दिल्लीतील लक्ष्मणराव

>> नीलेश कुलकर्णी

राजधानी दिल्लीत तशी मराठी माणसांची नावे रस्त्याला असणे ही एक दुरापास्त गोष्ट, पण राजधानीतील महत्त्वाच्या आयटीओ चौकाजवळ आपण गेलो की, संगीतकार विष्णू दिगंबर पलुस्करांच्या नावाचा रस्ता लागल्यानंतर आपल्याला मुंबई किंवा पुण्यात फिरत असल्याचा भास होतो. अर्थात त्याच रस्त्यावर हिंदी सारस्वतांनी बांधलेले हिंदी भवन असल्याने आपल्या मराठी भावविश्वाला थोडा झटका नाही म्हटला तरी बसतोच. मात्र याच हिंदी भवनाच्या शेजारी एक चहाचे दुकान आहे आणि त्याची माहिती झाल्यावर आपला मराठी उर पुन्हा भरून येतो. हे दुकान सर्वसामान्यांच्या चहाच्या दुकानासारखेच असेल असा तुमचा प्रथमदर्शनी समज होऊ शकतो. मात्र, या दुकानातून चहा विकणारा अवलिया जेव्हा सरस्वतीची पूजा बांधताना दिसतो त्या वेळी मात्र अवाक् व्हायला होते. लक्ष्मणराव या नावाने हे व्यक्तिमत्त्व दिल्ली आणि तिकडील एकूणच साहित्यविश्वात परिचित आहे. पंचवीसहून अधिक पुस्तके, नाटक, कथासंग्रह त्यांनी लिहिले आहेत. हे कसे शक्य झाले, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र लक्ष्मणरावांशी बोलताना या प्रश्नाचे धागे ते स्वतःच हळूहळू उलगडतात. लक्ष्मणराव हे नाव हल्ली दिल्लीच्या उत्तर हिंदुस्थानच्या हिंदी साहित्य विश्वात हिंदीतच सांगायचे झाले, तर जानेमाने झाले असले तरी त्यामागचा लक्ष्मण नथूजी शिरभाते या माणसाचा प्रवास हा अत्यंत रोमहर्षक, संघर्षपूर्ण व तितकाच प्रेरणादायी आहे. 1975मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी लक्ष्मण नावाच्या एका विदर्भातील मुलाला हिंदीच्या प्रेमाने दिल्लीत ओढून आणले. कुटुंबांची कसलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना लक्ष्मणरावांनी हिंदीच्या प्रेमापोटी दिल्ली गाठली आणि नंतर ते पक्के दिल्लीकर बनले. गेल्या त्रेचाळीस वर्षांत या मराठी माणसाने दिल्लीत आपले स्थान निर्माण केले. महाराष्ट्रातून सहावी अर्धवट सोडून दिल्ली गाठलेल्या लक्ष्मणरावांनी पुढे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुस्तक लिहिण्याची लक्ष्मणरावांना मनस्वी आवड. मात्र, एका प्रकाशकाने पुस्तक छापण्यास तर नकार दिलाच, शिवाय ‘गेट आऊट’ म्हणत ऑफिसबाहेर काढले. ती सल मनात राहिलेले लक्ष्मणराव मग जिद्दीने अधिकच खंबीर झाले आणि त्यांनी स्वतःचीच छोटी प्रकाशन संस्था काढली. गुलशन नंदांच्या साहित्याने प्रेरित होऊन त्यांनी लेखनाला सुरुवात केली. आतापर्यंत लक्ष्मणरावांनी 25च्या वर पुस्तके लिहिली आहेत. त्यात रामदास, रेणू, नर्मदा यांच्यासह पाच कथासंग्रह आहेत, तर अस्तित्व, अहंकार, लडकों का उत्तरदायित्व या पुस्तकांखेरीज त्यांनी इंदिरा गांधींवर लिहिलेले नाटकही प्रसिद्ध आहे. ‘बॅरिस्टर गांधी’ नावाचे त्यांचे पुस्तकही चांगलेच नावाजले गेले. गुलशन नंदांसारखे बनायचे हे स्वप्न घेऊन दिल्लीत आलेले लक्ष्मणराव आता इथे चांगलेच स्थिरावले आहेत. दोन मुलांना उच्चशिक्षण दिल्यानंतर आता मला हिंदीतला शेक्सपियर व्हायचेय, हे स्वप्न ते बोलून दाखवतात. हिंदी पुस्तकांचे उर्दू तसेच पंजाबी भाषांमध्ये अनुवाद करण्याचाही त्यांचा मानस आहे. लक्ष्मणरावांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची घेतलेली भेट अविस्मरणीय वाटते, तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही लक्ष्मणरावांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केल्याची आठवण ते आवर्जून सांगतात. अर्थतज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आवर्जून लक्ष्मणरावांना जाऊन भेटले आहेत. आम आदमी पक्षाचा जन्म होण्यापूर्वी चळवळीत असलेल्या अरविंद केजरीवालांचा लक्ष्णरावांचे चहाचे दुकान हाच गप्पाष्टकांचा अड्डा होता. ‘हिंदी भवन’जवळचा पानाचा ठेला हा त्यांचा ऑफिशियल ऍड्रेस. दिल्लीत राहून दिल्ली आत्मसात करणारा तसेच हिंदीची पूजा बांधणारा हा अवलिया त्यामुळेच वेगळा ठरतो. दिल्लीतल्या हिंदी वर्तुळात जम बसवलेल्या लक्ष्मणरावांना आपल्या मराठी असण्याचाही अभिमान तितकाच वाटतो.

– [email protected]