इंग्रजीने सोडविले पटसंख्येचे गणित

>> प्रकाश जोशी

संभाजीनगर तालुक्यातील सांजखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नितीन दत्ताप्पा गबाले या शिक्षकाने मुलांना अवघड आणि कंटाळवाणी वाटणारी इंग्रजी भाषा आवडती करून दाखवण्याची किमया केलेली आहे. दुर्गम भागातील या शाळेतील विद्यार्थी अस्खलित इंग्रजी बोलतात. नव्हे, तर कुणाचीही इंग्रजीतून मुलाखत घेतात. इंग्रजीसोबतच गणितातही हे विद्यार्थी पारंगत व्हावेत यासाठी या शिक्षकाने प्रयत्न केले आहेत. नितीन गबाले यांच्याशी साधलेला संवाद.

नितीन गबाले, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक

– आपल्या शाळेची शैक्षणिक परिस्थिती कशी होती?
– संभाजीनगर तालुक्यातील सांजखेडा हे खेडेगाव असून गावाला जायला चांगला रस्ताही नाही. अशा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजी, गणित विज्ञानाचे फारसे उपक्रम राबवले जात नव्हते. मुलांना इंग्रजी, गणिताची भीती वाटत होती. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता. त्यामुळे विद्यार्थी संख्येवरही परिणाम झाला होता.

– गावाची लोकसंख्या, आर्थिक स्तर कसा आहे?
– सांजखेडा हे संभाजीनगर शहरापासून 40 कि.मी. अंतरावर असलेले दुर्गम गाव. आजही या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावाची लोकसंख्या जेमतेम 1500 ते 2000 असून शेती व मजुरी करणारेच पालक असल्यामुळे ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, परंतु शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचा विषय निघाल्यावर त्यांनी चांगली साथ दिली. आतापर्यंत 4 ते 5 लाख रुपये लोकवर्गणी विविध उपक्रम राबवण्यासाठी ग्रामस्थांनी दिली. गावातील प्रतिकूल परिस्थिती असलेले एकनाथ गवळी, आप्पासाहेब गवळी, राजू जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले. शिक्षणाच्या सोयीसुविधा नसल्यामुळे इंग्रजीचा उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्याला शिक्षकांची साथही चांगल्या प्रकारे मिळाली.

– इंग्रजीची भीती कशी घालवली?
– जिल्हा परिषद शाळा म्हटले की, तिच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते, परंतु तेथील विद्यार्थीही हुशार असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला तर तेही काहीही करू शकतात हा विश्वास माझ्या मनात होता. त्यामुळे दररोज इंग्रजीचे शब्द पाठ करून घेण्यापासून सुरुवात केली. दररोज इंग्रजीतून परिपाठ घेणे सुरू केले. इंग्रजी संभाषण कानावर पडत गेले. त्यामुळे मुलांमध्ये इंग्रजीविषयी गोडी निर्माण झाली आणि भीती दूर झाली.

– इंग्रजीसाठी तुमचा काय फॉर्म्युला आहे?
– माझे शिक्षण एम.ए. इंग्रजी बी.एड. असून मला इंग्रजी शिकविण्याचा 21 वर्षांचा अनुभव आहे. स्मार्ट पीटी प्रशिक्षणात मी इंग्रजीचा राज्यस्तरावरील प्रशिक्षक आहे. त्याचा सांजखेडय़ातील मुलांना फायदा करून देण्याचा मी निर्णय घेतला. इंग्रजी व गणित हे विषय मुलींना, मुलांना सोपे जावेत यासाठी मी स्वतः नऊ ऍक्टिव्हिटी बुक्स तयार केले असून या पुस्तकांच्या माध्यमातून इंग्रजीची तोंडी तयारी केली. व्याकरणापासून ते सामान्य ज्ञानापर्यंत सर्व तयारी करून घेतली. मुलांचे गट पाडून त्यांना इंग्रजीचे संभाषण करायला लावायचे, त्यांच्यामध्ये इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगची स्पर्धा घ्यायची आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून खिशातून त्यांना बक्षीस द्यायचा उपक्रम नियमित राबवला जातो. विशेष म्हणजे आमच्या शाळेत दररोज एक तास इंग्रजीतून परिपाठ घेतला जातो. त्यामुळे मुलांना इंग्रजीची गोडी लागली आहे. इंग्रजीसोबतच दररोज गणित, मराठीचा 4 थी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे एक विशेष तास मी घेतो.

– इंग्रजी विषयावर भर दिल्यामुळे विद्यार्थी संख्येचे गणित सुटले?
– इंग्रजी ही काळाची गरज असली तरी मातृभाषा मराठीलाही नाकारून चालणार नाही. मराठी माणूस वाचवायचा असेल तर त्याला इंग्रजीचे ज्ञान मिळालेच पाहिजे हा उद्देश डोळय़ासमोर ठेवून मी काम केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी टिकले, नव्हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे विद्यार्थीही आमच्या शाळेत आले.

– तुमचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवील का?
– इंग्रजी शाळांचे जाळे मजबूत होत असल्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळा धोक्यात आल्या असून विद्यार्थी नसल्यामुळे त्या बंद पडत आहेत. या शाळांमध्येच जाणारे विद्यार्थी टिकवायचे असतील तर प्रत्येक शाळांनी अशा प्रकारे नवनवीन उपक्रम राबवले तर आपले विद्यार्थी अन्य शाळांमध्ये जाऊ शकणार नाहीत. यासाठी शिक्षकांना अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. शेवटी विद्यार्थी राहिले तर जिल्हा परिषदेच्या शाळा टिकतील याचा विचार शिक्षक बांधवांनाच करावा लागेल.

– आपण करीत असलेल्या कामाबद्दल समाधानी आहात का?
– चांगले काम करायचे म्हटल्यावर अडचणी येतच असतात. कोणी काहीही म्हणो, आपण आपले काम करीत राहिले पाहिजे. कामावर श्रद्धा असल्यामुळे कुणी चांगल्या कामाची पावती घ्यावी म्हणून नव्हे तर चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी मी काम करतो. विशेष म्हणजे हे करीत असताना मला आनंद मिळतो आणि त्यामुळे मी समाधानी आहे. आज या शाळेत आहे, उद्या दुसरीकडे जाईल. तिथेही तसेच काम करीत राहील.

इंग्रजीतून मुलाखत
सांजखेडा शाळेमध्ये गुणवत्तेची पहाट उगवण्यासाठी नितीन गबाले या शिक्षकाने रात्रीचा दिवस एकच केला आहे. इंग्रजीतून मुलाखत, कितीही मोठी संख्या इंग्रजीत लिहिणे, वाचणे व त्यावरील क्रिया अचूक करणे, त्यांची शाब्दिक उदाहरणे तयार करणे, अपूर्णांक, कोणत्याही वस्तूंची ओळख ती वस्तू दाखवताना इंग्रजीतून सांगणे, त्याशिवाय सामान्य ज्ञानावर भर देण्यात आलेला असून आज कुठलाही विद्यार्थी इंग्रजीतून मुलाखत घेऊ शकतो, ऐनवेळी कुठल्याही विषयावर इंग्रजीत वाक्य तयार शकतो हे पाहिल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हजारो रुपये खर्च करूनही इंग्रजी बोलता येत नाही. ही वस्तुस्थिती असताना एक पैसाही न घेता गबाले सरांनी प्रत्यक्षात प्रत्येक विद्यार्थी इंग्रजीमय करून दाखवला.

[email protected]