अक्षर श्रीमंत


>>प्रज्ञा कुलकर्णी

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक वामन देशपांडे यांचा लेखन प्रवास आता वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी सुरूच आहे आणि तो थांबणारही नाही. 125 पेक्षा जास्त छोटी-मोठी पुस्तके, वृत्तपत्रांतील विपुल लेखन, कविता, बालवाङमय, समीक्षा, परीक्षणे असा भरपूर ‘बॅलन्स’ ‘अक्षरप्रेमी’ वामनरावांच्या साहित्यखात्यात जमा आहे.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक वामन देशपांडे यांनी गेल्या आठवडय़ात वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला. देशपांडे काका हे संत साहित्याचे निस्सीम उपासक तर आहेतच; परंतु त्यांचे अभिजात शाश्वत मराठी कवितेवर प्रचंड प्रेम आहे. संतसाहित्यावर विशेषतः ज्ञानेश्वरी, दासबोध, अमृतानुभव, श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांवर ते जे निरूपण करतात ते ऐकताना आपला जीव भारावून जातो. तेच भारावलेपण श्रोते, त्यांचे साहित्य आणि मराठी भावगीतांवरचे निरुपण ऐकताना अनुभवतात. चित्रकला, शिल्पकला, नृत्य हे विषयसुद्धा त्यांच्या चिंतनाचे आणि अभ्यासाचे आहेत. वामन देशपांडे हे एक उत्तम व्यंगचित्रकारदेखील आहेत. काही काळ वृत्तपत्रांमधून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या काही कविता आणि अभंग ध्वनिमुद्रित झाले आहेत. देशातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी त्यांची प्रवचने झाली आहेत. पैठणला साक्षात नाथांच्या वाडय़ात त्यांनी ज्ञानेश्वरीवर केलेले प्रवचन म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक आनंददायक घटना असे त्यांना वाटते. मुलांसाठीसुद्धा त्यांनी असंख्य पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये अंकलिपीपासून ते बडबड गीते, मुलांसाठी दासबोध, ज्ञानेश्वरी, सुविचारमाला, लेखक, कवी यांची थोडक्यात ओळख अशी पुस्तके समाविष्ट आहेत. साहित्य क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा लेखक, कवी, संपादक, प्रकाशक यांचा त्यांना जवळचा सहवास लाभला आहे. लेखक अरविंद गोखले, व. पु. काळे, बाबा महाराज सातारकर यांसारख्या दिग्गज लेखकांच्या ग्रंथांना त्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. देशपांडेकाकांचे आयुष्य शब्दभारले आहे

आम्हा घरी धन। शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे। यत्ने करू।।
शब्दचि आमुच्या। जीवीचे जीवन।
शब्दे वाटूं धन। जनलोकां।।
तुका म्हणे पहा। शब्दचि हा देव।
शब्देंचि गौरव। पूजा करू।।

देशपांडे यांच्या लेखन प्रवासाला पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी विपुल लेखन केले आणि आजही पंच्याहत्तरीच्या उंबरठय़ावर उभे असताना त्याच उत्साहाने, त्याच नेमाने त्यांचे लेखन, अभ्यास, मनन, चिंतन अथकपणे सुरूच आहे. आज त्यांच्या नावावर 125 च्या वर लहानमोठे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. शालेय वयातच त्यांना लेखन वाचनाचा छंद लागला. ते दहावीत असतानाच त्यांची पहिली कथा कोकण वैभव साप्ताहिकात प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून त्यांचे लेखन अविरतपणे सुरू आहे. आजवरचा हा त्यांचा सारा लेखनप्रवास त्यांनी आपल्या ‘आणि ग्रंथोपजिविये’ या आत्मचरित्रातून प्रकट केला आहे. देशपांडे यांनी रिझर्व्ह बँकेत तब्बल एकेचाळीस वर्षे नोकरी केली. स्वतःचे ‘वाल्मीक प्रकाशन’ सुरू केले. अनेक दिवाळी अंकांचे संपादन केले. मराठी आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन ते एम.ए. झाले. के. सी. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे वृत्तपत्रविद्या या विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सामना’, ‘मराठा’, ‘तरुण भारत’ यांसारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी संतसाहित्यावर विपुल लेखन केले. विशेषतः ‘सामना’मधून त्यांच्या लेखनाला अधिक बहर आला. कथा, कादंबऱ्या, कविता, समीक्षा, बालवाङमय इत्यादी साहित्य प्रकारांतही त्यांनी भरपूर लेखन केले. अभिजात कविता हा त्यांचा विशेष जिव्हाळय़ाचा विषय आहे.

वामनराव देशपांडे यांचे सद्गुरू आहेत मंत्रालयम् स्थित राघवेंद्रस्वामी. देशपांडे नेहमी म्हणतात की, त्यांचा भक्तिमार्ग राघवेंद्र स्वामींनीच उजळून टाकला आहे. ज्ञानेश्वर हे त्यांचे आराध्य दैवत आहे. ज्ञानेश्वरीतले तत्त्वज्ञान ते केवळ निरूपणातून सांगत नाहीत तर ते तत्त्वज्ञान स्वतः प्रत्यक्ष जगतात. त्यांना भेटणाऱया प्रत्येक व्यक्तीला ते ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान प्रेमाने समजावून सांगतात. त्यांनी आजवर दोन-अडीचशे पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. सात-आठशे पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. त्यांचे ‘नंदादीप’ हे व्यक्तिचित्रांचे पुस्तक अप्रतिम आहे. वामन देशपांडे यांचा लेखन प्रवास आता पन्नाशीत आला आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांच्या लेखन प्रवासाचाही अमृत महोत्सव साजरा होवो, हीच प्रार्थना!

[email protected]