आशियाचा स्थापत्य वारसा – हिंदुस्थानचा आशियातील सांस्कृतिक वारसा

>> डॉ. मंजिरी भालेराव

हिंदुस्थानी संस्कृतीने प्रभावित झालेल्या देशांमधले साहित्य हे रामायण, महाभारत, हरिवंश, पुराणे, जातककथा इ. ग्रंथांवर आधारित आहे. तेथील कायदे आणि राजनीती हे मनुस्मृती, कौटिलीय अर्थशास्त्र इ. ग्रंथांवरच आधारित आहे. त्यामुळे इतक्या शेकडो वर्षांनी आजही या आशियातील बहुसंख्य देशांचे सांस्कृतिक अधिष्ठान हिंदुस्थानीच आहे हे स्पष्ट दिसते. या सर्वांचे श्रेय मात्र हिंदुस्थानबाहेर पडलेल्या हिंदुस्थानींनाच दिले पाहिजे.

हिंदुस्थानातील व्यापारी, प्रवासी हे हिंदुस्थानच्या सीमा ओलांडून आशियातील विविध देशांत खूप प्राचीन काळीच पोहोचले होते. त्या त्या देशातील स्थानिक संस्कृतीवर हिंदुस्थानी धर्माची आणि संस्कृतीची छाप पडलेली स्पष्ट दिसते. यामध्ये आशिया खंडातील विविध देशांचा समावेश होतो. या देशांना सामान्यपणे ‘बृहत्तर भारत’ असे म्हणावे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. हिंदुस्थानी धर्म, पुराणकथा, कला, स्थापत्य, लिपी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.
या देशांमध्ये असलेला एक देश म्हणजे श्रीलंका. ताम्रपर्णी, सिंहल देश अशा नावांनी प्रसिद्ध असलेला हा देश फार लवकर हिंदुस्थानच्या संपका&त आला. तेथील ‘महावंस’ या ग्रंथात दिलेल्या परंपरेनुसार इ.स. पूर्व 6व्या शतकात राजकुमार विजय आपल्या 700 लोकांना घेऊन वंगदेशातून श्रीलंकेत आला. त्याआधी तिथे यक्ष आणि नागलोक राहत होते. सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे इसवी सनपूर्व तिसऱया शतकात महेंद्र आणि संघमित्रा ही अशोकाची मुले धर्मप्रसार करण्यासाठी श्रीलंकेत गेली. त्यांनी श्रीलंकेमध्ये राजा तिष्य याला आणि इतर अनेक लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. गौतम बुद्धाला बोधगया येथे ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती, त्या बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेत अनुराधपूर इथे लावण्यात आली. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात इथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. अनेक ठिकाणी बौद्ध स्तूप आणि विहार (भिक्षू निवास) बांधले गेले, लेणी कोरल्या गेल्या. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय म्हणजे अनुराधपूर येथील स्तूप, मध्य श्रीलंकेत असलेल्या डम्बुल्ल येथील कोरीव लेणी, पोलोन्नरुवा इ. अशा प्रकारची अनेक स्थळे या देशात आहेत. बौद्ध धर्माबरोबर हिंदू देवदेवतांची पूजा आणि उपासनाही श्रीलंकेत पोचली होती.

दक्षिण हिंदुस्थानातून तामीळ राजे श्रीलंकेवर हल्ला करून, त्यांच्यावर विजय मिळवून त्यांच्या काही भूभागावर राज्य करत असत. याबद्दलचे अनेक उल्लेख श्रीलंकेतील ‘दीपवंस’ आणि ‘महावंस’ या ग्रंथांतून मिळतात. विजय नावाचा राजकुमार हिंदुस्थानातून श्रीलंकेत गेल्यानंतर बराच काळ स्थानिक राजांचे राज्य होते. नंतर इ.स. पूर्व तिसऱया शतकाच्या शेवटी सेन आणि गुत्तिक या दोन तामीळ प्रमुखांनी स्थानिक राजा सुरतिस्स याचा पराभव करून अनुराधपूरवर ताबा मिळवला आणि सुमारे 22 वर्षे राज्य केले. त्यानंतर राजा सुरतिस्साचा वारस ‘असेल’ याने त्यांना हरवून गेलेले राज्य परत मिळवले, पण लवकरच त्याचा सुरुवातीच्या चोलांचा एक राजकुमार एल्लार (स्थानिक नाव एलालन) याने पराभव केला आणि इ.स.पूर्व 3ऱया शतकाच्या शेवटी स्वतःला श्रीलंकेचा राजा म्हणून घोषित केले. हा राजा अतिशय न्यायी आणि समजूतदार म्हणून प्रसिद्ध होता. नाते किंवा मैत्री न पाहता तो न्यायनिवाडा करत असे. असे म्हणतात की, त्याच्या मुलाच्या रथाच्या चाकाखाली एक वासरू मेले म्हणून त्याने त्याच्या मुलाला तसाच रथाच्या चाकाखाली मृत्यू यावा असा दंड ठोठावला. या राजाला श्रीलंकेच्या इतिहासात मोठा मान दिलेला दिसतो. त्याला ज्या दुटुगामुणू राजाने हरवले आणि श्रीलंकेचे राज्य परत मिळवले, त्यानेसुद्धा राजा एलार याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ स्तूप बांधला.

पुढे परत इ.स.च्या 10 व्या शतकानंतर चोलांनी इथे आपला जम बसवला. राजराजा (1) चोल याने स्वतःला ‘मुंमुडी-सोल-मंडलं’ (तीन मुकुट असलेला – चेर, पांडय आणि सिंहल देशांचा अधिपती) अशी उपाधी घेतली होती. त्यानंतर अनुराधपूरहून राजधानी पोलोनरुवा येथे नेली आणि तिचे नाव जनंतमंगलम असे ठेवले. हे राजराजा (1) चोलाचेही बिरूद होते. त्याचा अधिकारी तली कुमारन याने महातित्थ (सध्याचे मन्नारजवळील मंतोट) येथे एक शिवाचे मंदिर बांधले. त्याचे नाव राजराजेश्वर असे ठेवले. राजराजाच्या काळात पोलोनरुवा येथेही शिवाची मंदिरे बांधली गेली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजेंद्र चोल (1) याने तर संपूर्ण श्रीलंका आपल्या अधिपत्याखाली आणली. त्यावेळेस खूप मोठय़ा प्रमाणावर तामिळ लोक श्रीलंकेत वास्तव्यास गेले आणि तिथेच राहिले, पण या मोहिमेपेक्षाही राजेंद्राच्या कारकिर्दीत झालेली महत्त्वाची मोहीम म्हणजे शैलेंद्र साम्राज्यावरील स्वारी ही होय. आग्नेय आशियातील मलाया द्वीपकल्प, जावा, श्रीविजय (सुमात्रा) आणि त्याच्या आसपासची पन्नई, मलडयूर, इल्लंसोक तसेच मप्पप्पलम, तलइत्तकोलम, इलामुरीदेशम, मदमलिंगम, मनक्कवरम तसेच कदारम इत्यादी लहान लहान बेटे मिळून शैलेंद्र साम्राज्य बनले होते. राजेंद्राने त्यांच्या विरुद्ध आरमारी मोहीम काढली. ही मोहीम हिंदुस्थानच्या इतिहासात फार वैशिष्टय़पूर्ण अशी होती. कारण अशा स्वरूपाची ही पहिलीच मोहीम होती. सुरुवातीला शैलेंद्र साम्राज्याशी राजेंद्राचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यात संघर्ष कशामुळे निर्माण झाला, हे माहीत नाही. त्याच्या आरमाराने बंगालचा भाग जिंकून घेतला. नंतर मलाया द्वीपकल्प ताब्यात घेऊन शैलेंद्र राजा संग्रामविजयोत्तुंगवर्मन याचा पराभव केला व त्याची राजधानी कडारम जिंकून घेतली. अशा रीतीने राजेंद्राने शैलेंद्र साम्राज्य खिळखिळे केले. गंगेच्या किनाऱ्यापासून आग्नेयेकडे जावा, सुमात्रा, मलायापर्यंत आपली विजयपताका फडकावली.

त्यांच्याआधी खरे तर तामीळनाडूतील पल्लव, पांडय या राजघराण्यांतील लोकांनीही संपूर्ण दक्षिण आशिया, आग्नेय आशिया या भागात अनेक वेळा आधी व्यापाराच्या निमित्ताने आणि नंतर आपले आरमार पाठवून काही काही देशांतील भाग ताब्यात घेतले होते. तिथे अनेक हिंदुस्थानींनी कायमस्वरूपी वास्तव्य करून हिंदुस्थानी संस्कृती रुजवली. पुढे त्या देशांचे भवितव्य बदलले. तिथे इस्लामचा प्रभाव वाढला, पण हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रभाव काही कमी झाला नाही. चीन, जपान, कोरिया, थायलंड, लाओस, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंका या देशांमध्ये आजही बौद्ध धर्माचे अखंडितपणे पालन सुरू आहे. इंडोनेशिया आज जगातील सर्वात जास्त इस्लामी लोकसंख्या असलेला देश आहे, पण तिथल्या संस्कृतीची नाळ हिंदुस्थानशी जुळली आहे. या देशांमध्ये विकसित झालेले कला आणि स्थापत्य हिंदुस्थानी कला आणि स्थापत्याचेच स्थानिक पद्धतीने झालेले आविष्कार आहेत. इतक्या शेकडो वर्षांनी आजही या आशियातील बहुसंख्य देशांचे सांस्कृतिक अधिष्ठान हिंदुस्थानीच आहे हे स्पष्ट दिसते. याचे श्रेय मात्र हिंदुस्थानबाहेर पडलेल्या हिंदुस्थानींनाच दिले पाहिजे.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
[email protected]