समुपदेशनाची गरज

15

>> डॉ. विजय पांढरीपांडे

अभ्यास करणे अन् तो समजणे यात फरक आहे. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो, समाधान लाभते ती सहज साध्यपणे आकलन होते. उलट ज्यात स्वारस्य नसते, ज्याचे दडपण वाटते ते कितीही डोक्यात घातले तरी त्याचे ओझेच वाटते. ज्ञानाचा संबंध फक्त डोक्याशी, बुद्धीशी नाही. तो काळजाशी, भावनेशी, आतल्या तरल मानसिक संवेदनाशी आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. शिक्षकांनी मुलांशी गटागटाने चर्चा केल्या पाहिजेत. आत्महत्येसारखे प्रश्न हे मनमोकळय़ा संवादानेच सुटू शकतील. बळजबरीने नाही. समुपदेशनाची गरज फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर ती पालकांना, शिक्षकांना सर्वांनाच आहे.

मे-जून महिना म्हणजे विद्यार्थी अन् पालकांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे. दहावी-बारावीचे निकाल लागतात. त्या जोडीने पुढच्या प्रवेशाची, करीयर निवडीची चिंता सुरू होते. यंदा राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. 498 गुण मिळविणाऱयांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. दुसरीकडे तेलंगणा राज्यात निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कारण अनेक विद्यार्थ्यांचे निकाल धक्कादायक असे आहेत. त्यामुळे पालकांनी, विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर आता तीन लाखांवर उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जाणार आहेत.

वरील दोन प्रातिनिधिक बातम्या परस्परांशी संबंधित आहेतही अन् नाहीतही. खरे म्हणजे या बातम्यांमुळे मुळात मूल्यांकन पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाषा, विज्ञान अशा विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळतातच कसे, हाच मूलभूत प्रश्न आहे. भाषेत निबंध लिहायचा असतो. कवितेचे रसग्रहण करायचे असते. सारांश लिहायचा असतो, अशी वर्णनात्मक उत्तरं कितीही चांगली लिहिली तरी त्याहीपेक्षा चांगले निश्चितच असणार. मग परीक्षक पूर्णपैकी पूर्ण गुण कुठल्या निकषावर देतात? विज्ञानाच्या पद्धतीदेखील वर्णनात्मक असतात. ज्यात तांत्रिक चुका संभव असतात. शिवाय अशा हुशार मुलांच्या टीव्हीवरील मुलाखती अक्षरशः केविलवाण्या असतात. त्यांच्या उत्तरात, देहबोलीत, प्रसंगावधनतेच्या बाबतीत कुठेही विद्वत्तेची लक्षणं दिसत नाहीत. या सो कॉल्ड हुशार मुलांचे पुढे कॉलेजात, उच्च शिक्षण क्षेत्रात काय होते याचा कुणी अभ्यास केलाय का? ती पुढे सातत्याने पुढील परीक्षांत, स्पर्धांत टिकली, चमकली आहेत का? हे बघणे महत्त्वाचे ठरेल. कारण हुशारीच्या बाबतीत सातत्य महत्त्वाचे असते. आज गुणवान अन् उद्या घसरगुंडी असे चालत नाही. या भरमसाठ गुण‘दाना’मुळे विद्यार्थी, पालक लाडावले आहेत. पुढे कॉलेज प्रवेशाची प्रक्रिया या फुगलेल्या, सुजलेल्या टक्केवारीमुळे जीवघेणी झाली आहे. अनेक चांगल्या कॉलेजेसचे कटऑफ 98-99 टक्क्यांवर स्थिरावले आहे. एकेका मार्काने प्रवेश नाकारले जाताहेत. विद्यार्थी, पालक निराश होताहेत.

विद्यार्थ्यांची परीक्षेतील गुणांची टक्केवारी किंवा श्रेणी अन् प्रत्यक्ष बुद्धिमत्ता याचा अर्थाअर्थी संबंध नसतो हे विद्यार्थी, पालक अन् शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, प्राचार्य या सर्व मंडळींनी समजून घेतले पाहिजे. अर्थात प्रवेश प्रक्रिया राबवायची तर काही तरी निकष ठेवावेच लागतील हे मान्य, पण सगळे काही या गुणांच्या टक्केवारीवरच अवलंबून असावे का? विद्यार्थ्याचे सामान्यज्ञान, कला, क्रीडा क्षेत्रांतील योगदान, त्याचे समाजभान या इतर बाबींचाही विचार करता येईल का? हे पाहणे गरजेचे आहे. असा विचार केला तर प्रवेशाच्या पद्धतीत गोंधळ, भ्रष्टाचार, अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पालक, त्रयस्थ तज्ञ यांच्या मदतीने पारदर्शी पद्धत स्वीकारणे शक्य आहे. ‘परीक्षा’ म्हटली की त्यात सिक्रसी येते अन् गुप्ततेच्या नावाखाली काहीही केले तरी चालते, असा एक समज झालाय. पण त्याही बाबतीत आयआयटीसारख्या प्रवेश परीक्षेच्या, निकाल पद्धतीच्या संदर्भात कोर्टाने हस्तक्षेप करून संबंधितांना वठणीवर आणले आहे. परीक्षेच्या उत्तरांची ‘की’ घोषित करणे, कटऑफ कोणत्या पद्धतीने ठरविले ते सूत्र जाहीर करणे अशा अनेक पारदर्शी पद्धती, न्यायालयाच्या दणक्यानंतर का होईना सुरू झाल्या आहेत, पण आपण न्यायालयाची तरी वाट का म्हणून बसायची? विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, तज्ञ या सर्वांनी मिळून सर्वमान्य पद्धत ठरविणे कठीण नाही. गेली सात-आठ दशके यशस्वी लोकशाही राबविणाऱया देशात ते मुळीच कठीण नाही. त्यासाठी इच्छाशक्ती हवी. स्वार्थापेक्षा न्यायाची चाल हवी. सर्वमान्य निर्णय घेणाऱया व्यवस्थेविषयी आस्था हवी.

दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा. आजकाल पालकांनी पाल्यावर अपेक्षांचे नको तितके ओझे लादले आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला घरातले कौटुंबिक गढूळलेले वातावरण, आंतरिक ताणतणाव हेच कारणीभूत आहे. घरात आईवडिलांत, नवराबायकोतच एकवाक्यता नसते. मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत आईच्या मैत्रिणी काही तरी सांगतात तर आपण आयटी क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात चांगल्या पदावर असल्याने आपल्याला सर्व काही, अधिक चांगले समजते हा वडिलांचा, घरातल्या कर्त्या पुरुषाचा दुराग्रह असतो.

इथे मुलाची क्षमता, योग्यता, त्यांची आवड, निवड दुय्यम ठरते. आपल्याकडील पालकत्वात अन् परदेशातील पाश्चात्य पद्धतीतील पालक संस्कारात हाच मूलभूत फरक आहे. आपण पाश्चात्य पद्धतीला नावे ठेवतो, पण तिकडचे पालक, शिक्षक, तिकडची शिक्षण व्यवस्था ही मुलांना निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देते. अपेक्षा लादल्या जात नाहीत. कलचाचणी घेतली जाते. निवडीचे निकष चुकले तर ते सुधारण्याची वेळीच संधी असते. उलट आपल्याकडे जबरदस्तीने इंजिनीयरिंगला ऍडमिशन घेतलेल्या मुलाला ते विषय पेलले नाहीत तो सतत नापास झाला तरी ‘कसे तरी’ कोर्स पूर्ण कर असा अक्षरशः दम भरला जातो. मुला-मुलीला जर त्या विषयात रस नसेल, शिकवलेले समजत नसेल तर तो शिक्षण कसे काय एन्जॉय करणार?

अभ्यास करणे अन् तो समजणे यात फरक आहे. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो, समाधान लाभते ती सहज साध्यपणे आकलन होते. उलट ज्यात स्वारस्य नसते, ज्याचे दडपण वाटते ते कितीही डोक्यात घातले तरी त्याचे ओझेच वाटते. ज्ञानाचा संबंध फक्त डोक्याशी, बुद्धीशी नाही. तो काळजाशी, भावनेशी, आतल्या तरल मानसिक संवेदनाशी आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. शिक्षकांनी मुलांशी गटागटाने चर्चा केल्या पाहिजेत. आत्महत्येसारखे प्रश्न हे मनमोकळय़ा संवादानेच सुटू शकतील. बळजबरीने नाही. समुपदेशनाची गरज फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर ती पालकांना, शिक्षकांना सर्वांनाच आहे.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या