संस्कृती सोहळा – कावड खेळे अनोखी परंपरा!

>> जे. डी. पराडकर

रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यात कोदवली गावात नाचवले जाणारे कावड खेळे म्हणजे संपूर्ण कोकणातील एक अनोखी परंपरा समजली जाते. कोदवली ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. शिमगोत्सवात पालखीसोबत ही कावड सजवून मोठ्या भक्तिभावाने नाचवली जाते.

कोकणच्या सांस्कृतिक ठेव्यातील परंपरा कोकणवासीय आजही मोठ्या भक्तिभावाने जपत आलेत. सिंधुदुर्गचा दशावतार, रत्नागिरीचे नमन खेळे आणि जाखडी नृत्य, रायगडमधील खालूचा बाजा हा सांस्कृतिक ठेवा कोकणची खरी ओळख समजली जाते. रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यात कोदवली गावात नाचवले जाणारे कावड खेळे म्हणजे संपूर्ण कोकणातील एक अनोखी परंपरा समजली जाते. पूर्वीच्या काळी येथे असणाऱ्या कावडीचा उपयोग पाणी भरण्याचं साधन म्हणून केला जात असे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी सिद्धेश्वरबाबा गोसावी नामक सिद्ध पुरूष या कावडीचा उपयोग श्री देव शंकरेश्वराच्या अभिषेकाला पाणी आणण्यासाठी करू लागले. पुढे हीच परंपरा कोदवली ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. शिमगोत्सवात पालखीसोबत ही कावड सजवून मोठय़ा भक्तिभावाने नाचवली जाते. हे कावड खेळे नृत्य पाहण्यासाठी असंख्य भक्तगण कोदवली गावात गर्दी करतात.

श्री देव शंकरेश्वराच्या कावडीचा महिमा आगळा आहे. शिमगोत्सव काळात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर ती नाचवत सादर केले जाणारे नृत्य लोभसवाणे असते. या कावडीमध्ये अर्धा तांब्या भरलेले पाणी कालांतराने दोन घागरी भरतील एवढे होते असे येथील भक्तगण सांगतात. राजापूर शहरानजीकच्या कोदवलीचे ग्रामदैवत श्री देव शंकरेश्वरच्या धार्मिक उत्सवाची परंपरा असलेला ‘कावड’ खेळ ही एक वैशिष्टय़पूर्ण परंपरा बनून राहिला आहे. श्री देव शंकरेश्वरची ‘कावड’ हा एक खेळ आहे. अशा प्रकारचा खेळ अवघ्या महाराष्ट्रात पाहण्यात नाही. श्री देव शंकरेश्वराच्या कावडीचा महिमा आगळा आहे. शिमगोत्सव काळात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर ती नाचवत सादर केले जाणारे नृत्य लोभसवाणे असते. देवाची कावड नवसाला पावते म्हणून श्रद्धेने नवसही बोलले जातात. शिमगोत्सवात श्री देव शंकरेश्वराच्या पालखीसोबत कावडही घरोघरी फिरवली जाते. विशिष्ट पेहरावातील खेळे पालखीबरोबरच कावडही नाचवतात. मात्र कावड नाचवण्याचे वाद्याचे ठेके हे थोडेसे वेगळे असतात. कावडीच्या मध्यभागी मोठे घुंगूरू लावण्यात येत असल्याने नाचवताना त्यांचा मंजूळ स्वर घुमू लागतो. कावडीच्या दोन्ही बाजूला गायीची दोन-दोन मुखे लावण्यात येतात. प्रत्यक्ष कावड रंगीत कापडाने सजवली जाते.

या कावडीच्या परंपरेची आणि श्री देव शंकरेश्वराच्या स्थापनेची कथाही तितकीच रंजक आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची ही कथा आहे. त्या काळी कोदवली गावची मूळ देवस्थाने आकार ब्राह्मणदेव, चौंडेश्वरी, गांगो विठ्ठलादेवी ही देवस्थाने सध्या असलेल्या श्री शंकरेश्वर मंदिरापासून दूर मांडवकर वाडी व अन्य ठिकाणी होती. त्या काळी सिद्धेश्वरबाबा गोसावी नामक सिद्धपुरुषाला श्री देव शंकरेश्वराने स्वप्नात दृष्टांत दिला. दुसऱया दिवशी पाहतात तर स्वप्नात सांगितलेल्या ठिकाणी स्वयंभू पिंडी त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सिद्धेश्वरबाबा गोसावी या सत्पुरुषाच्या पुढाकाराने या ठिकाणी देव शंकरेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. या पिंडीवर नजीकच असलेल्या एका बारमाही झऱयावरून श्री सिद्धेश्वरबाबा हे कावडीने नित्य पाणी आणून अभिषेक करत असत. त्यावरून ‘कावडीचे पाणी’ नावाने हे ठिकाण पुढे रूढ झाले. मंदिरानजीक हे ठिकाण असल्याचे ग्रामस्थ सांगतात, तर आषाढी कार्तिकीला ते कावडीने गंगेचे पाणी आणून श्री शंकरेश्वरावर अभिषेक करत असत.

पुढे या सिद्धेश्वरबाबांनी समाधी घेतली. त्यांच्या पश्चात गावकऱयांनी पुढाकार घेत देवस्थानची घडी बसवली. श्री देव शंकराबरोबरच मंदिर सान्निध्यात श्री ब्राह्मणदेव, श्री महाकाली, सिद्धेश्वरबाबांची स्मृती म्हणून श्री सिद्धेश्वर आणि पूरक स्थापना केली आणि गावरहाटी सुरू झाली. गावचे रायकर, मांडवकर, तरळ, मांडवे, कोंबडेकर, गोडांबे, झेपले, सागवेकर, अफंडकर, सुतार, म्हारकीचे प्रमुख असे बारा मानकरी नेमले गेले, तर देवस्थानचे पुजारी म्हणून लिंगायत आणि भाविक गुरव यांची नेमणूक केली गेली. अशा प्रकारे गावरहाटीचा कारभार सुरू झाला. देवस्थानच्या शिमगोत्सव, टिपूर आणि अन्य उत्सवांबरोबरच सिद्धेश्वरबाबा गोसावी या सत्पुरुषाची आठवण म्हणून ही त्यांची ही ‘कावड परंपरा’ या उत्सवाचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग बनून गेली.

शिमगोत्सव आणि त्रिपुरी पौर्णिमेला श्री देव शंकरेश्वराच्या पालखीसोबत कावडही सजवली जाते. हा चमत्कार पाहायला प्रचंड गर्दी होते. कावडीच्या सजावटीचा मान तरळ मंडळींकडे आहे. तिची पूजा केली जाते आणि पालखीसोबत नाचवली जाते. या कावडीत असलेल्या दोन्ही कलशांमध्ये पूजेच्या वेळी गावकरी अर्धं भांडं पाणी घालतात. देवाच्या दृष्टीने जिथे भक्तिभाव आढळतो तिथे या कलशांतलं पाणी वाढतं आणि भरून वाहू लागतं असा या कावडीचा आजवरचा अनुभव आहे. कावड पालखीसोबत जरी सर्वत्र नेली जात असली तरीही सगळीकडेच हे पाणी वाढत नाही. जिथे भाव असेल, श्रद्धा असेल तिथेच देव प्रचीती देतो अशी माहिती प्रमुख मानकरी विनायक महादेव रायकर यांनी दिली.