एजीस बाऊल

>> द्वारकानाथ संझगिरी

माझ्या ‘सुखां’च्या प्रचंड मोठय़ा यादीत इंग्लंडमध्ये जाऊन क्रिकेटचं समीक्षण करणं येतं.

होय, मला ब्रिटिशांचा काही बाबतीत राग येतो. हिंदुस्थानला आर्थिकदृष्टय़ा त्यांनी नागवलं, हिंदुस्थानातला धार्मिक सलोखा संपेल यासाठी प्रयत्न केले, पण ऐतिहासिक वैर घेऊन जगणे माझा स्वभाव नाही आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करताना देश, धर्म, शत्रुत्व वगैरे आड येत नाही.

हा लेख तुम्ही वाचताना इंग्लंडमधला शेवटचा कसोटी सामना सुरू असेल, पण याक्षणी साऊदम्पटनच्या एजीस बाऊल मैदानाच्या प्रेस बॉक्समध्ये बसून मॅच पाहणे एक सुख आहे. मी जवळच बेसिंग स्टोक्सला माझ्या भाच्याकडे राहतो. तिथून रेल्वेने साऊदम्प्टन एअरपोर्ट स्टेशन पंचविसाव्या मिनिटाला येते. गाडीला फारशी गर्दी नाही, गाडीत चढायला घाई नाही. रांग हा एक भाग झाला, पण त्यातही ‘पहले आप’ ही भावना मला आवडते. परवा एक कुबडय़ा घेऊन मध्यमवयीन माणूस गाडीत चढायला आला. गाडीत चढायला उत्सुक असणारी दहा-बारा माणसं क्षणात मागे सरकली. त्याला आत चढायला मदत केली आणि मग शिस्तीत वर चढली. रेल्वेच्या काही डब्यांवर ‘क्वाएट’ (Quiet) असं लिहिलेलं असतं. म्हणजे फोनवर बोलू नये, शांतता राखावी वगैरे. तिथे कुजबूज ऐकू आली तर डब्यात ब्रिटिश माणसं नाहीत असं खुशाल समजावं.

तिथे रेल्वेने किंवा बसने प्रवास करताना मी एक वर्तमानपत्र विकत घेतो. ‘टेलिग्राम’, ‘गार्डियन’ किंवा ‘टाइम्स’खेरीज दुसऱया वर्तमानपत्राला मी क्वचित हात घालतो. आजही वाचनीयतेच्या आणि माहितीच्या दृष्टीने ब्रिटिश पत्रकारिता मला सर्वोत्कृष्ट वाटते. इंग्लंडमध्ये हिंदुस्थानातून गेलेल्या मराठी माणसाला वर्तमानपत्र विकत घ्यायला धाडस लागतं. कारण वर उल्लेखलेले वर्तमानपत्र फक्त एकशे ऐंशी रुपयांना मिळतं. पौंडाकडे पौंड म्हणून बघितलं तर हात सहज खिशात जातो, पण रुपयांत विचार केला तर त्या पैशांत एक मराठी पुस्तक विकत आलं असतं असं वाटतं, पण 1983 पासून आतापर्यंत मनाला कुठलेही क्लेश न होता मी वर्तमानपत्र विकत घेतलंय. त्यातल्या क्रिकेटच्या लिखाणाने मला घडवलंय, मला शिकवलंय. जॉन वुडकॉक, जॅक बॅनिस्टर, डिकी रत्नागर, जॉन थिकनेस, फ्रॅन्क किटिंग, मॅथ्यू एंजल्स यांचे लेख वाचून कसं लिहावं हे मी शिकलो. एकेकाळी या मंडळींबरोबर एकाच प्रेस बॉक्समध्ये बसून मॅच पाहण्याचं भाग्य मला मिळालं. आता प्रेस बॉक्समध्ये बाजूला वळून पाहिलं की, त्या दर्जाचे पत्रकार एक-दोनच दिसतात. म्हणजे रोज एकशे ऐंशी आणि रविवारी दोनशे ऐंशी रुपये खर्च करून वर्तमानपत्र विकत घ्यावं असा एखादाच शिल्ड बेरीसारखा असतो, पण आता तिथे क्रिकेटपटू लिहितात आणि परखड लिहितात. परवाच इथल्या मिहीर बोस या पत्रकार मित्राकडे मी त्या माझ्या आदर्शाची चौकशी केली. त्यातला नव्वदी ओलांडलेला वुडकॉक सोडला तर सर्व थडग्यात विश्रांती घेतायत. खूप वाईट वाटलं. एक भावविश्वच उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटलं. आपणही हळूहळू डायनासोरच्या वयाकडे सरकतोय ही भावना झाली. किंबहुना, प्रेस बॉक्समधल्या तरुण पत्रकारांना या माणसाने डायनोसोर पाहिला असावा असा संशय येत असतो.

मॅचला जाताना वर्तमानपत्राचं सुख उपभोगायला जमते. कारण बसायला मुबलक जागा आणि कसलीच घाई नसणं. तुम्ही ट्रेनचं तिकीट घ्यायला जाता तेव्हा त्या खिडकीतल्या माणसाला घाई नसते. तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे देतो. गरज पडली तर सल्ला देतो. मी तिकीट काढताना ज्येष्ठ नागरिक असल्याचं आवर्जून सांगतो आणि तो विश्वास ठेवतो. ‘‘वयाचा दाखला दाखवा’’ हा उर्मटपणा नसतो. किंबहुना, तो चटकन विश्वास ठेवतो. त्यामुळे मी नाराज होतो. ‘‘आपण साठीचे दिसायला लागलोय?’’ हा विचार डोक्यात भिरभिरत राहतो. गाडीतून उतरून पुन्हा घाई नाही. स्टेशनच्या बाहेर बसेस उभ्या असतात. डबल डेकर असतात आणि सर्वात महत्त्वाचं फुकट असतात. अर्थात हे मॅचपुरतंच असतं. टुमदार साऊदम्प्टनमधून फिरत बस एका गोल्फ क्लबच्या अर्ध्या कच्च्या रस्त्यात शिरते. इंग्लंडच्या छोटय़ा रस्त्यावर जेव्हा डबल डेकर बस अचूक वळण घेते तेव्हा ‘‘ड्रायव्हर झिंदाबाद’’ हे शब्द आपल्या ओठांवर येतात. इतकं सफाईदार वळण फक्त साप किंवा अजगर घेऊ शकतो. ती बस एजीस बाऊलजवळ थांबते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की, भरपूर स्वयंसेवक आपल्या मदतीला आहेत. बॅरेकेडिंग इतकं व्यवस्थित केलेलं होतं की, ‘रांग’ तुटायला संधीच नाही. आमचं प्रेस बॉक्स हॉटेल हिन्टनमध्ये होतं. ही संकल्पना आपल्या सी. सी. आय.सारखी होती. तुम्ही हॉटेलमध्ये राहिलात, मैदानाच्या बाजूची खोली घेतलीत की, स्वतःच्या बाल्कनीत बसून बीअर, वाईन घेत मॅच बघता येते. मॅच संपल्यावरही परतीचा प्रवास तसाच शांत आणि सुंदर. फक्त त्यासाठी कळपाचा एक भाग व्हायचं. उर्वरित वर्तमानपत्र परतताना वाचून संपतं ते ट्रेनमध्येच सोडायचं. कारण ‘रद्दी’ हा कन्सेप्ट तिथे नाही. बरं, मॅच संपल्यावरही घाई करायची गरज नाही. तास-दीड तास फुकट बस सेवा असते. मेंबर्स क्लबमध्ये जाऊन एखादा ग्लास बीअर किंवा वाईन पिऊन बस पकडता येते. अर्थात माझ्याप्रमाणे तुमचं एका ग्लासावर समाधान होत असेल तरच. कारण त्या बारमध्ये एका ग्लासावर समाधान मानणारा मी एकमेव ‘मूर्ख’ असावा. ते बीअर पितात तेवढं पाणी मी वाळवंटात फिरतानाही पिणार नाही आणि त्याबाबतीत लिंगभेद नाही. तिथल्या एका पबला शेन वॉर्नचं नाव दिलंय. तिथलं संपूर्ण मद्य कृतकृत्य झालं असेल. हे मैदान हॅम्पशायर कौंटीचं आहे. शेन वॉर्न त्यांच्यासाठी खेळायचा. शेन वॉर्नचं दोन जागेवरचं अस्तित्व नेहमीच गाजलंय. एक खेळपट्टी, दुसरा पब! एके ठिकाणी तो फलंदाजांची शिकार करायचा, दुसऱया ठिकाणी मद्य घेता घेता सुंदर ललनांची!

हे एजीस बाऊल पूर्वी ‘रोझ बाऊल’ होतं. डोंगरात एखादा गुलाब फुलवल्याप्रमाणे. त्याचा आकार अगदी सूपच्या बाऊलसारखा. यावेळी खूप आशेने मी तिथे गेलो होतो. हिंदुस्थानी संघ जिंकणार असं स्वप्न मला पहाटे पडायचं, पण पहाटेची स्वप्नं नेहमीच खरी होत नाहीत. नाहीतर साधना, सायराबानू, माला सिन्हा, माधुरी दीक्षित मिसेस संझगिरी झाल्या असत्या. साऊदम्प्टनच्या बंदरावरून ‘टायटॅनिक’ बोट सुटली होती. तिला अजिंक्य वगैरे समजलं जायचं. ऍटलांटिकच्या लाटांच्या तडाख्याने ती बुडली. हिंदुस्थानी संघ ऍटलांटिकच्या लाटा होईल, पुन्हा इतिहास घडेल, इंग्लिश संघ नावाची टायटॅनिक बुडेल या आशा पराभवाबरोबर संपल्या आणि मी शेन वॉर्न पबमध्ये टकिला सनराईज घेऊन डुबत्या सूर्याच्या साक्षीने माझं दुःख बुडवलं.

[email protected]