ठसा – प्रफुल्ल घाग

>> दुर्गेश आखाडे

रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटवत पुढे चित्रपट आणि मालिकांमधून छोटय़ा-छोटय़ा भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे रत्नागिरीतील रंगकर्मी प्रफुल्ल घाग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या रंगभूमीवरचा धडाडीचा रंगकर्मी हरपला आहे. प्रफुल्ल घाग यांना महाविद्यालयीन जीवनापासून अभिनयाची आवड होती. रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. स्टार थिएटर्स रत्नागिरी या रत्नागिरीतील नाटय़ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा सुरू झाला. स्टार थिएटर्समधून राज्य नाटय़ स्पर्धेच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका रंगवल्या. ‘पगला घोडा’सारख्या कठीण नाटकामध्ये त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्याचबरोबर ‘नटरंग’, ‘महाद्वार’, ‘पूर्वार्ध’, ‘काकपिंड’, ‘महाराज मेले’, ‘पक्षी’, ‘खेळ’, ‘नो अपील’, ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. गतवर्षी झालेल्या राज्य नाटय़ स्पर्धेत देवगडच्या यूथ पह्रम देवगड या संस्थेने सादर केलेल्या ‘निर्वासित’ नाटकामध्ये प्रफुल्ल घाग यांनी दमदार भूमिका केली होती. त्यांनी प्राथमिक फेरीत अभिनयाचे रौप्यपदक पटकावले होते. ‘निर्वासित’ हे नाटक प्राथमिक पहिले येऊन या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.

रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीवर नाटक आणि एकांकिका करत असताना चित्रपट व मालिकांमध्ये काम करावे अशी प्रफुल्ल घाग यांची इच्छा होती. अनेक कलाकार तरुणपणी मुंबईत जाऊन छोटय़ा-मोठय़ा भूमिका मिळवण्यासाठी स्ट्रगल करतात. प्रफुल्ल घाग यांनी वयाच्या पंचेचाळीशीनंतर चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी स्ट्रगल सुरू केले. वय वाढले असले तरी त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. सुरुवातीला स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत त्यांना छोटी भूमिका मिळाली होती. तिथून त्यांचा मालिकांमधील प्रवास सुरू झाला. भूमिका छोटी आहे की मोठी आहे हे न पाहता अभिनय करायचा एवढेच त्यांचे ध्येय होते. त्यानंतर त्यांनी ‘घडलंय बिघडलंय’, ‘गाव गाता गजाली’, ‘माती कोकणची नाती जन्माची’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘क्राईम डायरी’, ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकांमधून छोटय़ा-छोटय़ा व्यक्तिरेखा साकारल्या. मालिकांबरोबर चित्रपटांच्या ऑडिशनलाही ते जात असत. ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटातही त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ‘दशक्रिया’ आणि ‘ठाकरे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. त्याचबरोबर ‘सिंड्रेला’, ‘उनाड’, ‘माझा एल्गार’, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’, ‘महेशचा बदला’ आणि पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱया ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. छोटय़ा-छोटय़ा भूमिकांमधून त्यांनी चित्रपट आणि मालिका क्षेत्रामध्ये कोकणातील एक गुणी कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणीही ते चित्रीकरणासाठी जात असत. रत्नागिरीतील कलाकारांना चित्रपट आणि मालिकांमध्ये संधी मिळावी याकरिता रत्नागिरीत अभिनय प्रशिक्षण शिबीर घेण्यासाठी ते धडपड करत असत. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या रत्नागिरी शाखेमध्ये ते दहा वर्षे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते. नाटय़ परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने कास्टिंग डायरेक्टर रोहन म्हापूसकर यांच्या कार्यशाळा आणि शिबीर आयोजित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच रत्नागिरीत झालेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या नियोजनात त्यांचा सक्रिय कार्यकर्ता म्हणूना सहभाग होता. प्रफुल्ल घाग यांना रंगकर्मी ‘पदू’ या नावानेही हाक मारत असत.