‘सुंदरकांड’अध्यायाचा मथितार्थ

5

>> प्रतीक राजूरकर

रामभक्त हनुमान यांना बालपणीच या शक्ती ज्ञात होत्या. परंतु त्या वयात त्याचा वापर सत्कर्मी झाला नसता म्हणून कदाचित हनुमंतास विस्मरण ही काळाची गरज आहे असे ऋषीमुनींना वाटले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या सान्निध्यात आल्यावर सुप्त गुणांचा उपयोग व्हावा म्हणून त्याचे स्मरण होऊन सत्कारणी लागले. ‘सुंदरकांड’ हे हनुमंतांच्या सुप्त गुणांचा साक्षात्कार झाल्यावरचा इतिहास आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सुप्त गुणांचा योग्य वेळी साक्षात्कार होण्याची क्षमता ईश्वरी शक्तीने निसर्गतःच प्रदान केली आहे. मानसिक दृष्टीने सक्षम होऊन त्याचा वापर सत्कारणी लावता येऊ शकतो हाच ‘सुंदरकांड’ या अध्यायाचा मथितार्थ आहे. वपुंनी ‘आपण सारे अर्जुन’ यातून एक मनोवैज्ञानिक संदेश दिला आहे. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या आचरणातून मानवी आयुष्य अधिक समृद्ध होऊ शकतं. प्रत्येकात अर्जुनाप्रमाणे हनुमंतदेखील वास्तव्यास आहेत. अद्वैत सिद्धांतात त्याचे अधिक योग्य विश्लेषण आढळते. मानवी आयुष्याला धार्मिक ग्रंथातून योग्य बोध घेणे गरजेचे आहे. कधी आपण सारे अर्जुन तर कधी आपण सारे हनुमंत होत असतो!

श्री रामरक्षा स्तोत्रात रामभक्त हनुमान यांचे केलेले वर्णन. प्राचीन काळात हनुमंताची ऋषिमुनींनी स्तुती अनेक स्तोत्रात आढळते. लक्ष्मणास आलेली मूर्च्छा असो, सीतामातेसाठी केलेले उड्डान, लंका दहन या प्रसंगातून पदोपदी रामभक्त हनुमान यांची ‘विद्यावान गुनी अति चातुर राम काज करिबे को आतुर’ या अवधी भाषेतील ‘हनुमान चालिसा स्तोत्रा’त संत तुलसीदासांनी केलेले वर्णन अतिशय समर्पक आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची महिमा अनेक भाषेत रामायण स्वरूपात लिहिले गेले आहे. ‘वाल्मीकी रामायण’, ‘तुलसीदास विरचित रामचरितमानस’ आणि ‘श्रीधर विरचित राम विजय’ या ग्रंथात रामभक्त हनुमान यांच्यावर विस्तृत लिखाण आहे. ‘वाल्मीकी रामायण’ आणि ‘रामचरितमानस’ या ग्रंथात ‘किष्किन्धकांड’ आणि ‘सुंदरकांड’ हे दोन अध्याय हनुमंतांच्या कामगिरीवर विशेष प्रकाश टाकणारे आहेत.

रामायणातील एक अध्याय हा ‘सुंदरकांड’ नावाने प्रसिद्ध आहे. ‘सुंदरकांड’ मोठय़ा प्रमाणात पठण केल्या जाते. परंतु सुंदरकांड यात काय गुढार्थ दडलेला आहे? याचा जोवर साक्षात्कार होत नाही तोवर केवळ भगवंताच्या प्रति प्रकट केलेला एक श्रद्धाभाव ठरतो. सुंदरकांडाचे पारायण करून त्याचा नक्की मथितार्थ कळणे गरजेचे आहे. कारण रामभक्त हनुमानाची महिमा अपार आहेच. परंतु ‘नांदतो देव हा आपल्या अंतरी’ याचा शोध घ्यायचा असेल तर ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. तेव्हाच रामायण आणि त्यातील अध्यायांचा अंमल होऊन रामराज्य अस्तित्वात येईल. ‘किष्किन्धकांड’ आणि ‘सुंदरकांड’ हे दोन अध्याय विशेषकरून प्रभू श्रीराम आणि हनुमंताच्या आयुष्यातील भेटीची आणि पुढील वाटचालीची ओळख करून देतात. रामभक्त हनुमान यांच्या बुद्धीची, अलौकिक सामर्थ्याची, सुप्त गुणांची अनुभूती या दोन अध्यायातून प्रकट होते.

‘किष्किन्धकांडा’त सुग्रीवास प्रभू श्रीराम यांनी त्याचे राज्य मिळवून दिले. पुढे वानरसेनेने सीतामातेचा शोध घ्यायच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. किष्किन्धाच्या अरण्यातून वाटचाल करत हनुमान, अंगद, जांबुवंत सहकाऱयांसमवेत निघाले. वाटेत त्यांना जटायूचे बंधू संपतीकडून सीतामातेचे अपहरण करून रावणाने आपल्या लंकेत नेल्याचे समजले. वानरसेना आपसात चर्चा करू लागली. विशाल सागराला ओलांडून सीतामातेचा ठावठिकाणा शोधण्यासाठी कसे जाता येईल. किष्किन्धसाम्राज्याचे युवराज अंगद हताश झाले. समुद्र ओलांडण्याची विवंचना वानर सेनेला काय करायचे, कसे करायचे यावर काही मार्ग सापडत नव्हता. त्यावर सगळय़ात ज्येष्ठ असलेल्या जांबुवंतांनी पुढाकार घेतला. रामभक्त हनुमंतास आवाहन केले. बलवान हनुमंत तुम्ही का शांत आहात? पवनपुत्र तुम्ही वायुगतीने युक्त आहात. बुद्धी विवेक विज्ञानाने परिपूर्ण आहात. तुमच्यासाठी जगात कुठलेच कार्य कठीण नाही.

हे संभाषण तुलसीदासांनी या प्रकारे वर्णन केले आहे,

का चूप साधि रहेहु बलवाना।
पवन तनय बल पवन समाना।
बुधि बिबेक बिग्यान निधाना।
कवन सो काज कठिन जग माहीं।।

या प्रकारे जांबुवंतांनी रामभक्त हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. साक्षात सूर्य देवतेकडून त्यांना अनेक विद्या प्राप्त आहेत. बाल हनुमंतांचे सामर्थ्यसुद्धा नेत्रदीपक होते. बालपणी साक्षात सूर्याला धरायास हनुमंत झेपावले, परंतु या बाल हनुमंताच्या नटखट लीलांमुळे ऋषींनी त्यांना शाप दिला की हनुमंताला प्राप्त आपल्या सर्व सिद्धींचे विस्मरण होईल. परंतु कुणी ज्ञानी त्याचे जेव्हा स्मरण करुन देईल तेव्हा हनुमंतांना त्याची जाणीव होऊन त्या सर्व सिद्धी पूर्ववत होतील. प्रभू श्रीराम यांच्या सान्निध्यात हनुमंत अगोदरच आले होते. गतसिद्धींचे स्मरण होऊन उपयोगात आणण्यास काळ अनुकूल होताच. म्हणून जांबुवंत नियतीने ठरविलेले माध्यम झाले. हनुमंतांना आपल्या सिद्धींचे स्मरण झाले. हनुमंत लंकेस सीतामातेच्या शोधार्थ सिद्ध झाले. रामभक्त हनुमंतांना आपल्यातील सुप्त गुणांचा साक्षात्कार झाला. पुढे रामायणात काय घडले ते सर्वश्रुत आहेच. ‘सुंदरकांडा’ची ही सुंदर सुरुवात आहे. रामायणात ‘सुंदरकांड’ हे पूर्णतः रामभक्त हनुमान यांना समर्पित आहे. म्हणून रामायणाइतकेच ‘सुंदरकांडा’चे महत्त्व आहे. हा झाला रामायणातील धार्मिक श्रद्धेचा भाग. परंतु ‘सुंदरकांड’ हे मानवी आयुष्यात अनेक आमूलाग्र बदल घडवणारे आहे. याचा गुढार्थ उमगला तर प्रत्येक व्यक्ती आपल्यातील सुप्त गुण सत्कर्मी लावू शकतो. मानव मनाच्या मर्यादा प्रत्येकास आहेत. त्याची जाणीव होऊ शकल्यास अनेक चमत्कार घडू शकतात. त्यासाठी व्यक्तिमत्त्व शिबिरे तेव्हा अस्तित्वात नव्हती, परंतु यासारख्या अनेक घटना मानवी आयुष्याला कलाटणी देऊ शकतात. प्रत्येक मानवात एक आंतरिक शक्तीचा निवास आहे. त्यातून अंतर्बाह्य यश प्राप्त केले जाऊ शकते.