विम्याचं कवच ही काळाची गरज

>> अॅड. शिरीष देशपांडे

विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंटद्वारे मानसिक आजारांच्या उपचारांबाबत विमा देण्यात येईल असा निर्णय देण्यात आला आहे.आतापर्यंत मानसिक रुग्णांना विम्याचे कव्हरेज नव्हतेच मात्र आता ही मागणी मान्य झाली असून त्यांनी विमा कंपन्यांनाही याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विमा कंपन्यांकडून याबाबतचं पॅकेज जाहीर केलं जाईल. आता मानसिक आजाराचं स्वरूप, उपचार, त्याचा खर्च व त्याला अनुषंगून पॅकेज हे जाणून त्यावर आधारीत प्रिमीयम जाहीर केला जाईल. मात्र मानसिक विकार हा एक आजार आहे हे यानिमित्त मान्य केलं गेलं हे महत्त्वाचं.

वाढलेले ताणतणाव, आव्हानं, बदललेली सामाजिक स्थिती यामुळे नवनव्या मानसिक समस्या उभ्या राहात आहेत. म्हणूनच आता या समस्यांना आजार मानून त्यांना विम्याचं कवच असणं आवश्यक होतं. ही काळाची गरज ओळखून आयआरडीने याबाबत योग्य पाऊल उचललं आहे. आता पुढचं पाऊल आहे ते म्हणजे या संदर्भातील अटी, नियम व विम्याचं स्वरूप याबाबत निश्चितता तयार होणं. विमा पंपन्या याबाबत कोणतया स्वरूपाचं पॅकेज देतात हे जाणून घेतल्यानंतर एक ग्राहक म्हणून त्याबाबत आपली भूमिका काय असायला हवी, याचं चित्र स्पष्ट होईल. मानसिक उपचारांबाबत निर्णय होणं आणि त्याला ग्राहक हिताच्या कक्षेत आणणं ही एक महत्त्वाची गोष्ट यामुळे घडली आहे.

विम्याचं स्वरूप स्पष्ट होताना यात वेगवेगळ्या गोष्टींचा संदर्भ येईल. ज्यात आजाराचं स्वरूप, उपचार पद्धती, उपचारांचा कालावधी याचा विचार केला जाईल. साधारणत: इतर आजारांमध्ये त्याचे स्वरूप आणि उपचारांचा कालावधी याबाबत निश्चितता असते. रुग्ण आणि डॉक्टर या दोघांनाही याबाबत स्पष्टता असते. यामुळे आपोआपच उपचारांच्या खर्चाचाही अंदाज लावला येतो आणि या एपूण स्वरूपावर आधारीत असं विमा संरक्षणाचं पॅकेज ठरतं. अर्थात याबाबतही वेगवेगळ्या कंपन्या आपापली भूमिका ठरवतात. मात्र काही नियम, धोरणं सगळ्यांनाच लागू आहेत. आता मानसिक विकारांच्या उपचारांबाबत नेमकी कोणती धोरणं आणि नियम लागू केले जात आहेत हे पाहणं योग्य ठरेल. भविष्यात लागू केल्या जाणाऱया या अटी व नियम जर रुग्णासाठी जाचक ठरणाऱ्या आहेत, अनावश्यक आहेत, मूळ हेतूला साजेशा नाहीत वा हेतू साध्य करणाऱ्या नाहीत असं जर आढळलं तर निश्चितच ग्राहक पंचायत याबाबत आग्रही भूमिका घेईल.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विम्याचे स्वरूप ठरवताना मानसिक रुग्णाची नेमकी व्याख्या ठरवावी लागेल. त्यानंतर यात कोणकोणते आजार समाविष्ट केले गेले आहेत ते पाहावं लागेल. नैराश्य वा डिप्रेशन या आजारासाठी उपचार घेणाऱयांची संख्या आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे. या आजाराला विम्याचे संरक्षण देताना याचं स्वरूप लक्षात घेणं योग्य ठरेल. कारण ही समस्या वेगवेगळ्या पातळीवर दिसून येते. दीर्घकालीन डिप्रेशन वा नियमित नैराश्याचा येणारा झटका या समस्यांना विमा संरक्षणाखाली आणावं लागेल. ही समस्या काही वेळा इतपं दीर्घ स्वरूप धारण करते की आत्महत्येचे विचार रुग्णाच्या मनात येतात. तेव्हा याचे उपचारही तितकेच महत्त्वाचे ठरतात. म्हणून विमा संरक्षणाअंतर्गत समस्यांबाबतचा विचार हा मनोविकार तज्ञांच्यामार्गदर्शनानेच झाला पाहिजे. म्हणजेच विमा संरक्षणाअंतर्गत कोणत्या समस्यांना घेतलं जाईल वा वगळलं जाईल हे पाहणं संयुक्तिक ठरेल. यानंतर यात काही त्रुटी जाणवल्यास ग्राहक पंचायत ग्राहकाच्या बाजूने उभी राहील.

अनेकदा मनोविकारांवरील उपचार हे दीर्घकालीन असतात. हे उपचार वर्षानुवर्षे त्यांना घ्यावे लागतात. अशा वेळी मानसिक आजार झालेले रुग्ण व त्यांचे पुटुंबीय यांच्याबाबत एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांना आर्थिक चिंता भेडसावत असते व त्याबरोबरच ते मनानेही खचलेले असतात. यामुळेच या निर्णयाने आर्थिक चिंता काही अंशी का होईना कमी होण्याची शक्यता आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसाधारण आणि वैद्यकीय विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. यात मानसिक आजारांचं प्रमाण वाढल्याने या आजारांनाही वैद्यकीय विमा पॉलिसीच्या कक्षेत आणल्याने मनोविकारग्रस्तांना दिलासाच मिळाला आहे.

संकलन – शुभांगी बागडे
अॅड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत