‘मृत्यू’च्या बातमीमागील रणनीती

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

हिंदुस्थानी संसद, कश्मीर विधानसभा, पठाणकोट आणि पुलवामा यांसह हिंदुस्थानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असणारा ‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्या कथित मृत्यूचे वृत्त मध्यंतरी पाकिस्तानी माध्यमांतून झळकले.या वृत्ताचे पाकिस्तानने खंडन केले आहे. शिवाय मसूदचीच कथित ऑडिओ क्लीपही जारी करण्यात आली आहे.हे खरे असले तरी त्याच्या कथित मृत्यूची बातमी आताच समोर येण्यामागे काही रणनीती असू शकते. ती जाणून घेणे आवश्यक आहे.

जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर आशिया खंडात आणि जगभरात या वृत्ताची चर्चा सुरू होती. याचे कारण ‘जैश ए मोहम्मद’ ही पाकिस्तानपुरस्कृत संघटना केवळ हिंदुस्थानातच दहशतवादी कारवाया करताना दिसत असली तरी मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. ओसामा बिन लादेन आणि त्याने एकत्र काम केले आहे. हरकत अल अन्सारी ही ‘जैश ए मोहम्मद’ची मातृसंस्था आहे. तसेच मसूद अजहर हा प्रभावी वक्ता म्हणून ओळखला जातो. तरुणांत जिहादी उठावाची भावना जागृत करण्याच्या कामी मसूद अजहर हा एखाद्या हुकमी एक्क्यासारखा मानला जातो. त्यामुळेच जिहादी दहशतवादाने बाधित असणाऱया सर्वच राष्ट्रांसाठी या बातमीचे महत्त्व वेगळे आहे. तथापि, हे वृत्त चार प्रमुख घटनांच्या पार्श्वभूमीवर आले आहे. एक म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी ‘जैश ए मोहम्मद’ने स्वीकारली होती. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जैश’ची चर्चा सुरू झाली. दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच पॅरिसमध्ये ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ या संस्थेची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा देण्यात आला की, जर तुम्हाला ग्रे लिस्टमधून बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला तत्काळ ‘जैश ए मोहम्मद’ आणि मसूद अजहरवर कारवाई करावी लागेल. याचदरम्यान 1 मार्च रोजी आणखी एक घटना घडली ती म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड या तीन देशांनी पुरस्कृत केलेला ‘यूएन डेसिग्नेटेड टेररिस्ट’ म्हणून घोषित करण्यासंदर्भातील ठराव मांडण्यात आला. सध्या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून, इतकेच नव्हे तर इस्लामिक देशांकडून वाढत असलेला दबाव आणि वातावरण पाहता यावेळी या ठरावाला चीनकडूनही समर्थन दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

चौथी घटना म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना 19 वर्षांमध्ये पहिल्यांदा हे मान्य केले की, अजहर मसूद हा पाकिस्तानच्या भूमीवर आहे. आजवर पाकिस्तान सातत्याने ही गोष्ट नाकारत आला आहे. 1999 मध्ये कंदहार विमान अपहरणाचे प्रकरण झाले. त्यानंतर तो पाकिस्तानातच लपून हिंदुस्थानविरोधात कारवाया करत राहिला आहे. 2001 मध्ये हिंदुस्थानी संसदेवर झालेला हल्ला असेल किंवा कश्मीर विधानसभेवर झालेला हल्ला असेल किंवा अलीकडच्या काळातील पठाणकोट, पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये अजहरचा हात होता. असे असूनही पाकिस्तान ‘जैश’शी आणि मसूद अजहरशी असणारे संबंध आणि पाठिंबा, इतकेच नव्हे तर त्याच्या ठावठिकाण्याविषयीची माहिती नाकारत आला आहे. आता मात्र पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव इतका प्रचंड वाढला आहे की जर पाकिस्तानने वेळीच अजहरविरोधात कारवाई केली नाही तर भविष्यात या देशाला मिळणारे आर्थिक मदतीचे स्रोत तसेच परदेशी गुंतवणूकही कायमची बंद होऊ शकते. ही चहूबाजूंनी झालेली कोंडी लक्षात घेऊन अजहरच्या मृत्यूच्या वृत्ताकडे पाहावे लागेल.
या कोंडीतून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणूनही कदाचित पाकिस्तानने अजहरच्या मृत्यूचे वृत्त जाणीवपूर्वक समोर आणले असण्याची शक्यता आहे. अजहरच मरण पावला असे घोषित केले की सध्याची सर्वच कोंडी संपून जाईल असा विचार यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता आलेल्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला अजहरला हिंदुस्थानकडे सुपूर्द करावे लागण्याची शक्यता आहे. अजहर मसूदचे कनेक्शन तालिबान, अल कायदाशी आहे. त्याला हिंदुस्थानच्या स्वाधीन केल्यास पाकिस्तानचे सर्व काळे धंदे उजागर होतील, उघडकीस येतील. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करून स्वतःचा बचाव करणे अशी पाकिस्तानची खेळी असू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे अजहरच्या मुद्दय़ावरून हिंदुस्थानात प्रचंड रोष आहे. अशा वेळी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यास हा रोष शांत होऊन दोन्ही देशांतील तणावही निवळेल.

लादेन, मुल्ला ओमर, अबू बक्र अल बगदादी यांच्याबाबतही असा प्रकार घडलेला होता. त्यांच्या निधनापूर्वीच त्यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्या होत्या. त्याच प्रकारची मोडस ऑपरेंडी अजहरच्या मृत्यूवार्तेमागे दिसते. त्यामुळे आता मृत्यूवार्ता पसरवून अजहरवरून सर्वांचे लक्ष विचलित करायचे आणि त्याला पुढच्या हल्ल्यासाठीची तयारी करण्यास वाव द्यायचा अशीही रणनीती पाकिस्तानकडून आखली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मसूद अजहर जर खरंच मरण पावला असेल तर तो कशा पद्धतीने मेला यापेक्षा पाकिस्तानात मरण पावला हे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी हिंसाचार घडवून आणणारे सर्व दहशतवादी शस्त्र्ातस्करी, अमली पदार्थांची तस्करी करणारे माफिया हे सर्व पाकिस्तानातच अबोटाबादमध्ये मारले गेले. हाफीज सईदही पाकिस्तानातच आहे. दाऊद इब्राहिम, झाकीर उर रहमान लकवी हेदेखील पाकमध्येच आहेत. हे केवळ स्थानिक अथवा प्रादेशिक पातळीवरील दहशतवादी नाहीत. त्यांचे लागेबांधे, संबंध हे तालिबान, इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी आहेत. अजहरच्या घटनेमुळे पाकिस्तान ही दहशतवादाची निर्यात करणारी फॅक्टरी असल्याच्या हिंदुस्थानच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.

हिंदुस्थानचा संघर्ष संपणार आहे का?
सरतेशेवटी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, जरी मसूद अजहर मरण पावला असला तरी त्यामुळे हिंदुस्थानचा संघर्ष संपणार आहे का? याचे उत्तर नाही असे आहे. कारण अशा प्रकारचे म्होरके मरण पावले तरी या संघटना काही काळ क्षीण होत असल्या तरी त्यांना नवे नेतृत्व मिळते आणि त्या पुन्हा हिंसाचार करत सक्रियपणाने काम करतच राहतात. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा गेल्या 30 वर्षांतील इतिहास पाहिला तर ‘लष्कर ए तोयबा’, ‘हिजबुल मुजाहिदीन’, ‘जमात उद दवा’ या संघटनांबाबत अशा प्रकारचे टप्पे हे येऊन गेलेले दिसतात. यासंदर्भात अगदी ताजे उदाहरण म्हणजे ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर ‘अल कायदा’ ही दहशतवादी संघटना संपेल किंवा संपली अशी शक्यता वर्तवण्यात आली होती; पण आता लादेनचा मुलगा हमजा सक्रिय झाला असून तो अमेरिकेचा बदला घेणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. इस्लामिक स्टेटच्या बाबतही हेच घडले. अबू बक्र अल् बगदादी मारला गेल्यानंतरही ही संघटना कार्यरतच राहिली. तालिबानच्या मुल्ला ओमरच्या मृत्यूनंतरही ही संघटना दहशतवादी कृत्ये करतच राहिली. त्यामुळे एक म्होरक्या मारला जाणे किंवा मरण पावणे ही बाब दिलासादायक असली तरी त्यामुळे दहशतवादही संपणार नाही आणि दहशतवादी कारवायाही कमी होण्याची शक्यता नाही. म्हणूनच हिंदुस्थानचा दहशतवादाविरोधातील संघर्ष संपण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीवरून या संघटनांना देण्यात येणारा जन्म, त्यांना मिळणारा पाठिंबा, आर्थिक रसद, सामरीक मदत रोखायला हवी. त्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या मुसक्या आवळाव्या लागतील. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मोहीम हिंदुस्थानला राबवावी लागेल. त्याच वेळी पाकिस्तानी लष्कराच्या या विघातक कृत्यांमुळेच आज पाकिस्तान देशोधडीला लागला आहे, भिकेकंगाल झाला आहे हे पाकिस्तानी जनतेला पटवून द्यावे लागेल. हे काम अर्थातच सोपे नाही. ही दीर्घकालीन उपाययोजना आहे. पण त्याची सुरुवात आतापासून करावीच लागेल.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)