आपला माणूस : लिपीकार बापू वाकणकर

22


>>प्रशांत कुलकर्णी

भाषावृद्धीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लिपी शास्त्राकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणारे आणि देवनागरी लिपी संगणकावर आणण्यात महत्त्वाचे योगदान असलेले लिपीकार वाकणकर विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. हिंदुस्थानी भाषांमध्ये पुस्तकं छापण्याच्या दृष्टीने विविध हिंदुस्थानी लिपींसाठी मुद्रण तंत्रज्ञान विकसित करणारे, संगणकीय उपयोजनासाठी काम करणारे लिपीकार बापू वाकणकर यांचे कार्य अमूल्य असेच आहे.

फेब्रुवारी महिन्यात जर्मन पुस्तक मुद्रण तंत्रज्ञ गुटेनबर्ग याच्या स्मरणार्थ जागतिक मुद्रण दिन साजरा केला जातो (फेब्रुवारी 24). गेल्या 1000-1200 वर्षांत मुद्रण तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. मुद्रण क्षेत्रात संगणकाचा वापर तर अनिवार्यच आहे, पण हिंदुस्थानी लिपी वापरून मुद्रण करण्याचा काळ अगदी अलीकडचा आहे. त्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे लिपीकार लक्ष्मण श्रीधर वाकणकर म्हणजेच बापू वाकणकर.

वाकणकर घराणे तसे मूळचे कोकणातील, पण 2-3 शतकांपूर्वी त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशात स्थायिक झाले. बापू वाकणकर यांचा जन्म 1913 मध्ये गुणा येथे झाला. त्यांचे धाकटे बंधू डॉ. विष्णू वाकणकर हे थोर पुरातत्त्व शास्त्रज्ञ होते, ज्यांनी जगप्रसिद्ध अशा भीमबेटका येथील अश्मयुगीन गुहा शोधल्या.

हिंदुस्थानी भाषा संगणकावर आणण्याचे बापू वाकणकर यांचे काम मोलाचे आहे. मुळात संगणकाचा की बोर्ड हा इंग्रजी भाषेसाठीच तयार करण्यात आला होता. त्यात इंग्रजी मूळाक्षरं, इंग्रजी अंक आणि इतर संकेत या बटणांची सोय करण्यात आली होती. मात्र या की-बोर्डमध्ये देवनागरी भाषा विकसित करताना त्यात स्वर, व्यंजनं आणि जोडाक्षरं बसवणं कठीण होतं. शिवाय ऱहस्व, दीर्घ, स्वरांची आणि व्यंजनांची चिन्हं यांची जुळणी करणं, उच्चारक्रम आणि लेखनक्रम योग्य ठेवणं हे काम आव्हानात्मक होतं. हे आव्हान पेलत वाकणकरांनी देवनागरी लिपीला संगणकीय कक्षेत आणलं आणि हिंदुस्थानी भाषा संगणकाच्या की-बोर्डमध्ये स्थानापन्न झाली.

वाकणकरांनी टाइपरायटरवर गुजराती तसेच देवनागरी लिपी बसवण्यासाठीही काम केले. वेगवेगळ्या टाइपरायटरसाठी या लिपींच्या अक्षरमुद्रांची वळणे वाकणकरांनी तयार केली होती. अमेरिकेच्या ग्राफिक आर्ट रिसर्च फाऊंडेशनचे ते सल्लागार होते. हिंदुस्थानी लिपींची कॅलिग्राफी, मुद्रा आणि संगणकीय की-बोर्ड अर्थात कळफलक रचना याबाबतच्या संस्थेच्या संशोधन कार्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी हिंदुस्थानचे सरकारी लिपीकार म्हणूनही काम पाहिले. रशिया, टोकियो, अमेरिका येथील अनेक लिपीविषयक कामांसाठी त्यांनी राष्ट्रीय सल्लागार म्हणून जबाबदारी निभावली.

हिंदुस्थानातील प्राचीन परंपरेतील लेखन हे उच्चारांवर आधारित होते. वैदिक काळातील ही लेखन परंपरा सप्रमाण सिद्ध करण्यासाठी बापू वाकणकर यांनी विशेष कष्ट घेतले. हिंदुस्थानी लेखन परंपरेचा ऐतिहासिक आढावा घेताना प्राचीन लिपींचा तौलनिक अभ्यासही त्यांनी मांडला. संगणकावर हिंदुस्थानी लिपी उपलब्ध होण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेबरोबर काम केले.

देवनागरी लिपी मुद्रणाच्या दृष्टीने सुलभ व्हावी यासाठी हिंदुस्थानात 1935 मध्ये लिपी सुधार समिती सुरू झाली होती. आचार्य कालेलकर तिचे अध्यक्ष होते. त्यांनी बापूंना या कामात ओढले. तिथे त्यांनी टाइपरायटरवर देवनागरी लिपी कशी वापरता येईल, मजकूर सुलभपणे कसा छापता येईल याकडे लक्ष दिले. यासाठी त्यांनी अनेक पेटंटदेखील मिळवली. पुढे 1979 मध्ये सर्व हिंदुस्थानी भाषांची लिपी संगणकावर येण्यासाठी त्यांनी आय.टी.आर. ही संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे लिपींसाठी 16 वर्षे काम केले. लिपींच्या संशोधन कार्यात वाकणकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ITRतर्फे हिंदुस्थानी भाषांसाठी फोटो टाइपसेटिंग, डेस्क टॉप पब्लिशिंग, फॉन्ट डिझायनिंग, फोनेटिक की-बोर्ड डिझाईन यासाठी संशोधन आणि सेवा देण्यात त्यांचा सहभाग होता.

त्यांनी भाषा व लिपीच्या संशोधनातील आदान प्रदानासाठी CALTIS(Calligraphy, Lettering and Typography of Indian Scripts) ही आंतरराष्ट्रीय परिषद 1983 ते 1985 या काळात भरवली. या परिषदेमुळे या क्षेत्रातील संशोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले. हिंदुस्थानी लिपींकfिरता वाहिलेले ‘अक्षररचना’ मासिकाचे कामही त्यांनी हिरीरीने केले.

गणेशविद्या हे त्यांचे हिंदुस्थानी लिपीच्या उगमाबद्दलचे मूलगामी विचार प्रकट करणारे महत्त्वाचे पुस्तक. याचे उपशीर्षकच होते A Traditional Indian Approach to Phonetic Writing. अथर्वशीर्षामध्ये ‘सा एषा गणेशविद्या’ असा एक श्लोक आहे, त्याचा त्यांनी पाठपुरवा कसा केला आणि ध्वन्यात्मक लेखनाची हिंदुस्थानी परंपरा यावर संशोधन करून ते मांडले. हे त्यांच्या सततच्या चिंतनशील स्वभाववैशिष्टय़ाचे प्रतीकच म्हणावे लागले. ते टाटा प्रेसने 1966मध्ये प्रकाशित केले. त्याचे मराठी भाषांतर 1998मध्ये पुण्यातच झाले. त्यामुळे पुढे त्यांना संगणकावर देवनागरी वापराबद्दल सुलभता आणण्यात यश आले. बापूंच्या या मूलभूत संशोधनाने हिंदुस्थानी संगणक क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल पुढे पडले. याच मूलभूत सूत्रावर आधारित सर्वच हिंदुस्थानी लिपींचे अंतःप्रेषण (इनपूट) आणि बहिःप्रेषण (आऊटपूट) होऊ शकले. मात्र जगाने याचे श्रेय बापूंना मनमोकळेपणाने दिलेले नाही ही खेदाची बाब आहे. भाषावृद्धीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या लिपी शास्त्राकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणारे आणि देवनागरी लिपी संगणकावर आणण्यात महत्त्वाचे योगदान असलेले लिपीकार वाकणकर विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या