श्रीकृष्णाचे धर्मसंस्थापनेचे कार्य

>> डॉ. रामनाथ खालकर

धर्मसंस्थापना म्हणजे सत्य, अहिंसा, सज्जनता, स्वातंत्र्य, सात्त्विकता, मानवता, आत्मविश्वास, कर्तव्यबुद्धी इत्यादी. नीतिमूल्यांचे वैयक्तिक जीवनात आचरण करून त्यांना समाजात प्रस्थापित करणे होय. तसेच सर्वसामान्य लोक या नैतिक मूल्यांचे आचरण करू शकतील अशी सामाजिक व राजकीय परिस्थिती निर्माण करणे म्हणजे धर्मसंस्थापण होय. श्रीकृष्णाने वैयक्तिक जीवनात उपरोक्त नीतिमूल्यांचे आचरण केले व धर्मसंस्थापनेसाठी यादव व पाडवांकडून सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणले.

युद्धापासून परावृत्त होऊ पाहणाऱया अर्जुनास युद्धप्रवृत्त करण्यासाठी महाभारत युद्धाच्या पहिल्याच दिवशी कृष्णाने कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली. याच गीतेतील चौथ्या अध्यायातील सातव्या व आठव्या श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनास कोणत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत धर्मसंस्थापना करणे अपरिहार्य होते व ती कशा प्रकारे करता येते याविषयी अगदी स्पष्टपणे सांगितले की,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।

अर्थात ज्या ज्या वेळेस समाजात धर्म दुर्बल होतो व अधर्माचा प्रभाव वाढतो त्यावेळेस धर्मसंस्थापना अपरिहार्य होते व त्यासाठी मी जन्म घेतो. धर्मसंस्थापनेसाठी समाजात नीतिमूल्यांचे आचरण करणाऱया सज्जनांचे रक्षण करणे व सर्वसामान्य लोकांच्या नीतिमूल्यांच्या आचरणात अडथळा आणणाऱया दुर्जनांचा नाश करणे या दोन्हीही गोष्टी सारख्याच आवश्यक ठरतात.

श्रीकृष्ण व पांडवांच्या काळात नीती वा धर्म दुर्बल झाला होता याची अनेक कारणे आहेत. त्या काळी हिडिंब, बक, किर्मीर, जटासुर यांसारखे क्रूर व नरमांसभक्षक राक्षस अरण्यात राहत होते. ते सामान्य लोकांचा वध करत. स्त्र्ायांचे अपहरण करत. ऋषींच्या आश्रमांचा विध्वंस करत. त्यांच्या यज्ञामध्ये विघ्ने निर्माण करत.

तसेच श्रीकृष्ण व पांडवांच्या काळात मथुरेत कंस, हस्तिनापुरात धृतराष्ट्र व दुर्योधन, गांधार प्रांतात शकुनी, मगध प्रांतात जरासंध, प्राग्ज्योतिषपुरात नरकासुर, चेदी प्रांतात शिशुपाल, सिंधू प्रांतात जयद्रथ, त्रिगर्त प्रांतात सुशर्मा असे अतिशय सामर्थ्यशाली, परंतु अधर्माचरणी राजे होते. या सर्व अधर्माचरणी राजांच्या आश्रयाने त्या काळी अधर्म प्रभावी होतो व धर्मास ग्लानी येते. या दुप्रवृत्त राजांच्या प्रभावामुळे धर्माचरण करणारे सामान्य लोक असुरक्षित झाले होते. ते स्वातंत्र्य, सत्य, अहिंसा इत्यादी नीतिमूल्यांचे आचरण करू शकत नव्हते. म्हणूनही धर्मास दौर्बल्य प्राप्त झाले होते. त्या काळात धर्माचरण करणारेही शेकडो राजे होते, परंतु ते अत्यंत दुर्बल होते. ते अधर्माचरणी राजांशी युद्ध करू शकत नव्हते. एकटय़ा जरासंधाने आपल्या राक्षसी सामर्थ्याच्या जोरावर शहाऐंशी राजांना बंदिवासात डांबले होते. नरकासुराने सोळा हजार स्त्र्ायांचे अपहरण करून त्यांना बंदिवासात ठेवले होते. शकुनी, शिशुपाल, सुशर्मा, जयद्रथ हे पांडवांच्या विरोधात व कौरवांच्या बाजूने उभे राहिले. धृतराष्ट्र व दुर्योधन, दुःशासन, शकुनी व कर्ण यांनी धर्माचरण करणाऱया पांडवांना अनेक षड्यंत्रे करवून वनवास व अज्ञातवासात पाठवले. पांडवांबरोबर ‘धर्मा’सही वनवास व अज्ञातवासात राहावे लागले.

अशा अत्यंत प्रतिकूल सामाजिक व राजकीय परिस्थितीत श्रीकृष्णाने मथुरेतील कंसासारख्या दुर्वृत्त राजास सिंहासनावरून खेचून मारले व तिथे धर्माचरणी उग्रसेनास राजा बनविले. स्त्र्ायांचे अपहरण करणाऱया नरकासुरास मारून त्या स्त्र्ायांचे रक्षण केले. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. अनेक राजांना बंदिवासात ठेवणाऱया जरासंधाचा भीमाकडून वध केला. युधिष्ठराच्या राजसूय यज्ञप्रसंगी शिशुपालाचा शिरच्छेद केला. महाभारत युद्धात पांडवांकडून द्रौपदीचे वस्रहरण करणाऱया दुर्योधन, दुःशासन, शकुनी व कर्णास पांडवांकडून मारले. या सर्व राजांनी आपल्या दुष्कृत्यांनी मानवतेस कलंकित केले होते. श्रीकृष्णाने त्यांचा वध केला व करविला. तसेच महाभारत युद्धात श्रीकृष्णाने काही महत्त्वाच्या प्रसंगी धर्माचरणास फाटा देऊन म्हणजे आपद्धर्माचा स्वीकार करून भीष्म, द्रोण व कर्णाशी लढताना धर्मनिष्ठ पांडवांचे रक्षण केले. युधिष्ठरादी पांडवांनी आपली धर्मनिष्ठा जपण्यासाठी वनवास व अज्ञातवासही सहन केला. अवमान व आत्मक्लेष सहन केले. प्रसंगी भिक्षा मागून उपजीविका केली, पण धर्म व नीती सोडली नाही. पांडवांच्या या धर्मनिष्ठsमुळे कृष्ण त्यांच्या पाठीशी उभा राहिला व त्यांचे रक्षण केले. श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेसाठी म्हणजेच धर्माचा समाजात प्रभाव वाढविण्यासाठी व अधर्मास निप्रभ करण्यासाठी दुर्योधनादी दुर्वृत्तांचा नाश व युधिष्ठरादी सप्रवृत्तांचे रक्षण केले.

श्रीकृष्णाच्या काळात ‘राजेशाही’ ही शासन व्यवस्था अस्तित्वात होती. प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे प्रथम कर्तव्य होते. तसेच सामान्य लोकांना निर्विघ्नपणे सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता इत्यादी मूल्यांचे आचरण करता येईल अशी अनुकूल सामाजिक व राजकीय परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी राजावर होती. ‘परिस्थिती राजा घडवीत नाही तर राजा चांगली किंवा वाईट परिस्थिती निर्माण करू शकतो’’ असे भीष्म युधिष्ठरास सांगतात. राजा कलियुगात सत्ययुग व सत्ययुगातही कलियुग निर्माण करू शकतो. म्हणून महाभारतात राजास ‘युग’ म्हटले आहे. राजा योग्य ती सामाजिक परिस्थिती निर्माण करून समाजातील नीतिव्यवस्था स्थिर करू शकतो. म्हणून श्रीकृष्णाने कंस, नरकासुर, जरासंध, जयद्रथ, शिशुपाल व शेवटी दुर्योधनादी अधर्माचरणी राजांचा वध करून त्यांच्या जागी उग्रसेन व युधिष्ठरासारख्या धर्मनिष्ठांना राजा बनविले. श्रीकृष्णाने केवळ धर्मसंस्थापनेसाठीच दुप्रवृत्तांची राज्ये मोडली व सप्रवृत्तांची राज्ये मांडली. श्रीकृष्णाने केलेली ही धर्मसंस्थापना दीर्घकाळपर्यंत टिकली.

कंस स्वतःच्या पित्यास म्हणजे उग्रसेनास सिंहासनावरून दूर करून मथुरेचा राजा होतो. तो दुराचरणी जरासंधाशी संधान बांधून त्याच्या दोन मुलींशी लग्न करून आपले सामर्थ्य वाढवतो. त्याने श्रीकृष्णाच्या मातापित्यास म्हणजे वसुदेव व देवकीस तुरुंगात ठेवले. त्यामुळेच कृष्णाचा जन्म मथुरेतील तुरुंगात झाला. त्याने वसुदेव व देवकीच्या सात नवजात बालकांना क्रूरपणे मारले. मथुरेत दहशत निर्माण केली. श्रीकृष्णास मारण्यासाठी वेगवेगळी षङ्यंत्रे रचली. मथुरावासीयांना कंसाच्या अत्याचारातून सोडविण्यासाठी श्रीकृष्णाने कंसास सर्वांसमक्ष सिंहासनावरून खेचून मारले. मथुरेतील लोकांनी याबद्दल कृष्णाचा सत्कार केला. त्यानंतर कृष्णाने उग्रसेनास मथुरेचा राजा बनविले. तसेच जरासंधाच्या वारंवार होणाऱया आक्रमणांना मथुरेतील लोक कंटाळले आहेत असे ध्यानात आल्यावर यादवांसह मथुरा सोडली व पश्चिमेस समुद्राच्या किनाऱयावर द्वारका नगरी निर्माण केली. आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णाने तिथेही उग्रसेनास राजा बनविले. श्रीकृष्णाने प्रयत्नपूर्वक या नवनिर्मित राज्याचे रक्षण केले. उग्रसेनाच्या अधिपत्याखालील हे नवे राज्य महाभारत युद्धानंतर छत्तीस वर्षे टिकल्याचा स्पष्ट उल्लेख महाभारतात आहे. उग्रसेनाच्या कार्यकाळात द्वारकेत कृष्णाच्या मार्गदर्शनामुळे हे ‘धर्मराज्य’ इतक्या दीर्घकाळपर्यंत टिकले.
पितामह भीष्मांच्या हस्तिनापूरच्या राज्य विभाजनाचा प्रस्ताव पांडवांना स्वीकारण्यास सांगून श्रीकृष्णाने इंद्रप्रस्थात युद्धिष्ठरास राज्याभिषेक केला. व्यास व कृष्णाच्या मार्गदर्शनामुळे हे नवसंपादित राज्य पांडवांनी अल्पावधीत भरभराटीस आणले. युधिष्ठराने हे राज्य धर्माच्या अधिष्ठानावर उभे केले.

अधिष्ठानवनी लक्ष्मी : परायणवती मति।
वर्धमानो।खिलो धर्मस्तेनासीत् पृथिवीक्षिताम्।।

असे महाभारताच्या आदीपर्वातील दोनशे एकविसाव्या अध्यायात युधिष्ठराच्या नवनिर्मित राज्याचे वर्णन आले आहे. अर्थात युधिष्ठराच्या राज्यात लक्ष्मी स्थिर झाली. बुद्धी धर्मपरायण झाली व धर्म वाढला. दुर्दैवाने द्युताच्या व्यसनास बळी पडून युधिष्ठर हे स्वसंपादित व समृद्ध असे राज्य द्युतात हरतो. पांडवांना वनवास व अज्ञातवासात राहावे लागते. पांडवांचा वनवास व अज्ञातवास संपल्यानंतरही प्रतिज्ञेप्रमाणे दुर्योधन इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांना देत नाही. शेवटी कौरव व पांडवांमध्ये युद्ध होते. कौरवांचा या युद्धात अंत होतो. पांडवांचा युद्धात जय होतो. पांडवांना इंद्रप्रस्थासहित हस्तिनापूरचे राज्य मिळते. श्रीकृष्णाने युधिष्ठरास हस्तिनापुरात राज्याभिषेक केला. युधिष्ठरानेही हे राज्य कृष्णाच्या सल्ल्याने महाभारत युद्धानंतर छत्तीस वर्षे समर्थपणे सांभाळले. श्रीकृष्णाच्या धर्मसंस्थापनेचे हे फलित होय.