World Cup 2019 पाऊस, ढग, टॉस आणि स्विंगचे चक्रव्यूह

38
virat-bumrah-rohit-sharma

>> द्वारकानाथ संझगिरी

नॉटिंगहॅम ही रॉबिनहूडची कौंटी. अजूनही तिथल्या शेरवूडच्या जंगलात एक हजार वर्षांपूर्वीचं ओकचं झाड पाहायला मिळतं. कसंबसं ते जगवलेलं आहे. त्याचा बुंधा चार टुणटुण एकत्र केल्या असत्या तरी त्यापेक्षाही मोठा वाटेल. त्यात रॉबिनहूड लपायचा असं सांगितलं जातं.

हिंदुस्थानी संघ सध्या रॉबिनहूडसारखा पराक्रम गाजवतोय. पण पावसापासून ही मॅच वाचवायला असा एकही बुंधा तिथे नाही. इंग्लंडने अजून क्रिकेटसाठी इनडोअर स्टेडियमचा विचार केलेला नाही. हिंदुस्थानी संघाने इनडोअर स्टेडियममध्ये सराव केला. जिम्नॅशियममध्ये व्यायामही केला. पण पावसाने दिलेली धमकी जर खरी ठरली तर आज पन्नास षटकांचा सामना होणे नाही. इंग्लंडमधलं हवामान खातं गंभीर चुका करीत नाही असं म्हटलं जातं. गुरुवारी ती चूक त्यांनी करावी. आम्हाला उैन हवंय. किमान पाऊस तरी नको. हिंदुस्थानात या सुमारास पाऊस येतो. पण मान्सूनला इंग्लंडचा दौरा काढायची काय लहर आली देव जाणे! मॅचमागून मॅच वाहून जातेय. त्यामुळे गुणांच्या तक्त्यात उलथापालथा होऊ शकते. मान्सूनवर हक्क फक्त हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थानवरची इंग्लंडची सत्ता कधीच इतिहासजमा झालीय.

गेल्या पाच दिवसांत तीन सामने पावसामुळे चक्क ‘नासले’ आहेत. त्यामुळे कधीतरी कुणाचं तरी डोकं फिरणारच होतं. बांगलादेशचा प्रशिक्षक स्टीव्ह ऱहोडस्चं फिरलं. प्रत्येक मॅचला एक राखीव दिवस ठेवला नाही म्हणून त्याने आयसीआयवर आगपाखड केली. मी त्याचं दुःख समजू शकतो. कमकुवत संघांविरुद्धची मॅच ‘पाण्यात’ गेली की डोकं सटकतंच. त्यांच्यासाठी श्रीलंका हा कठीण पेपर नव्हता. पण आयसीसी फार काही करू शकते असं वाटत नाही. आधीच ही स्पर्धा दीड महिन्याची आहे. त्यात प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला तर स्पर्धेला दोन महिनेही पुरले नसते. पुन्हा खर्चाचा प्रश्न येतोच. उपांत्य फेरीच्या आणि अंतिम सामान्यासाठी राखीव दिवस आहेत. त्यापलीकडे आयसीसी काही करू शकली नसती.

खरं सांगायचं तर, पावसाने इंग्लंडमधलं क्रिकेट अधिक रंजक आणि खेळाडूंच्या क्षमतेची कठोर परीक्षा घेणारं केलंय. आता खेळपट्टय़ा तरी कव्हर केल्या जातात. पूर्वी तेसुद्धा होत नव्हतं. ओल्या आणि मग सुकत जाणाऱया खेळपट्टीवर गोलंदाज खतरनाक ठरत. डेरेक अंडरवूडसारखा गोलंदाज फलंदाजांचा फडशा पाडायचा आणि त्यामुळेच ब्रॅडमन, हटन, हॉब्ज, सोबर्स, हार्वे यांच्या धावांची आणि मोठेपणाची किंमत कळते. त्यात हेल्मेट, चेस्टपॅड वगैरेही नव्हते. आजचे फलंदाज खरंच सुखी आहेत. इंग्लंडमध्ये पाऊस कधी मित्र बनून येतो, कधी शत्रू होतो. कधी दुष्ट वाटतो, कधी प्रेमळ! पावसाचं नेमकं कुठलं रूप हिंदुस्थानी संघाला नॉटिंगहॅमला पाहायला मिळेल ते आजच कळेल. पाऊस आणि ढग जर त्रास देणार असतील तर टॉस महत्त्वाचा ठरतो. एक डोळा डकवर्थ-लुईसच्या गणितावर ठेवावा लागतो. सामना होण्यासाठी दोन्ही संघांना कमीत कमी 20 षटकं खेळावी लागतात. पण वीस षटकांचा सामना खेळणं वेगळं आणि पन्नास षटकांचा सामना 20 षटकांचा होणं वेगळं. दोन्ही मानसिकता वेगळय़ा असतात. दोन्ही लग्नंच, पण प्रेमविवाह आणि ठरवून केलेला विवाह एव्हढा त्यात फरक आहे.

एक गोष्ट चांगली झालीए की, धवन इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता निर्माण झालीय. अर्थात रिषभ पंत हिंदुस्थानातून इंग्लंडला येतोय. तो अर्थातच हिंदुस्थानी संघाचा भाग नसेल. त्याचा खर्च हिंदुस्थानी संघाला करावा लागेल. हिंदुस्थानी नियामक मंडळासाठी तो कोथिंबीर विकत घेण्यापेक्षा क्षुल्लक खर्च आहे. त्यामुळे उद्या धवनला परत पाठवायची गरज पडलीच तर तो संघाचा भाग होईल. तोपर्यंत तो इंग्लिश वातावरणाशी एकरूपसुद्धा झाला असेल. मात्र एकदा धवनला संघाबाहेर काढलं तर आणखी एखादा खेळाडू जायबंदी झाल्याशिवाय त्याला पुन्हा संघात येता येणार नाही. आयसीसीने याबाबतीत जरा कडक धोरण घेतलंय. ते योग्यच आहे. डेल स्टेन जेव्हा या विश्वचषकात आला तेव्हा त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीचं निदान होतं… ‘क्रोनिक इनफ्लमेशन ऑफ शोल्डर’. त्याला परत जावं लागलं. याच जखमेमुळे परत जावं लागलं असतं तर दक्षिण आफ्रिकेला राखीव खेळाडू मिळाला नसता. त्याचं निदान ‘शोल्डर इंपिंजमेंट सिंड्रोम’ असं केलं गेलं. माझ्या इथल्या डॉक्टर मित्राच्या माहितीप्रमाणे दक्षिण आफ्रिकेने ‘डॅडी’ला ‘पप्पा’ म्हटलंय एवढंच. अशी पळवाट काढत येते. या क्षणी राहुल जरी धवनऐवजी आघाडीला गेला तरी धवन हा मौल्यवान खेळाडू ठरलाय. 2013 आणि 2017 च्या इंग्लंडमधल्या चॅम्पियन ट्रॉफीत तो आपला सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज होता. 2015च्या विश्वचषकातही त्याने तीच कर्तबगारी दाखवली होती. इथे सुरुवात चांगली झालीय. सर्वोच्च रंगमंचावर अदाकारी द्यायची त्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे त्याच्या जखमेवर शक्य असेल तोवर फुंकर घातली जाणार आहे आणि नंतर पेनकिलर्स, ग्लोव्हज्, आत पॅडिंग टाकणे वगैरे करून त्याला लढायला सिद्ध केले जाऊ शकते.

गुरुवारच्या मॅचसाठी संघ काय असेल ते इंटरेस्टिंग ठरेल. वातावरणाचा विचार केला तर महमद शमी खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुऱहाड कुलदीपवर पडू शकते. मधल्या फळीत विजय शंकर किंवा कार्तिक खेळणार. दोघांनीही नेटमध्ये सराव केला. नेमके कोण खेळणार त्याचा निर्णय हा लेख लिहिताना गुलदस्त्यात आहे. आपला संघ जवळपास ठरल्यासारखा असला तरी विचार न्यूझीलंडच्या ताकदीचा करायला हवा. इंग्लिश वातावरणात त्यांचा बोल्ट आपल्या फलंदाजांचे ‘नट’ टाइट करू शकतो. काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडमध्ये आणि इंग्लंडमध्ये सरावाच्या सामन्यात त्याने ते दाखवून दिलेय. लॉकी फर्ग्युसन ताशी 92 मैलांच्या वेगाने चेंडू टाकतो आणि सोबत हेन्री आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार गप्टील, टेलर आणि त्यांचा कर्णधार विल्यमसनवर आहे. पण तळाचे फलंदाज हातभार लावू शकतात. न्यूझीलंडच्या संघाला सर्वसाधारण खेळपट्टी आणि वातावरणात हा हिंदुस्थानी संघ दहापैकी सात वेळा हरवू शकतो. पण पाऊस, ढग, टॉस, स्विंग या चक्रव्यूहातून हिंदुस्थानी संघ बाहेर काढताना विराट कोहलीला नशिबाची साथ लागेल. पाहूया, आपल्या करोडो शुभेच्छा ते काम करतात का?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या