भटकेगिरी : बेशिस्तीचा चुरगळलेला सदरा

1
प्रातिनिधिक फोटो

>> द्वारकानाथ संझगिरी

‘हिंदुस्थानात प्रवास आता पूर्वीपेक्षा कमी कष्टाचा आहे’ या माझ्या विधानाला काही मंडळी आव्हान नक्की देतील. सुखसोयी वाढल्या, पण गर्दी वाढली. ट्रफिक वाढला, बेशिस्त वाढली. विमान प्रवास हीसुद्धा सुखी प्रवासाची व्याख्या आता राहिलेली नाही.

तरीही काही गोष्टी सुधारल्या आहेत. मी कॉलेजात असताना मुंबईहून कोल्हापूरला जायला बस बारा तास घ्यायची. सकाळी सहाची लाल डब्याची गाडी संध्याकाळी सहाच्या सुमारास धापा टाकत कोल्हापूरला पोहोचायची. तीसुद्धा घाटात अपघात झाला नसेल तर. मी एकदा जवळपास आठ-नऊ तास उभा राहून कोल्हापूरला गेलोय. सातारा-कराडला कुठेतरी बूड टेकायला मिळालं होतं. आता आपल्या गाडीने निम्म्या वेळात कोल्हापूर गाठता येते आणि फ्रेश होऊन संध्याकाळी बीअर घेत घेत पांढरा रस्सा एन्जॉय करता येतो. कारण रस्ते सुधारले. 1968-69च्या आसपास आमच्याकडे ‘टार रोड’ (डांबरी रस्ता) आले ही गोष्ट ‘गर्व से कहो’ स्टाइलमध्ये सांगितली जायची. आता एक्प्रेस वे ही अभिमानाची गोष्ट आहे. 1983 साली मी प्रथम इंग्लंडमध्ये गेलो, तेव्हा त्यांच्या ‘मोटर वे’ने प्रभावित झालो होतो. मोटर वे म्हणजे आपल्याकडचा एक्प्रेस वे. त्यावेळी तिथे तसे रस्ते होऊन वीस-पंचवीस वर्षे उलटली होती. ती ट्रफिकची शिस्तबद्धता पाहून मी वेडावलो होतो. रात्री दोन वाजता रस्त्यात चिटपाखरूही नसताना गाडी लाल सिग्नलसमोर उभी राहिली की, नेमकी शिस्त कशाला म्हणायला हवं हे पटायचं. आजही ती शिस्तीची घडी तिथे बऱयापैकी आहे. ती कधीतरी विस्कटताना दिसते, पण विस्कटवणारी मंडळी बहुतेक वेळा आपली आशियाईच असतात.

अर्थात आपल्याकडे सुधारणा झाल्या त्या इफ्रास्ट्रक्चरमध्ये. आपलं बेशिस्त मन मात्र शिस्तबद्ध झालं नाही. मग प्रवास कसा सुखकारक होणार? परवाच मला एक मित्र म्हणाला, ‘‘मुंबई-पुणे हायवेवरून जपून जा. आता वेगासाठी पोलीस पकडतात.’’ मला बरं वाटलं. एकच मोठा दंड काही काळ मनात भीती निर्माण करू शकतो. माझं उदाहरण देतो. मी ऑस्ट्रेलियात माझ्या मुलाची गाडी चालवत होतो. मेलबोर्नवरून आम्ही ऍडलेडला येत होतो. ताशी 110 किलोमीटर वेगमर्यादा होती. गप्पांच्या नादात मी ताशी 125 वर कधी पोहोचलो ते मला कळलंच नाही. मागून पोलीस व्हॅनचा सायरन ऐकू आला. मी मुलाला म्हटलं, ‘‘काहीतरी अपघात झालेला असावा.’’ तो आवाज अगदी कानाशी आल्यावर माझा मुलगा मला म्हणाला, ‘‘बाबा, तो आपल्यासाठी सायरन आहे. गाडी बाजूला घ्या.’’ मी घेतली. त्याक्षणी आपण काहीतरी चूक केलीय हे मला पहिल्यांदा उमगलं. एक रुबाबदार पोलीस ऑफिसर गाडीतून बाहेर आला आणि अत्यंत अदबीने म्हणाला, ‘‘तुमचं लायसन्स दाखवा.’’ तुसडय़ा आवाजातल्या ‘‘लायसन्स दाखवा लायसन्स’’ची तशी आपल्याला सवय. त्यामुळे त्या अदबीने मी घायाळ झालो. त्याने लायसन्स पाहिलं. मग माझा गुन्हा समजावून सांगितला. ‘‘अपेक्षित वेग ताशी 110 किलोमीटर होता. तुम्ही ताशी 125 ने चालवत होतात. बरं, पुढे गाडी नव्हती. मागे गाडी नव्हती. पुढची गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणं गुन्हा ठरतं’’ हे त्याने मला अत्यंत बाळबोधपणे समजावून सांगितले. मग एक 317 ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या दंडाची नोटीस हातात दिली. गुन्हा कोर्टात चॅलेंज करता येईल, असंही मला सांगितलं. नुसत्या पोलिसाच्या दर्शनाने माझी नात रडायला लागली. पोलिसाला पटवण्याचा विचारही डोक्यात येत नाही. त्यानंतर केवळ अधिक पैसे मोजण्याच्या भीतीने मी ताशी 70 ने गाडी चालवल्यावर चिरंजीव म्हणाले, ‘‘बाबा, फार कमी स्पीड नको. तोसुद्धा नाही चालणार.’’ त्यानंतर स्पीड नॉर्मल ठेवणे ही ‘बीपी’ नॉर्मल ठेवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट वाटायला लागली. एकदा ऍडलेडमध्ये सर डॉन ब्रॅडमनना असंच पोलिसांनी पकडलं. तिथे ब्रडमननाही पकडतात. सर डॉननी विचारलं, ‘‘काय झालं?’’ पोलीस ऑफिसर म्हणाला, ‘‘वेग ताशी साठ होता.’’ ब्रॅडमन म्हणाले, ‘‘मग? वेगमर्यादा ताशी सत्तर आहे.’’ पोलीस ऑफिसर म्हणाला, ‘‘नाही सर, याआधी होती. इथे पन्नास आहे.’’ ब्रॅडमनना लक्षात आलं, आपला फटका चुकलाय, झेल उडालाय, तो घेतला गेलाय आणि आपण बाद आहोत. त्यांनी चलन स्वीकारलं. ब्रॅडमन पुन्हा गाडी सुरू करणार इतक्यात त्या पोलीस ऑफिसरने अदबीने सर डॉनना म्हटलं, ‘‘सर, तुमची ऑटोग्राफ मिळेल?’’ ब्रॅडमननी त्याला स्वाक्षरी दिली. इतकी शिस्त आपल्याकडे कधी येईल? आपल्या हायवेवर किती जण ‘लेन’ची शिस्त पाळतात? जगभर संकेत आहे की, जड वाहनांनी तिसऱया लेनमधून जावं. इतर गाडय़ांनी दुसऱया लेनमधून आणि ओव्हरटेक करताना पहिल्या लेनचा उपयोग करावा. हे बाळबोध आहे, पण आपल्या बाळांना त्याचाही बोध होत नाही.

भरलेला ट्रक पहिल्या लेनमधून तीर्थरूपांकडून वारसा हक्काने रस्ता मिळाल्याप्रमाणे ड्रायव्हर चालवत असतो. बऱयाचदा गाडीवाले तिसऱया लेनमध्ये जाऊन ओव्हरटेक करतात. रात्रीच्या वेळी मोठय़ा ट्रकना रिफ्लेक्टर्स लावणं हे आपल्याकडे ऑप्शनला टाकलं गेलेलं असतं. परदेशात ‘रोटरी’ म्हणजे वर्तुळाजवळ उजव्या हाताच्या गाडीला रस्ता अगदी नैसर्गिकपणे करून दिला जातो. हिंदुस्थानात कुठेही ‘मी पहिला’ हा आवेश असतो. वेगमर्यादेला शिस्त लावण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, पण इतर बेशिस्तीलाही आळा घातला गेला पाहिजे. तो दंडानेच जाऊ शकतो. मी ऑस्ट्रेलियातल्या नियमाप्रमाणे गाडी चालवतो. मग माझ्या लक्षात येतं की, शिस्तबद्धपणे गाडी हिंदुस्थानात चालवणं घातक ठरू शकतं आणि हळूहळू बेशिस्त होतो. शिस्तीचा परीटघडीचा सदरा काढून ठेवतो, बेशिस्तीचा चुरगळलेला सदर चढवतो आणि देशवासीयांत मिसळून जातो.

[email protected]