हेमकूटवरील अफलातून गणेशमूर्ती

33


>> द्वारकानाथ संझगिरी

हम्पी ही जागा घाईघाईत पाहण्यासारखी नाही. नुसता भोज्या करण्यासारखी तर नक्कीच नाही. तिथे अनेक गोरी माणसं दिसतात. बऱयाचदा तरुण तरुणी! ती मंडळी तिथे मोठा मुक्काम ठोकतात. भाडय़ाने सायकल घेतात आणि भटकतात. काही मंडळी तर अख्खी हम्पी चालत फिरतात. मूर्ती न् मूर्ती निरखून पाहतात.

भग्नावस्थेत असलेली ती मूर्तीही तुमच्याशी बरंच काही बोलून जाते. तुम्ही विरुपाक्ष मंदिरातून बाहेर आलात आणि उजव्या बाजूला वळलात की हेमकूट हिल म्हणून टेकडी लागते. पायात ताकद आणि छातीत दम असेल तर ती टेकडी चढा. नाहीतर गाडी घेऊन जातेच तिथंपर्यंत. तिथेही मंदिराचे भग्नावशेष आहेत. त्यातल्या दोन मूर्ती अफलातून आहेत. दोन्ही गणपतीच्या आहेत. पूर्वी अनेकांनी त्या फोडण्याचा प्रयत्न केलाय. पण ग्रॅनाईट तोडणं इतकं सोप्प नसतं मुळी. मोठी मूर्ती साडेचार मीटर उंचीची आहे. म्हणजे शहरी भाषेत सांगायचं तर दीड मजली उंचीची. एका अख्ख्या ग्रॅनाईटमध्ये कोरलीय. विचार करता, ती घडवणाऱया कलाकाराने त्या घट्ट ग्रॅनाईटला मूर्तीचं रूप कसं दिलं असेल? एका दगडातून शिल्प उभं करताना चूक करून चालत नाही. तो बसलेला गणेश आहे आणि त्या गणपतीची सोंड उजव्या हातातल्या मोदकाकडे झेपावली आहे. गणपतीचं तुंदीलतनू रूप या मूर्तीत नजरेत भरते. मूर्तीभंजकाने त्याचं पोटं फोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे त्या गणपतीच्या मूर्तीची तिथे पूजा केली जात नाही. कुठलाही धर्म असो, मला ही तोडाफोडीची, उद्ध्वस्त करण्याची वृत्ती आवडत नाही. पण मध्ययुगात ते धार्मिक कार्य मानलं जायचं. आजच्या युगात ते धर्मवेड ठरतं. या गणेशाच्या मूर्तीला तिथे काडेलेकालू गणेश म्हणतात. काडेलेकालू म्हणजे चण्याची डाळ. त्या गणेशाचं पोट चण्याच्या डाळीसारखं आहे म्हणून.

तिथूनच जवळ त्या हेमकूटच्या टेकडीवर आणखीन एक मूर्ती आहे. एक चौकोनी मंडप बांधून तिथे ती वसवली आहे. ती मूर्ती एकाच दगडातली आहे आणि 2.4 मीटर्स उंचीची आहे. म्हणजे काडेलेकालू मूर्तीच्या अर्धी! या गणपतीला सासिवेकालू गणपती म्हणतात. म्हणजे इंग्रजीत मस्टर्ड सीड किंवा मराठीत बहुधा मोहरी. हेसुद्धा नाव कदाचित गणपतीच्या पोटावरून दिलं असावं. म्हणजे पोटाच्या आकारावरून. या गणपतीचं पोट एका नागाने बांधलय, असं त्या मूर्तिकाराने दाखवलंय. आता पोट बांधण्याची कल्पना त्याने कुठून उचलली असेल? अशी एक पुराणकथा सांगितली जाते की, गणपतीला भोजनावर ताव मारायला आवडायचे. एकदा त्याने एवढा ताव मारला की, पोट फुटू नये म्हणून जवळच्या एका नागाला पकडून आपलं पोट घट्ट बांधलं. म्हणून तो नाग दाखवला गेलाय. पण या एका दगडातून कोरलेल्या मूर्तीमध्ये आणखीन एक खास बात आहे. तुम्ही समोरून पाहिलं तर आसनावर बसलेला गणपती वाटतो. गणपतीला प्रदक्षिणा घालून मागे गेलात, तर तो पार्वतीच्या मांडीवर बसलाय असं जाणवतं.

अशीच एक तोंडात बोटं घालायला लावणारी मूर्ती म्हणजे नरसिंहाची मूर्ती. ती आपल्याला अचंबित करते. त्यातली कला, त्यामागचे श्रम तुम्हाला अचंबित करण्यासाठी एका अख्ख्या ग्रॅनाईटमधून मूर्ती तयार करते. तो ग्रॅनाईट तोडणं ही केवढी कठीण गोष्ट आहे. याची तुम्हाला कल्पना करायला हवी. मूर्तिकाराने त्या 15व्या, 16व्या शतकात काय आयुधं वापरली असतील याचा विचार करा. एकही यांत्रिक आयुध नव्हतं आणि तरीही मूर्ती 6.7 मीटर्स उंच आहे. म्हणजे दोन मजली घरापेक्षा ही उंच. त्या मूर्तीतली कलाकुसर आपल्याला वेड लावते. विशेषतः त्या मूर्तीच्या चेहऱयावरचे भाव. तो नरसिंह असल्यामुळे त्याचा चेहरा सिंहाचा आहे. भरदार नीट कोरलेली छाती आहे. त्याचे डोळे बाहेर आलेले दाखवलेले आहेत. नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार. तो अर्ध नर आणि अर्धा सिंह या रूपात अवतरला. त्याचा चेहरा सिंहाचा, पंजा सिंहाचा आहे आणि त्या खालचे शरीर हे मानवाचे आहे. हे सर्व त्या एका दगडातून कोरलेल्या मूर्तीत उत्कृष्ठपणे दाखवलंय. त्याच्या त्या चेहऱयावरच्या भावामुळे त्याला उग्र नरसिंह म्हटले जाते. त्या उग्रपणात आणखी एका गोष्टीची भर आहे. तो सात तोंडाच्या नागावर बसलाय. नागाच्या वेटोळय़ावर तो आसनस्थ आहे आणि त्याच्या डोक्यावर सात तोंडाचा नागाचा फणा आहे. त्यावर पुन्हा सिंहाचे मुंडके आहे. गंमत म्हणजे तो हिरण्यकश्यपूचे पोट फाडताना दाखवलेला नाही तर आर्किऑलॉजिस्टचे म्हणणं आहे की, त्याच्या मांडीवर लक्ष्मी बसली होती. जेव्हा ही मूर्ती तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा लक्ष्मीची मूर्ती तुटली गेली. म्हणून त्याला मालोला नरसिंहसुद्धा म्हणतात. मालोला हा शब्द ‘मा’ म्हणजे देवी आणि लोला म्हणजे ‘प्रिय’ या संधीतून तयार झालाय. ही मूर्ती महालात बसवल्यासारखी वाटते आणि हे सर्व एका दगडात केलंय. म्हणजे विचार करा त्यावेळी किती उच्च दर्जाचे मूर्तिकार असतील.

ही मूर्ती विजयनगर साम्राज्याच्या पराभवाच्यावेळी 1565 मध्ये तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात लक्ष्मीची मूर्ती तुटली. तिचा एक हात अजूनही नरसिंहाच्या पाठीवर टेकलेला दिसतो. ती उरलेली मूर्ती कमलपुराच्या म्युझियममध्ये विसावलीय. या मंदिराच्या जवळच मदावलिंग मंदिर आहे. तिथे गोलाकार पायरीवर तीन मीटर उंच शिवलिंग ठेवलंय. तोसुद्धा एका दगडातून तयार केलाय. मुख्य म्हणजे ती मूर्ती भंजकांच्या हल्ल्यातून बचावली. त्याच्यावर तीन ‘आयमार्क्स’ आहेत. ते शिवाच्या तीन डोळ्यांचं प्रतिनिधित्व करतात. या मंदिराला बडावलिंग म्हणतात. कारण बडाव म्हणजे गरीब. गरीबाचं लिंग असं म्हणतात. कारण एका शेतकरी स्त्रीने त्याची स्थापना केली. ते एका छोटय़ा दगडाच्या खोलीत ठेवलंय. दिवसा सूर्यप्रकाशात ते उजळून निघतं.

दगड आहे असं आपण कुणालाही किती तुच्छपणे सहज म्हणतो नाही? कारण दगडाकडे तुच्छपणे पाहिलं जातं. पण प्रचंड दगडातून ही उभी राहिलेली शिल्पकला पाहिली की आपण नतमस्तक होतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या