सिटी ऑफ जॉय

>>द्वारकानाथ संझगिरी

तुम्ही स्पेनला गेलात तर ‘व्हॅलेंशिया’ला नक्की जा. रोम, पॅरिस, बार्सिलोना, लंडन वगैरेंचे वलय त्याला नसेल. पण एकाच शहरात परंपरागत आर्किटेक्चर आणि संस्कृती आणि तिथेच उभारलेल्या आधुनिक इमारती पाहिल्या की आपण थक्क होतो. त्यासाठी आधुनिक हा शब्द तसा तोकडाच पडतो. ‘फ्युचरिल्टीव्ह’ हाच शब्द योग्य.

मी त्या शहराच्या का प्रेमात पडलो ते सांगतो. एक म्हणजे शहराचा सुपुत्र जर वास्तुविशारद असेल तर त्याची कल्पनाशक्ती अफाट असेल. म्हणजे देवाने त्याला ‘जा बाबा, तुझ्या मातृभूमीचं रूप पालटवून ये’ असं सांगून पृथ्वीवर पाठवलं असेल तर तो काय करू शकतो याचं ते ‘व्हॅलेंशिया’ शहर हे उत्तम उदाहरण आहे. तसं व्हॅलेंशिया आणखी काही बाबतीत सुप्रसिद्ध आहे. त्याला अहंकारी माणसं वेडेपणा म्हणू शकतात. तिथून जवळच टय़ुनॉल नावाच्या शहरात दरवर्षी एक टोमॅटोचं युद्ध असतं. त्या उपक्रमाला ‘लाटोमॅनिवा’ म्हणतात. 1945 पासून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी तिथे टोमॅटोची मारामारी आयोजित केली जाते. आबादुबी खेळतो तसे एकमेकांवर टोमॅटो मारायचे. तुम्ही ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ पाहिलाय? त्यात ते दाखवलंय. संपूर्ण शहर टोमॅटोमय होऊन जातं. व्हॅलेंशियामध्ये आणखी एक सण साजरा होतो. त्याला ‘फौलाट’ म्हणतात. तिथली दिवाळी. एक दिवस फटाकेच फटाके. ‘पर्यावरणाची तुम्ही वाट लावताय’ असा आक्रोश तिथे कोण करतं की नाही मला ठाऊक नाही. करत असतीलही. माणसं तेवढय़ा प्रकृती! पण तिथे सकाळी 8 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात होते त्याला ‘डेस्परेटा’ म्हणतात. दुपारी 2 वाजता शहरातल्या प्रमुख चौकात ‘मस्कलेटा’ साजरा होतो. मस्कलेटाचा आपल्या मस्कऱ्यांशी काहीही संबंध नाही. 120 किलो गन पावडर उडवून मोठा धमाका केला जातो आणि रात्री ‘एलकॅस्टीलो’ म्हणून फटाक्यांची रोषणाई होते. आणि या उत्सवात ‘ला ऑफ ट्रेंडा’ ही मिरवणूक काढली जाते. त्यात व्यंगचित्रातल्या ढंगाच्या काही मजली प्रतिकृती पेपरमॅशमधून बनवल्या जातात आणि मिरवणुकीच्या शेवटी त्याची होळी केली जाते.

म्हणजे दिवाळी, अधिक होळी! जगभराच्या संस्कृतीत किती साम्य स्थळं सापडतात नाही!

तर अशा शहरातच एक वेगळा विचार करणारा अवलिया जन्माला येतो. त्याचं नाव सॅण्टियागो कालावात्रा. माझ्याच वयाचा आहे तो. कुठे त्याच्यासारखा पर्वत, कुठे माझ्यासारखा धुलीकण! तोसुद्धा माझ्यासारखा स्थापत्यशास्त्राचा अभियंता आहे. पण तो पर्वत होण्याचं कारण म्हणजे तो वास्तुविशारदही झाला. तो चित्रकार होता. तो मूर्तिकार होता. उगीच नाही त्याने नवं व्हॅलेंशिया वसवलं.

वाईटातून चांगलं कसं घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे व्हॅलेंशियाचा सिटी ऑफ आर्टस् अॅण्ड सायन्स विभाग. व्हॅलेंशियाला फुलांचं शहर म्हणतात. एका पुलावरून आम्ही गेलो. अख्खा पूल हा रंगीबेरंगी फुलांची शाल पांघरून पहुडला होता. रस्त्यावर फक्त फुलं नाहीत, कारण त्यावरून गाडय़ा जातात, पण टायर्सनाही गुदगुल्या होतील अशी फुलं रस्त्यावर टाकायची त्यांची क्षमता आहे. मुख्य म्हणजे थंडीतही तिथे तेवढीच फुलं असतात. ‘कलचमन या आज एक सेहरा हुआ’ असं इतरत्र दृश्य असताना तो पूल मात्र फुलांचं नंदनवन उपभोगत असतो.

1957 साली तिथल्या ‘टय़ूरिया’ या नदीला मोठा पूर आला. हाहाकार माजला. त्यावर उपाय म्हणून त्यांनी नदीला वळवलं. नदीचा मार्ग बदलला. नदी वळवल्यावर जो भूभाग मिळाला त्याचं त्यांनी काय केलं असेल? बेघरांना घरे हवीत म्हणून तो भाग बिल्डरांना विकून तिथले राजकारणी स्वतः गब्बर झाले. टॉवर्स उभारून अति श्रीमंतांची घरं उभारली असे घडले नाही. हेच हिंदुस्थानात, विशेषतः मुंबईसारख्या शहरात घडतं तर किती कितीजणांनी स्वतःचं उखळ पांढरं केलं असतं विचार करा. त्यांनी मात्र तो भूभाग त्याचा भूमिपुत्र, सॅण्टियागो कालावात्राकडे सोपवला. त्याने सात किलोमीटर लांबीचं उद्यान तयार केलं आणि त्यात ज्या इमारती उभारल्या त्या पाहिल्यावर डोळ्य़ांचं पारणं फिटणं म्हणजे काय या वाप्रचाराचा नीट अर्थ कळतो. तिथल्या हिरवळीबद्दल पुढे कधीतरी सांगेन. आधी ज्या वास्तू पाहून डोळ्य़ातली बुब्बुळं बाहेर येण्याची भीती वाटते, आपलं स्वतःचं कल्पनादारिद्रय़ जाणवतं त्याबद्दल आधी सांगतो. ताजमहालच्या वास्तुविशारदाने कौतुकाने कालावात्राकडे पाहावं अशा त्या इमारती आधुनिक वाटत आहेत.

1998 साली तिथे पहिल्या वास्तूचं उद्घाटन झालं. तिचं नाव ‘लहेमिस्पेरिक’. दृष्टीच्या शो विज्ञानाची ती इमारत आहे. ती पाहताना आपण एक प्रचंड डोळा पाहतोय असं वाटतं. जवळपास तेरा हजार चौरस मीटर्सचा कार्पेट एरिया आहे. त्याला एक चक्क प्रचंड पापणी आहे. जे बुब्बुळासारखं दिसतं ते ऑमिनॅक्स थिएटर आहे हे कळतं. त्या वास्तूला लागून तळं तयार केलंय आणि त्यात काच बसवलीय. त्यामुळे पाण्यात जे प्रतिबिंब दिसतं त्यात तो डोळा मानवी डोळ्य़ासारखा दिसतो. म्हटलं तर ते आयमॅक्स, प्लॅनेटोरियम आणि लेझर शोचं ते थिएटर आहे. पण त्याला ज्ञानाचा डोळा (eye of knowledge) बनवताना दिलेला डोळय़ाचा आकार आणि काँक्रीट, ऍल्युमिनियमचा हुबेहूब केलेला डोळा पाहिला की आपल्यासारखा एक अभियंता कल्पनेच्या काय भराऱ्या मारू शकतो हे जाणवतं. मुख्य म्हणजे त्या कल्पनेच्या अवकाशातल्या भराऱ्या नसतात. त्याला मूर्त रूपही येतं.

कालावात्रांच्या कल्पनेचं दुसरं मूर्त रूप म्हणजे सायन्स म्युझियम. त्या डोळ्य़ाच्या जवळचं आहे. त्याला काय आकार दिला असेल? नाकाचा? ओठाचा? छे छे. त्याने वेगळी भरारी मारली. त्याकडे पाहिलं की तो व्हेल माशाच्या सांगाडय़ासारखा वाटतो. बडोद्याला कधी गेलात तर तिथल्या एका म्युझियममध्ये व्हेल माशाचा सांगाडा ठेवलाय. हे म्युझियम पाहताना मला त्या सांगाडय़ाची आठवण झाली. अर्थात तिथे विज्ञानाच्या ज्ञानापेक्षा करमणुकीला महत्त्व आहे. कारण तिथे तळमजल्यावर बास्केटबॉल कोर्टस् आहेत. दुसऱया मजल्यावर ‘क्रोमोझोन फॉरेस्ट’ आहे. तिथे झीरो ग्रॅव्हिटी स्पेस अॅकॅडमी वगैरे आहे. 220 मीटर्स लांब, 80 मीटर्स रुंद आणि 55 मीटर्स उंचीचा हा काँक्रीट, लोखंड आणि काचेचा व्हेल सांगाडा पाहून पहिल्या अवतारात मत्स्य रूप घेणाऱ्या परमेश्वराला कौतुक वाटलं असेल.

तिथे अशा अनेक वास्तू आहेत. ज्या पाहून आपण सरकारी धोरणांना आणि कालावात्रा या कलावंताला कुर्निसात करतो. व्हलेंशियाबद्दल आणखी बरंच काही नंतर कधीतरी.

[email protected]