‘वर्णा’त काय ठेवले आहे?

409

द्वारकानाथ संझगिरी

ला, पुन्हा एकदा तुम्हाला मी माझ्या लंडनच्या पहिल्या दर्शनाकडे घेऊन जातो. साल १९८३! मी पहिल्यांदाच पाश्चात्य देशात पाय ठेवलेला. तसा मी सनातनी कुटुंबातला, पण सामाजिक विचारांच्या बाबतीतला एक बंडखोर मुलगा! माझे जातपात, धर्म, कामजीवन याबाबतचे विचार, त्या काळाच्या मानाने जहाल. पण हे सर्व पुस्तकी विचार! प्रत्यक्ष आचरणाच्या वेळी बंडखोरी मिळमिळीत व्हायची, तर आता पुढचा किस्सा ऐका. लंडनमध्ये येऊन काही तास झाले होते. साऊथ हॉलमधल्या दोस्तांबरोबर पाय मोकळे करायला मी बाहेर पडल्याने पंचवीस-तीस पावलं मी चाललो नसेल. एवढ्यात मुलींचा घोळका समोरून आला. शाळेच्या युनिफॉर्मात होत्या त्या. सोळाव्याच्या उंबरठ्यावर असाव्यात. तिथे यौवनाचा मोहर आपल्यापेक्षा लवकर येतो. तो मोहर त्यांच्या युनिफॉर्ममधूनही जाणवत होता. जवळ आल्यावर त्यांनी काही कॉमेण्टस् केल्या. त्यांचं इंग्लिश मला काहीही कळलं नाही. तिथे राहणाऱ्या माझ्या गुजराती मित्रालाही त्यांचं इंग्लिश डोक्यावरून गेलं. काही तरी मिश्कील, चावट कॉमेंट आमच्यावर मारली होती, कारण त्याचं प्रतिबिंब त्यांचा चेहरा नावाच्या आरशात पडलं होतं. त्या खळाळून हसल्या. मी मागे वळून पाहिलं. त्या घोळक्यातले दोन ‘कृष्णवर्णीय’ मुली आमच्याकडे वळून पाहात होत्या. एकीने डोळा मारला. दुसरीने फ्लाइंग कीस आमच्याकडे भिरकावला. मी कावराबावरा झालो. तो अभिनय नव्हता. माझा मित्र म्हणाला, ‘‘इथल्या संस्कृतीबद्दल तू वाचलं असशील, पण आता अनुभवशील.’’

त्यानंतर डोळे आणि मनाच्या खिडक्या-दारे सताड उघडून मी लंडन आणि युरोपात फिरलो; पण काही अनुभव (गेल्या ३०-३५ वर्षांचे) मी नमूद केले पाहिजेत. युरोपात गोऱ्या किंवा काळ्या मुली हिंदुस्थानींना आरामात पटतात किंवा तुमच्या प्रतिक्रियेची त्या वाट पाहात असतात, ही अंधश्रद्धा आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव असेल, पण माझा अनुभव इतर सामान्य माणसापेक्षा वेगळा नाही. तुम्ही क्रिकेटपटू असाल किंवा इतर ग्लॅमर जगातले, तर अनुभव वेगळा येऊ शकतो. तिथे अनेक हिंदुस्थानी क्रिकेटपटू लीग क्रिकेट खेळायला जातात. त्यांचा तिथल्या पबमधला शुक्रवार-शनिवार रात्रीचा अनुभव वेगळा आहे, पण ते जास्त दारूच्या नशेत होते. मला एक हिंदुस्थानी क्रिकेटपटू माहीत आहे, जो तिथल्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडे राहायचा आणि त्याने त्या पदाधिकाऱ्याच्या बायकोलाच पटवले, पण तो नियम सामान्य माणसाला लागू नाही. विव्ह रिचर्डस् जो फटका खेळू शकतो तो सात जन्म घेऊनही रवी शास्त्री खेळू शकला नसता. ‘‘जेनू काम तेनू थाय बिजा करे सो गोता खाय.’’ ही गुजराती म्हण इथे लागू पडते. आम्ही रवी शास्त्रीच्या कुळातले. एक गंमत सांगतो. एका मॅचच्या वेळी मद्य सर्व्ह करणारी मुलगी कृष्णवर्णीय होती, पण अतिशय देखणी होती. कृष्णवर्णीय मुली या अतिशय सुंदर असतात. हे मला काही मुलींनी शिकवलं. त्यातली ही एक. पहिली अर्थात ब्रायन लाराची एक प्रेयसी. मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एलिझाबेथ टेलरमध्ये मधुबालाच्या चेहऱ्याचा गोडवा मिसळून तिला परमेश्वराने तयार केलंय असं वाटलं.

मला लाराचा हेवा वाटला, पण मी मनाला समजवलं. त्याने कसोटीत चारशे धावा केल्या आहेत. मी शाळेतसुद्धा केलेल्या नाहीत. द्रौपदी ही अर्जुनाचीच होऊ शकते, पंच्चाण्णव्या कौरवाची नाही. मी त्या लाराच्या प्रेयसीवरून दहा लाख गोऱ्या मुली ओवाळून टाकल्या असत्या. असो. तर मी काय सांगत होतो? हे असं होतं. सुंदर मुलींचं वर्णन करायचं असलं की मी असा वाहवत जातो. पुन्हा समेवर यायचं, तर ती क्रिकेट मॅचच्या वेळी बारमध्ये ड्रिंक सर्व्ह करणारी मुलगी प्रचंड देखणी होती. तिच्यावरून कुणीही दहा हजार गोऱ्या मुली ओवाळून टाकल्या असत्या. ती ‘कायद्यात’ मास्टर्स करत होती. तिच्याशी गप्पा मारताना हे तिनेच सांगितलं. तिथे विद्यार्थी कुठलंही काम हलकं मानत नाहीत. तिच्यामुळे तो बार हे सौंदर्यस्थळ बनलं. ही बातमी अर्थातच प्रेस बॉक्समध्ये पोहोचली. तिथले आबालवृद्ध पत्रकार सौंदर्यस्थळाला भेट देण्यासाठी यायला लागले. कुणाची बीयर-वाईन त्या दिवशी वाढली तर कुणी आपल्या डायबेटीसचा विचार न करता ऑरेंज ज्युस रिचवले. माझा एक तिथला भारतीय पत्रकार मित्र. त्या कृष्णवर्णीय पुरंध्रीच्या सौंदर्याने घायाळ झाला. त्याचा इंग्लंडमध्ये लौकिक पत्रकार म्हणून मोठा. कारण तो त्यावेळी टेलिग्राफमध्ये लिहायचा. त्याने आपल्या वैभवाच्या सर्व गोष्टी तिला सांगितल्या, पण त्याच्या प्रत्येक चेंडूवर तिने सुनील गावसकरच्या कौशल्याने बचाव केला. शेवटी माझ्या पत्रकार मित्राने शेवटचं अस्त्र काढलं. तिला म्हटले, ‘‘चल संध्याकाळी आपण ‘कॅण्डललीट् डिनर’ करू. मग मी तुला माझ्या गाडीने सोडतो.’ यावेळी तिने बचाव केला नाही. ती थेट क्रिझच्या बाहेर आली आणि तिने ख्रिस गेलटाईप षटकार ओढला. ती म्हणाली, ‘‘नको, माझा बॉयफ्रेण्ड कुठल्याही क्षणी येईल आणि आम्ही डिनरला जाणार आहोत. वुई हॅव अ लिव्ह इन रिलेशनशिप.’’ चेंडूवर चौकार बसला की श्रीनाथ जसे खांदे खाली टाकायचा तसे खांदे माझ्या मित्राने खाली टाकले.

सांगायचा मुद्दा काय की, तिथल्या मुक्त आयुष्याबद्दल आपल्याला हिंदुस्थानात कितीही वाचायला मिळालं तरी ‘गोऱ्या-काळ्या’ मुली आपली वाट पाहातायत या भ्रमाखाली कुणी सामान्याने असू नये. काही व्यावसायिक हिंदुस्थानींनी गोऱया मुलींशी लग्ने केली आहेत, पण ते वेगळं. दोन घटका गंमत करू आणि विश्वामित्र होऊ हे सोपं नाही. सुरुवातीच्या माझ्या दौऱ्यामध्ये क्रिकेटपटूंकडून तिथल्या डिस्को बारमधल्या अनेक कथा ऐकलेल्या असायच्या. माझ्या दृष्टीने त्या सर रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सप्रमाणेच सुरस आणि चमत्कारिक असत. म्हणून तीन-चार समविचारी मित्रांना घेऊन मी डिस्कोला गेलोय, पण गुजराती मुलगी (मुलगी म्हणून मी तिचा बहुमान करीत असावा. ती ‘हाय आण्टी’, ‘ऑराईट छे’ म्हणण्याच्या वयातली होती. तिथे गुजराती बांधव एकमेकाला भेटल्यावर पहिलं वाक्य बोलतात- ‘‘तमे ऑराइट छे?’’ ऑल राईट शब्दाचा तो गुजराती अपभ्रंश आहे.) बरोबर नाचायला आली. पुढच्या वेळी लंडनच्या लेस्टर स्क्वेअर या ‘अपमार्केट’ विभागातल्या डिस्कोत गेलो. तोकड्या काळ्या कपड्यातल्या (कथरीना कैफलाही लाजल्यासारखं होईल अशा कपड्यात) गोऱ्या मुलींनी त्यांचा कटाक्षसुद्धा आमच्याकडे कधी टाकला नाही. आता हा माझ्या (किंबहुना आमच्या) चेहऱ्याचा दोष असू शकतो. बुजलेपणाचाही असू शकतो. कृष्णवर्णीय पुरुषी तारुण्य त्यांच्याबरोबर असं नाचत भन्नाट होतं आणि गोऱ्या मुलींची त्यांच्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची भावना पाहिल्यावर देवाला पुढच्या जन्माच्या वेळी कॅरिबियन बेटावर आमचं पार्सल पाठव, असं सांगायचा मोह होऊ शकत होता. केवळ मातृभूमीच्या प्रेमापोटी आम्ही मोह आवरला आणि महागडी बीयर संपवून बाहेर पडलो.

मला सातत्याने तिथे एक गोष्ट जाणवलीय. गोरी मुलगी आणि कृष्णवर्णीय पुरुष अशी जोडपी असंख्य दिसतात. कृष्णवर्णीय स्त्री आणि गोरा माणूस क्वचित. तिथे वाढलेली हिंदुस्थानी मुलं आणि गोऱ्या मुली किंवा हिंदुस्थानी मुली आणि गोरी मुलं ही जोडपीही अलीकडे दिसतात, पण कृष्णवर्णीय आणि गोरे यांची संगीत, खाणपिणं संस्कृती एकच आहे. त्यामुळे त्यांचं जुळतं. नव्या पिढीतले हिंदुस्थानी गोऱ्यांशी जुळवून घेतात, पण ते गोंधळलेले असतात. घरून त्यांना हिंदुस्थानी संस्कृती खेचत असते. बाहेरचं वातावरण मोकळं असतं. त्यांना मोकळेपणाचा सुगंध खेचत असतो, पण एक गोष्ट गेल्या अनेक वर्षांत फार बदललेली नाही ती म्हणजे ‘‘हिंदुस्थानी मुलगा-मुलगी आणि कृष्णवर्णीय मुलगा-मुलगी’’ खरं तर वंश ज्येष्ठत्वाच्या बाबतीत दोघांची दुःखे सारखी आणि आजही बऱ्याच गोऱ्यांच्या डोळ्यात वर्णश्रेष्ठत्व जाणवते, पण ते आपल्यातही आहे. ‘काळा’ हा आपल्यासाठी अशुभ रंग माणसाच्या बाबतीतही आहे. तिथे वाढलेल्या मराठी उच्चवर्णीय मुलाने पंजाबी, गुजराती, अगदी गोरी मुलगी केलेली चालते. (कारण तिथे नाइलाजच असतो.) ब्राह्मणाला ब्राह्मण, सारस्वताला सारस्वत कुठून मिळायची; पण मुस्लिम आणि काळी नको हे ठामपणे ठरलेलं असतं. मोकळ्या वातावरणात राहून आपण धर्म, रंगाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. गोऱ्यांना का दोष द्यायचा!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या