नायपॉल आणि आपण

>> मलिका अमरशेख

नायपॉल जुनी मुळं शोधत इथवर आले. कोलंबस मुळं नसतानाही शोधत गेला! आपण काय शोधतो? आपल्याकडले लेखक अजूनही परंपरा, रोमँटिसिझम यात अडकून पडले आहेत. खरं तर जगभरात जेवढे प्रश्न आहेत तेवढेच, किंबहुना जास्त प्रश्न आज हिंदुस्थानात आहेत. मुद्दाम ठरवून कुणी कथा लिहीत नाही हे कबूल, पण नायपॉल यांनी किमान हिंदुस्थानातल्या संघर्षमयी माणसांची ओळख करून घेतली तशी ती आपल्याकडील किती लेखकांना करावाशी वाटली? आपल्यातही एखादे नायपॉल, एखादा गॉर्की, ओ हेन्री, शेक्सपियर किंवा पुन्हा एखादे व्यास का होऊ शकत नाहीत? जो फक्त आणि फक्त माणसाचा शोध घेईल…

एका भल्या सकाळीच नेहमीप्रमाणेच स्वयंपाकाच्या गडबडीत असताना दारात दोन अनोळखी पाहुणे उभे राहिले.

एक होते व्ही. एस. नायपॉल न् दुसरे चारुदत्त! त्यांनी त्यांची ओळख सांगितली न् नामदेवची मुलाखत घेण्याची त्यांची तीक्र इच्छाही चारूनं सांगितली. मला वाटतं चारू हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा पत्रकार होते त्यावेळी तो नायपॉलना हिंदुस्थानातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून त्यांची मुलाखत घेण्यासाठी मदत करत होता. चहापाणी करताना नामदेव घरात नाही न् रात्रीपर्यंत तो परतण्याची शक्यता नाहीच हे सांगितल्यावरही ते जराही विचारात पडले नाहीत. उलट चारू यांनी मीही लेखन आणि कविता करते हे सांगितल्यावर ‘‘मग मी यांचीच मुलाखत घेतो प्रथम’’ असं नायपॉल म्हणाले. मला तर त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अचंबित, स्तंभित, आश्चर्यचकित असं बरंच कायसं झाले!

नायपॉल यांनी बरेच प्रश्न विचारले. जे मला समजले, पण माझं मराठी त्यांना कळण्यासारखं नव्हते. त्यामुळे चारूने ते भाषांतरीत करून त्यांना सांगितले. ही मुलाखत चालू असताना मला अनेक गोष्टी जाणवल्या. कारण माझी जो मुलाखत घेतो त्याला त्याआधी मीही वाचत जाते. एक लेखक दुसऱया लेखकाला अशाच प्रकारे जास्त चांगलं वाचू शकतो, असं माझं ठाम मत आहे. दुसरं म्हणजे नायपॉल यांनी नंतर पुस्तकात उद्धृत केलेली मुलाखत वाचताना तर हेही जाणवलं की, या माणसाची नजर म्हणजे एक्स-रे! आरपार, धारदार! माझी बोलीभाषा, शैली, माझी देहबोली, माझे विचार, एवढंच काय तर माझ्या घराच्या भिंतींचा रंग, तेथील फर्निचर.. एवढं सगळं तपशीलवार वर्णन म्हणजे ग्रेटच होतं. मला आठवतं त्यावेळी मी घराला मूव्ह कलर दिलेला होता. जो कुणीच देत नाही. मात्र नायपॉल यांना हा रंगही जाणवला ही कमालच म्हणायची. आमच्या घराचं व्यक्तिमत्त्व आमच्यासकट न्याहाळणारा, पारखणारा हा पहिलाच माणूस!

नायपॉल हे मूळ हिंदुस्थानी वंशाचे असले तरी त्यांचं पूर्ण जीवन हिंदुस्थानबाहेरचं! मला स्वतःला हिंदुस्थानबाहेरचे लेखक आणि हिंदुस्थानी लेखक हा वेगळय़ा लेखाचाच विषय वाटतोय. आणि यावर कुणीच भाष्य केलेलं नाही. असे का, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. लेखक म्हटल्यावर त्याला जातपात, प्रांत, देश, खंड यांच्या बॅरिकेडस् नकोतच. ‘न्यासोच्छिपटं जगत्सर्वम्!’ असं म्हटलं ते उगीच नाही. अर्थात महाभारतानंतर एकही महाकाव्य या भूमीत उपजलेलं नाही जे सार्वकालिक, सार्वभौम आणि या सुंदर, पण गरीब पृथ्वीवरील यच्चयावत लोकांचं दुःख असं शब्दबद्ध करील, जे कुणालाही आपलं वाटेल.
ऑस्कर वाईल्ड, ओ हेन्री, मॅक्झिम गॉर्की किंवा इव्हन पर्लबकची ‘द अर्थ’ ही कादंबरी, या मंडळींच्या साहित्यातील प्रत्येक माणूस हा आपल्या मातीतला वाटतो. खूप कमी अपवाद वगळता आपल्या हिंदुस्थानातल्या अशा कुठल्या लेखकांच्या लिखाणात असं आढळतं? एक रवींद्रनाथ टागोर यांचा मात्र अपवाद. अर्थात त्यांना जो नोबेलसारखा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो यासाठी नाही, तर गीतांजलीसाठी.

नायपॉल जुनी मुळं शोधत इथवर आले. कोलंबस मुळं नसतानाही शोधत गेला! आपण काय शोधतो? आपण आपल्याला तरी शोधतो का? इतरांची गोष्टच सोडा. जे लेखक स्वतःला, दुसऱयाला, समाजाला, व्यवस्थेला शोधत नाहीत त्यांना लेखक म्हणण्यापेक्षा लेखनिकच म्हणावं!

आपल्याकडले लेखक अजूनही परंपरा, रोमँटिसिझम यात अडकून पडले आहेत. निखळ मानवी भावना कुठे दिसत नाही. गिमिक्स, पोज, बांधिलकीचा भाबडेपणा, कुठल्या तरी शोधासाठी नाही, तर फक्त आत्मप्रौढीनं ग्रासलेलं लिखाण खरडण्यात यांचे शब्दच्छल सुरू असतात. निव्वळ आणि निव्वळ मानवी अस्तित्व, त्याचं दुःख, त्याचे प्रश्न हे आज आपल्याला किती साहित्यांतून पाहावयास मिळतात? खरं तर जगभरात जेवढे प्रश्न आहेत तेवढेच, किंबहुना जास्त प्रश्न आज हिंदुस्थानात आहेत. अठरापगड जाती, दारिद्रय़, अज्ञान, बेरोजगारी, आजही मैल मैल चालून चार हंडे पाणी बायांना आणावं लागणं… अनेकदा दहा-दहा फूट खोल विहिरीत उतरून बायका ते गढूळ पाणी आणून संसार चालवतात.

कर्ज काढून नवरा जातो. मागे पोरबाळं राहतात तरी बाई न मरता झगडत राहते. सावकारांच्या नजरांच्या जळवा अंगावर चिकटलेल्या काढत राहते. यावर कथा आहे का आजवर कुणाची? मुद्दाम ठरवून कुणी कथा लिहीत नाही हे कबूल, पण नायपॉल यांनी किमान हिंदुस्थानातल्या संघर्षमयी माणसांची ओळख करून घेतली तशी ती आपल्याकडील किती लेखकांना करावाशी वाटली? लाखो हत्तींना मारणाऱया वीरप्पनला मारायला अनेक वर्षे लागली. वाळू उपसा करून डोंगरदऱया कुरतडणारे, मानवी अवयवांची तस्करी करणारे, स्त्राrला रेडलाइट एरियात धाडणारे असे अनेक नव्हे, तर शेकडो प्रश्न वणव्यागत आपल्या देशात पसरले आहेत. तरीही आपण किती काळ आत्मग्लानीत राहणार आहोत? आपल्याला आरसा दाखवायला आता व्ही. एस. नायपॉल येणार नाहीत, पण आपल्यातही एखादे नायपॉल, एखादे गॉर्की, ओ हेन्री, शेक्सपियर किंवा पुन्हा एखादे व्यास का होऊ शकत नाहीत? जो फक्त आणि फक्त माणसाचा शोध घेईल, त्याच्या दुःखाचा विचार करील आणि ते शब्दबद्ध करील!

(लेखिका ज्येष्ठ कवयित्री आहेत.)