ओम नमोजी आद्या!

>> जयराज साळगावकर

गणपती म्हणजे गणांचा, लोकांचा नेता. हा लोकनायक ‘सकलकिद्यांचा अधिपती’ आहे. माहितीच्या महाजालातही या बुद्धिदेवतेचं महत्त्व तितकंच आहे. डिजिटलायजेशनच्या संकल्पनेत चपखल बसलेल्या गणपतीचं गणेशोत्सवानिमित्त केलेलं स्तवन.

महाराष्ट्रात अमाप उत्सवात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव. नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की, या वर्षी गणपती कधी आगमन करणार हे आपण प्रथम पाहतो. आनंद, उत्साह याचं प्रतीक असणारा हा आपला ठेवा, ज्याला अध्यात्माचं, सामाजिकतेचं आणि सांस्कृतिकतेचं कोंदण लाभलं आहे. देखणी गणेशमूर्ती, धूप, अगरबत्तीचा घमघमाट, दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेली मूर्ती, मूर्तीच्या चेहऱयावरचं विलक्षण तेज आणि गणेशाच्या आगमनाने दुणावलेला उत्साह अशा विलोभनीय वातावरणाने आपण भारावून जातो. गणेशाची अध्यात्मात, पुराणात सांगितलेली महती जाणून त्याची साग्रसंगीत पूजा केली जाते, पण त्याहीआधी ‘माझा बाप्पा’ म्हणून मनोभावे आपण त्याला पुजलेलं असतं. भक्तांना आपलं दैवत वाटणारा हा बाप्पा इतर कोणत्याही दैवतापेक्षा म्हणूनच अधिक जवळचा.

गणपती म्हणजे गणांचा, लोकांचा नेता. हा लोकनायक ‘सकलविद्यांचा अधिपती’ आहे. तो ज्ञानी आहे. त्याच्या भक्तीने विघ्नं दूर राहतात म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. त्याचे दर्शन सगळ्यांसाठी सुखदायीच असते म्हणूनच त्याला सुखकर्ता, मंगलमूर्ती म्हटलं जातं. गणपतीच्या सर्व रूपांनी आपल्याला भुरळ घातली आहे. त्याचं मोहक रूप सृष्टीच्या प्रत्येक रूपात सामावलेलं आहे. ते जसं निसर्गात एकरूप झालेलं आहे तसंच आता तंत्रज्ञानाच्या युगातही सामावलेलं आहे. याच कारण म्हणजे, त्याची ‘ज्ञानमयो विज्ञानमयो’ ही असलेली महती. म्हणूनच आताशा गणेशाचं डिजिटल रूप सगळ्यांना हवंहवंसं वाटणं स्वाभाविक आहे. अथर्वशीर्षात गणेशाचे वर्णन ‘त्वं वाङ्मय त्व चिन्मयः’, ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि’ असे येते. गणपती म्हणजे साक्षात विद्येची देवता. ज्याच्यात संपूर्ण ब्रह्मांडातील ज्ञान आणि विज्ञान सामावले आहे. ही उपमा सर्वार्थाने सार्थ ठरावी अशी आहे. म्हणूनच या अत्याधुनिक जगात संगणकाची तुलना अनेकदा गणपतीशी केली जात असावी आणि इंटरनेटची तुलना गणपतीच्या ज्ञानाशी केली जात असावी.

डिजिटल ही विज्ञानाची एक पायरी आहे. विज्ञानात जे जे बदल होतात त्याचं श्रेय आपण त्या बुद्धिदात्याला दिलेय; कारण बुद्धीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणून तो आपली आद्यदेवता आहे. डिजिटलायजेशनच्या संकल्पनेत गणपती चपखल जाऊन बसला आहे. त्यामुळे पहाटे पहाटे घरबसल्या सिद्धीविनायकाची, दगडूशेट हलवाई गणपतीची आरती, दर्शन याचा लाभ, अनुभव घेऊ शकतो. अगदी गणपतीची पूजाही घरच्या घरी करता येते. डिजिटल युगात देवस्थानं जवळ आली आहेत. मात्र गणपती या माध्यमातून जास्त जवळ आला आहे. म्हणूनच गणेशोत्सवाची मूर्ती नोंदणी केली की तिचे फोटो साऱ्यांना पाठवले जातात. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी घरच्या गणपतीच्या आरतीत सहभागी होता येतं. डिजिटल युगाने गणपती आपल्याला अधिक सहजरीत्या उपलब्ध करून दिला आहे. गणपती हा जसा अक्षरांचा देव आहे तसाच तो गणिताचा देव आहे. आपण जे लिहितो जी आपली लिपी आहे त्याचं माध्यम गणपती आहे. त्याचं हे अक्षररूप त्याच्या मूर्तीत दिसतं, त्याच्या स्तोत्रात दिसतं, त्याच्या पूजेत दिसतं. अक्षरकलेचा उद्गाता हा गणपतीच आहे.

अशा या गणेशाचे संदर्भ वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतात. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचं रूप दिलं. 300 वर्षांपूर्वी पेशव्यांनी साजरा केल्याच्या उत्सवाचे संदर्भ मिळतात. अश्मयुगीन काळापासूनचे संदर्भ याबाबत मिळतात; मात्र त्याच्या अस्तित्वाचा काळ नेमका सांगता येत नाही. बाहेरून लोक येण्याआधी जे इथले भूमिपुत्र होते त्या लोकायतमध्ये गणेशाचं स्थान अनन्य आहे. लोकायतमध्ये तो वेगळ्या रूपात दिसतो. लोकायत ही आपली प्राचीन संस्कृती आहे. म्हणजे तेव्हापासून गणेशपूजनाची महती सांगितली जाते. उपनिषदातील ‘गणेश गायत्री’चा आधार घेत गणेशपूजा अडीच हजार वर्षांपासून प्रचलित असावी, असंही मत मांडलं जातं. तसेच गुप्तकालीन कोरीव लेण्यांत गणपतीचा उल्लेख नसला तरी वेरूळच्या लेण्यांत सप्तमातृकांच्या सोबत गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. यावरून इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंतच्या दरम्यान गणपतीची उपासना प्रचलित झाली असाकी, असा निष्कर्षही मांडला जातो. मात्र गणेशपूजन वा गणेशमंदिरांची प्रथा ही देवगिरीच्या यादवांच्या काळात प्रचलित झाली असावी आणि म्हणूनच या देवत्वाचे तत्कालीन ग्रंथ, काव्य यात संदर्भ पाहायला मिळतात. विशेषतः आद्य मराठी ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ या मानाचे स्थान असणाऱया ग्रंथाची सुरुवात गणेश स्तवनाने झालेली दिसते. ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला जगाचे आदिकारण ठरवून ‘ॐ नमोजी आद्या’ म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी गणपतीला वाङ्मयरूप देताना वापरलेल्या कल्पना, योजलेल्या प्रतिमा याचा अर्थ अतिशय मनोवेधक आहे. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ एवढंच नव्हे तर, गणेशाच्या अस्तित्वाने ओमकाररूपी ब्रह्मांड व्यापलं आहे.

शब्दांकन – वर्णिका काकडे