दगडी खांबांतून ‘सारेगम’!

29

>> द्वारकानाथ संझगिरी

हंपीमधलं सर्वात सुंदर शिल्पकलेचा नमुना असलेलं देऊळ म्हणजे विठ्ठल मंदिर.

विठ्ठल हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. पंढरपूर हे माझं सर्वात आवडतं तीर्थक्षेत्र. कारण तिथे कुठल्याही जातीचा हिंदू, स्त्राr असो वा पुरुष सोवळं वगैरे न घालता थेट विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवू शकतो. जुनाट बंधनांच्या कैदेतला तो देव नाही.

पण विठ्ठल हा मूळचा मराठी की कानडी?

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेऊन त्यावर ग्रंथ लिहिणाऱया रा. चिं. ढेरे यांच्या मते विठ्ठल हा कानडीच. साक्षात ज्ञानेश्वराच्या अभंगातही त्याच्या कानडीपणाचं उदाहरण आढळतं. ‘‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु! येणे मज लाविले वेधी।।’’ असं ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणत. एकनाथ महाराजही म्हणतात, ‘‘नाठवेचि दुजे कानडय़ा वाचुनी। कानडा तो मन ध्यानी वसे।।’’

त्यामुळे हंपीवर राज्य करणारी काही घराणी विठ्ठलमय होती. हे मंदिर पंधराव्या शतकातलं आहे. दुसऱया देवरायाच्या कारकीर्दीत हे मंदिर बांधलं गेलं, पण त्याला वैभवशाली केलं कृष्णदेवरायाने! कृष्णदेवराय हा अत्यंत हुशार, पराक्रमी राजा होता. ते द्राविडीयन शैलीत बांधलेलं आहे. प्रामुख्याने दक्षिण हिंदुस्थानी स्थापत्य कला या मंदिरात दिसते. इथल्या खांबांवरची शिल्पं किंवा छतावरची सजावट ही हंपीतली सर्वोत्कृष्ट सजावट आहे. एकही खांब किंवा जागा सजावटीशिवाय सोडला तर विठ्ठल रागावणार अशी ठाम समजूत राजाची असावी. अर्थात उच्च दर्जाची शिल्पकला देवळांमुळे टिकली. त्या कलेला प्रोत्साहन मिळालं हे खरं असलं तरी देवाला राहायला महालसदृश घरं असावीत ही सर्वधर्मीय समजूत असावी. त्यामुळे जगभर मंदिर, मशिदी, चर्च यांना भव्यता आणि सौंदर्य बहाल करण्याच्या नादात गडगंज पैसा वाहिला आहे. गंमत पहा, या विठ्ठल मंदिराची एक आख्यायिका आहे की, विठ्ठलरूपातल्या विष्णूसाठी हे देऊळ बांधलं, पण त्याचं श्रीमंती रूप पाहून देव चिडून स्वगृही परतला. माणसापेक्षा अर्थातच देव सुजाण होते.

या मंदिराचं एक महत्त्वाचं आकर्षण आहे, दगडाचा रथ! असे आणखीन दोन रथ हिंदुस्थानात आहेत. तामीळनाडूमध्ये महाबलीपुरममध्ये आणि कोणार्कला ओडिशात. हंपीतल्या स्थापत्यकलेतला तो सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. ते दगडाच्या रथातलं गरुडाचं मंदिर आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. त्यामुळे त्यात विष्णूच्या वाहनाचं मंदिर ही कल्पना मस्त आहे. अर्थात हा रथ ‘भरजरी’ आहे हे सांगायची गरज नाही. या मंदिराचीही तोडफोड झाली. त्यामुळे मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही. रथाचीही नासधूस झालीय. पूर्वी रथाची चाकं फिरत. त्यामुळे माणसं तो रथ इथून तिथून हलवत, पण नंतर ती चाकं सिमेंटने जमिनीला जोडली गेली.

त्या मंदिराचा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे रंगमंडप. हा मंडप छप्पन्न खांबांवर उभा आहे आणि हे खांब चक्क संगीतमय खांब आहेत. त्यांना ‘सारेगम’ खांब असंसुद्धा म्हणतात. या खांबांवर एक छोटी काठी आपटली तर त्यातून संगीताचे ऐकायला येतात. जणू प्रत्येक खांब एक वाद्य आहे. प्रत्येक मोठय़ा खांबाच्या बाजूला सात खांब आहेत. त्यातून सात सूर ऐकायला येतात. ज्या खांबावर जे वाद्य कोरलंय त्या वाद्याचा आवाज येतो. बरं, वाद्य कुठली आहेत तर ताल वाद्य आहेत, तंतूवाद्य आहेत, विन्ड इन्स्ट्रुमेंटही (वायुवाद्य) आहेत. ज्या दगडातून स्वरांची निर्मिती होऊ शकते अशा एका दगडातून हे खांब तयार केलेले आहेत. खांबातून सात सूर बाहेर येणे हा चमत्कार होता. शतकानुशतके ते गूढ उकलण्याचा प्रयत्न झाला नाही याचं कारण आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनच नव्हता. ब्रिटिशांचं राज्य आलं. त्यांनाही हा मंडप पाहून गोड धक्का बसला. हे कसं बांधलं असेल, या चमत्कारामागे काही विज्ञान आहे का हे पाहण्याची त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी दोन खांब फोडून बघितले. त्यांचा समज होता की, खांबात असं काहीतरी आहे ज्यामुळे स्वर ऐकायला येतात, पण तसं काही त्यात नव्हतं. त्यामुळे हे गूढ अधिकच गहिरं बनलं. ते सूर ही त्या दगडाची मूलभूत गुणवत्ता आहे असं मानलं जातं. हे दोन खांब अजूनही तिथे ठेवलेले आहेत. आता तुम्ही जाऊन त्या खांबांवर काठी आपटून आवाज ऐकू शकत नाही. कारण त्यावर बंदी आहे, पण तुम्ही जर यूटय़ूबवर एखादी जुनी टेप पाहिली तर संगीत ऐकायला येईल. हे वाजवणं बंद करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाजवून वाजवून खांब खराब व्हायला लागले. कारण कुणीही यायचा, खांबावर काठी किंवा तत्सम गोष्ट आपटायचा. अशा जगावेगळय़ा गोष्टी जपल्या पाहिजेत. मी जग पालथं वगैरे घातलेलं नाही, पण जे जग मी थोडंफार पाहिलंय त्यात असा चमत्कार पाहिलेला नाही. असा चमत्कार जगापुढे ठेवण्याची एक शिस्तबद्ध पद्धत असू शकते. जसं इतर जगात असतं. दिवसातून दोनदा किंवा तीनदा संगीतयात्रा म्हणा, म्युझिक टूर ठेवता येऊ शकते. त्यासाठी वेगळे पैसे आकारता येऊ शकतील आणि आर्किऑलॉजीतल्या तज्ञांनी शिकवलेल्या मंडळींकडून त्या खांबांतल्या संगीताचं प्रात्यक्षिक दाखवता येईल. त्याच्या बाजूलाच एक मंडप आहे. या संगीत मंडपातल्या संगीताच्या तालावर त्या मंडपात नृत्य होत असे म्हणतात. देऊळ आणि महाराजांची रसिकता यामुळे नृत्यकलाही टिकून राहिली. अर्थात नृत्य ही उच्चभ्रू वर्गाची कला त्यावेळी नव्हती, पण तेव्हा ती परंपरेतून टिकवली गेली म्हणून आज उच्चभूंच्या घरात तिला प्रवेश मिळाला. तर मी काय सांगत होतो? हं, एका मंडपात आताही त्या संगीत मंडपातल्या संगीताच्या तालावर नाच ठेवता येईल. म्हणजे तो काळ पर्यटकांच्या डोळय़ांसमोर उभा करता येईल आणि हे अशक्य आहे? मला नाही वाटत, पण राजकीय इच्छाशक्ती हवी. ती आणायची कुठून? परंपरेच्या नावाने छाती पुढे काढणारी माणसं शिल्पं, दगडातली कला जपायला उत्सुक नसतात. कारण त्यामुळे मतं मिळत नाहीत. मतं नवीन मंदिर, नवीन शिल्पं उभारून मिळतात. कशाला जुनी मढी उकरायची? मग ती परंपरेची का असेनात!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या