‘शहीद’ नव्हे, ‘हुतात्मा’!

7

>> जगन घाणेकर

हिंदुस्थानात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जाते. प्राचीन हिंदुस्थानच्या इतिहासात त्याचे दाखलेही आढळतात. त्यानंतर आलेल्या यवनी आक्रमकांनी येथे बस्तान मांडून आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली. येथील संपत्तीवरच नव्हे, तर येथील संस्कृतीवरही त्यांनी घाला घातला. पुढे इंग्रजांनीसुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला. या सर्वांचा परिणाम येथील भाषेवर आणि लोकांच्या राहणीमानावर झाला. देशातील अनेक प्रांतांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेवर आजही उर्दू आणि इंग्रजीचा प्रभाव आढळतो. देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकांना आणि पोलिसांना ‘शहीद’ म्हणून उपाधी लावली जाते हासुद्धा त्याचाच परिणाम आहे. ‘शहीद’ हा उर्दू शब्द असून मुस्लिमांमध्ये धर्मयुद्धात म्हणजेच जिहाद करताना मरण आलेल्यांना फिदाईन किंवा ‘शहीद’ असे संबोधले जाते. धर्मनिरपेक्ष हिंदुस्थानात देशाची सेवा म्हणजे कोणत्या पंथाची सेवा नव्हे. त्यामुळे देशासाठी वीरमरण आलेल्या जवानांना शहीद संबोधणे त्यांच्या वीरश्रीचा अपमान ठरतो. राष्ट्रासाठी जो आपले प्राण समर्पित करतो त्याला बलिदानी म्हटले जाते. यालाच संस्कृतमध्ये राष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणारा महान आत्मा म्हणजेच ‘हुतात्मा’ असा योग्य शब्द आहे. 23 मार्च या दिवशी महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रज सरकारने बलिवेदीवर चढवले. त्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘शहीद’ शब्दाचा अर्थ समजून घेऊन हा दिवस ‘राष्ट्रीय हुतात्मा दिवस’ म्हणून साजरा केला जावा.