मुद्दा : भोंदूबाबांचा बीमोड

4

>> मनमोहन रोगे

‘अपत्यहीन दाम्पत्यास मुलाची आशा दाखवून भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार’, ‘मांडूळ तस्कर जेरबंद’, ‘वाघाचे कातडे घेऊन आलेल्या तरुणांना अटक’, ‘कुत्रे-मांजरे घरात पाळून त्यांच्या रक्ताचा वापर अघोरी विद्येसाठी करणाऱया कुटुंबास अटक’, ‘गुप्तधनासाठी बालकाचा बळी देण्याच्या प्रयत्नात असणाऱया बाबास आणि भक्तास अटक’ यासारख्या बातम्या आपण वरच्यावर वृत्तपत्रातून वाचतो. वाहिन्यांवरून ऐकतो-पाहतो. हे असले धंदे करणारे बाबा-माता हे भोंदू असतात हे उघड आहे तरी अंधश्रद्धाळू अशा बाबा-मातांवर विश्वास ठेवून हजारो- लाखो रुपये त्यांच्यावर लुटतात. कधी स्वतःचा वापर करू देतात तर कधी इतरांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत हे दुर्दैवी होय. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा करूनही हे असे प्रकार सतत घडतात. हे सरकारचे, पोलिसांचे तसेच नागरिकांचेही अपयश होय. त्याचप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी होय. कोणतेही कृत्य करण्यापूर्वी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला ते पटते का पहावे. पैशांचा पाऊस पाडणारे बाबाही कधीतरी आपले अस्तित्व दाखवतात. त्यालाही लोभी माणसे फसतात. जो माणूस पैशांचा पाऊस पाडू शकतो तो स्वतः गरीब का राहिला? मुळात त्याला आपल्याकडून हजारो रुपये घ्यायची गरज का लागली? याचा मूर्ख माणसे विचार कसा करत नाहीत हेच कळत नाही. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिह्यात अशाच पैशाच्या लोभापायी मुंबई येथून गेलेली पाच-सात माणसे जीव गमावून बसली होती. बरे रोज अशाप्रकारच्या बातम्या वाचून-ऐकूनही माणसे शहाणी होत नाहीत याला काय म्हणावे? तरी बरे गेल्या काही वर्षांपासून लोकलमध्ये बंगाली बाबाच्या जाहिराती जवळ-जवळ बंद झाल्यात. कोणत्याही समस्याचे समाधान फक्त 24 तासांत करणाऱया त्या भोंदूबाबांचा जसा बीमोड मुंबई-उपनगरीय पोलिसांनी केला. तसाच बंदोबस्त राज्यातील पोलिसांनी जागोजागी असलेल्या भोंदूबाबांसाठी करायला हवा. ते भोंदूबाबाच नसले तर असे अघोरी प्रकार घडणार नाहीत. लोक फसणार नाहीत आणि पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा खराब होणार नाही असे वाटते.