅटस्’ म्हणजे शरीरातील एकूणातील चरबी कमी होण्याचं प्रमाण अल्प असते. जवळपास सर्वच पद्धतीमध्ये चयापचय क्रिया, रोगप्रतिकारशक्ती मंदावतात. चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा जाणवणे, केस गळणे, मूत्रपिंडाचे आजार संभवतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या