काल, आज आणि उद्या

>> निमिष पाटगावकर

४ फेब्रुवारी २००४ रोजी फेसबुकच्या माध्यमातून आभासी जगाची दारं खुली झाली. आज पंधराव्या वर्षात पदार्पण करणाऱया फेसबुकचं रूपडं पालटलं नसलं तरी त्याला विविध पैलू मात्र मिळाले आहेत. फेसबुकचा आजपर्यंतचा हा प्रवास मांडतानाच या आभासी जगाच्या भविष्याचा धांडोळा घेणारा हा लेख.

हॉर्वर्ड विद्यापीठाने आजवर जगाला खूप दिले. आतापर्यंतच्या नोबेल विजेत्यांत सर्वात जास्त विजेते माजी विद्यार्थी अथवा प्राध्यापक म्हणून हॉर्वर्डशी संलग्न आहेत. नोबेल असो वा पुलित्झर असो वा अजून कुठला पुरस्कार असो, हॉर्वर्डचा ठसा सहज उठून दिसतो. हॉर्वर्डच्या पाण्यातच नवनवीन शोध लावायला उद्युक्त करायची संजीवनी आहे. याच विद्यापीठात शिकलेला, पण कुठलाही असा पुरस्कार पाठीशी न असलेला अजून एक विद्यार्थी म्हणजे मार्क झुकेरबर्ग. आज जगातल्या १७५ कोटी लोकांना ‘फेसबुक’ नावाच्या एकाच माध्यमातून जोडणाऱया मार्कला या लोकांच्या सदिच्छा हाच सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार असेल.

अमेरिकेतील विद्यापीठात विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणाऱया पुस्तिकेला फेसबुक म्हणतात. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा अमेरिकेत डिजिटल युगाची सुरुवात होत होती तेव्हा ही माहिती डिजिटल स्वरूपात आणायला केवळ आठवडय़ाचा कालावधी पुरेल हे आव्हान म्हणून स्वीकारणाऱया मार्कने नवीन वेब पेजची मांडणी केली आणि सादर केले ते तेव्हाचे ‘द फेसबुक डॉट कॉम’ आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी २००४. विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या एका खोलीत आपल्या मित्रांसोबत चालू केलेला हा उद्योग आणि हा उद्योगपती आज जगातल्या टॉपच्या यादीत विराजमान झाला आहे. आज फेसबुकच्या १४व्या वाढदिवशी विद्यापीठाच्या माहिती संकलनासाठी सुरू केलेले हे रोपटे वाढून जवळ जवळ तीन हजार कोटी डॉलर्सचा उद्योगधंदा झाला आहे. फेसबुकने व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम यासारख्या कंपन्या आपल्या कवेत घेत सोशल मीडिया क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.

फेसबुक निर्मितीचा जो एकमेकांशी माहिती देवाणघेवाण, संवाद अथवा एखाद्या गोष्टीवर आपले मतप्रदर्शन करण्याचा मूळ हेतू होता तो आजही कायम आहे, पण आज हेच मूळ उद्देश वापरून फेसबुकचे पैलू वाढले आहेत. आज फेसबुक नुसत्या गप्पागोष्टी करण्याचे माध्यम राहिले नसून जाहिरातीचा उत्तम पर्याय झाला आहे. ज्यांचे फेसबुकवरचे मित्र पाच हजारांच्या घरात आहेत आणि त्यांचे फेसबुकने मान्यता दिलेले अधिकृत फेसबुक पेज आहे अशा लोकांना वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाहिरात पोहोचवायला या फेसबुकवरच्या लोकप्रिय मंडळींचा खुबीने वापर केला जातो. या लोकप्रिय लोकांना ‘इन्फ्लुएन्सर’ असे संबोधले जाते. बऱयाच वेळा हे इन्फ्लुएन्सर्स लौकिकार्थाने नावाजलेल्या व्यक्ती नसतातही, पण फेसबुकवरची त्यांची मित्रसंख्या त्यांना जाहिरातीच्या दृष्टीने ‘लोकप्रिय’ हा दर्जा देते. हे गणित अगदी सोपे आहे. एकतर टीव्ही किंवा इतर माध्यमांच्या मानाने सोशल मीडियावर जाहिरात करण्याचा खर्च तुलनेत कमी असतो. एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची भलावण हे इन्फ्लुएन्सर्स आपल्या फेसबुक पेजवर मोबदला घेऊन करतात. यांचे मित्र आणि मित्रांच्या मित्रापर्यंत ही जाहिरात आपोआप पोहोचली जाते. सोशल मीडियावरची जाहिरात तुम्ही बघेपर्यंत तुमची वाट बघत असते. जाहिरात करणाऱयांना पण या माध्यमाने किती लोकांपर्यंत जाहिरात पोहोचली याचा योग्य अंदाज येतो.

अर्थात हा प्रकार पाश्चिमात्य देशांत खूप आधीच रुजू झाला आहे. तिकडे फेसबुकचा वापर निव्वळ संवाद साधण्यासाठी करण्याऐवजी जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम म्हणून केला जातो. हिंदुस्थानातही फेसबुक हे जाहिरातींचे माध्यम म्हणून आता चांगलेच रुजू झाले आहे. याचे कारण म्हणजे लोकसंख्या आणि त्यायोगाने फेसबुक वापरणाऱयांची संख्या. एकेकाळी लोकसंख्येचा विस्फोट म्हणून पाश्चिमात्य राष्ट्रांकडून काहीसे हिणवले गेलेले हिंदुस्थान, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे देश ब्रिक्स समूह बनून आज जगाची बाजारपेठ झाले आहेत. अमाप लोकसंख्या हा एकेकाळी असलेला शाप आज बाजारपेठेच्या रूपाने वरदान झाला आहे. एकंदरीत फेसबुकचे वापरकर्ते बघता चीनमध्ये फेसबुकवर बंदी आहे, पण २०१७च्या एका सर्वेक्षणानुसार फेसबुकच्या एकूण वापरकर्त्यांपैकी सर्वात जास्त म्हणजे २४१ दशलक्ष वापरकर्ते हिंदुस्थानात आहेत. त्याखालोखाल अमेरिकेचा (२४० दशलक्ष) नंबर लागतो आणि मग ब्राझील (१३९ दशलक्ष) येते. रशियामध्येही फेसबुकची लोकप्रियता वाढून २०१३ साली १ कोटी असलेली वापरकर्त्यांची संख्या चार वर्षांत दुपटीपेक्षा जास्त झाली आहे.

नुसते फेसबुकच नव्हे तर सर्व सोशल मीडियावर आपण काय लिहितो हे तपासायला आज विविध गट कार्यरत असतात. तुम्ही जर जबाबदार लोकप्रिय व्यक्ती असाल तर तुमच्या एखाद्या प्रत्येक शब्दावर लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येऊ शकतात. तेव्हा शब्द निवडून बोलावा हे उत्तम. तुमच्या फेसबुक पोस्टवर, फोटोंवर, लोकेशन स्टेटसवर आणि बऱयाच गोष्टींवर विश्लेषण करणाऱया जगातल्या अनेक नामांकित कंपन्या नजर ठेवून असतात. अर्थात ही नजर तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळवून देण्यात कमी पडतात तेव्हा गरज असते ती तुम्ही फेसबुकवर काय आणि कसे पोस्ट करताय याची. तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरची माहिती इतर ठिकाणाहून मिळणाऱया माहितीशी जोडली जाते आणि तुमचे एक आभासी आयुष्यच या विश्लेषण करणाऱया कंपन्या बनवत असतात. उदाहरण द्यायचे तर तुमच्या फोनवरून तुम्ही फेसबुकवर ‘विमानतळावर असून लंडनला चाललो असल्याचे’ स्टेटस टाकलेत तर तुम्हाला थोडय़ाच वेळात इंग्लंडमधून हिंदुस्थानात स्वस्तात फोन कॉलचे प्लॅन, तिकडची हॉटेल्स, तुमच्या प्रोफाईलवरून अनुमान केलेल्या आवडीच्या गोष्टींच्या ऑफर्स धडाधड यायला लागतात. महाविद्यालयीन अथवा एकंदरीत तरुण गटच नाही, तर सर्वच वयोगटांतील लोक आपल्या इथे ऊठसूट फेसबुकवर अपडेट टाकत असतात. खरं बघायला गेलं तर तुम्ही कुठे जेवलात, पत्नीबरोबर कुठे निवांतपणे काही क्षण घालवलेत अथवा इतर बारीकसारीक गोष्टी या सोशल मीडियाच्या चव्हाटय़ावर आणायची काही गरज नसते. कधी कधी अतिरक्त माहिती देऊन तुम्हीच तुमच्या सुरक्षेला धोका देत असता. दुर्दैवाने हिंदुस्थानातल्या बऱयाच लोकांचा ही गरज नसलेली फुटकळ माहिती फेसबुकवर टाकत बसण्याचा चाळा आहे आणि त्याला लाईक किंवा कॉमेंट करत बसायचा छंद जोपासलेलेही अनेक भाट असतात.

आपल्याच विश्वात रमणाऱ्या लोकांना फेसबुक हा आपल्या फुटकळ माहिती आणि त्याला प्रतिसाद देणाऱयांमुळे जणू जगाला आपल्याकडे बघायला खूप वेळ आहे हा भास दाखवणारा आभासी स्वर्ग आहे, पण आज या लोकांमुळे फेसबुक थोडेफार बदनाम झाले आहे आणि लोक ट्विटर किंवा अन्य पर्यायांकडे वळत आहेत. आज पंधराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या फेसबुकला आपल्या वापरकर्त्यांचे वर्गीकरण करावे लागेल अथवा फेसबुकवरचा अनावश्यक गोंगाट कमी करावा लागेल, नाहीतर रोज रोज येणाऱया नवीन पर्यायांनी फेसबुकला सोळावं वरीस धोक्याचंही ठरू शकतं.

[email protected]