मंथन – अन्यायाच्या विरोधातील अपराध

>> प्रतीक राजूरकर

केरळची निमिषा प्रिया येमेनमध्ये एकटीच कायदेशीर लढाई लढत आहे. आरोग्य सुश्रुषा केंद्र सुरू करण्याच्या उदात्त हेतूने काम करताना तिचा गैरफायदा घेतला गेला आणि याच अन्यायाला प्रतिकार करताना तिच्याकडून गुन्हा घडला. स्वत:च्या बचावासाठी केलेल्या या गुन्ह्यातून सुटका मिळवण्याची तिची धडपड अजूनही एकाकीपणे सुरु आहे.

हिंदुस्थानची नागरिक असलेली निमिषा प्रिया नामक 33 वर्षीय महिला 2012 साली रोजगारासाठी येमेन येथे गेली, परंतु येमेनमधील तिचा प्रवास हत्येच्या गुन्ह्यामुळे तुरुंगात संपेल की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण निमिषाने तिच्या सहकाऱ्याची हत्या करून अत्यंत निर्घृणपणे त्याच्या शरीराचे तुकडे केल्याचा तिच्यावरील आरोप येमेन सत्र व उच्च न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यासाठी तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषाचे पती व अपत्ये हिंदुस्थानात असून त्यांच्या येमेनमधील अनुपस्थितीत निमिषा तिथल्या कायदेशीर लढाईत एकाकी पडली आहे. परिचारिकेचे प्रशिक्षण घेतलेली निमिषा ही मूळची केरळ राज्यातील पल्लकड जिह्यातील. तिचे पती टॉमी थॉमस व मुलगी 2014 सालापर्यंत येमेनला एकत्र होते. एका कुटुंबाला उत्पन्न पुरेसे नसल्याने निमिषाचे पती व मुलगी हिंदुस्थानात परतले. निमिषा तेथेच वास्तव्यास होती. निमिषाला स्वतःचे सुश्रूषा केंद्र येमेन येथे सुरू करण्याची इच्छा होती, परंतु स्थानिक नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय ते शक्य नव्हते. त्यासाठी तिने येमेन नागरिक असलेल्या तलाल अबदो महादीच्या मदतीने सुश्रूषा केंद्र सुरू केले.

निमिषा येमेनला एकटी असल्याने महादीने त्या परिस्थितीत तिचा गैरफायदा घेतला. सुश्रूषा केंद्रातील सर्व रक्कम, निमिषाच्या पासपोर्टवर महादीने आपला हक्क दाखवला. निमिषा ही त्याची पत्नी असल्याचे महादीने सानाआ येथील अधिकाऱयांना सांगितले. महादीला निमिषाचा गैरफायदा घ्यायचा उद्देश दिसू लागला. महादी तिला मारहाण करू लागला. रात्री अपरात्री तिच्या घरात मित्रांसमवेत जाऊन निमिषाकडे शारीरिक सुखाची मागणी करू लागला. आपल्यावर होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे निमिषाने स्थानिक पोलिसांत महादीविरोधात तक्रार नोंदवली. महादीवर गुन्हा दाखल झाला, परंतु तो काही दिवसांतच जामिनावर बाहेर आला. जामिनावर सुटल्यावर महादीचे निमिषावरील अत्याचार अधिकच वाढले. निमिषाच्या सहनशक्तीच्या पलीकडे परिस्थिती गेल्याने तिने 25 जुलै 2017 रोजी महादीला अधिक प्रमाणात गुंगीचे औषध टोचले व त्यातून महादीचा मृत्यू झाला. महादीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून निमिषाने आपल्या मैत्रिणीच्या सहाय्याने ते एका प्लॅस्टिक पिशवीत पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले.

पोलिसांना तपासात याचा सुगावा लागला आणि निमिषाला व तिच्या सहकारी मैत्रिणीला अटक करण्यात आली. 2020 साली निमिषाला सत्र न्यायालयाने दोषी ठरवत मृत्युदंडाची तर सहकारी मैत्रिणीला आजीवन कारावासाची शिक्षा दिली. त्या निकालाला निमिषाने दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने 7 मार्च 2022 रोजी फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली. निमिषाला तिच्या विरोधातील खटल्यात कुठलेही कायदेशीर प्रतिनिधित्व मिळालेले नाही. येमेनमधील हिंदुस्थानी दूतावास हे स्थानिक नागरी युद्धामुळे 2015 सालापासून सुरू असलेल्या येमेनबाहेर जिबुट्टी येथे कार्यरत आहे. त्यामुळे निमिषाला तत्काळ हिंदुस्थानी दूतावासाकडून मदत मिळू शकली नाही. निमिषाला येमेन सर्वोच्च न्यायालयात मृत्युदंडाच्या शिक्षेला आव्हान देण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयात केवळ तांत्रिक बाबीवर सुनावणी होईल. त्यामुळे निमिषाची कायदेशीर सुटका होण्याची आशा धुसर आहे. दुसरा महत्त्वाचा पर्याय निमिषाकडे आहे. त्यासाठी तिला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. इस्लामी कायद्यात ‘दिया’ कायद्यांतर्गत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे मन वळवून त्यांच्याकडून झालेल्या कृत्याबद्दल माफी व कुटुंबीयांना मान्य असलेली नुकसानभरपाई देण्याची तरतूद अस्तित्वात आहे. इंग्रजी माध्यमात ‘दिया’ तरतुदीचा ‘ब्लड मनी’ असा उल्लेख आहे. निमिषाची आर्थिक परिस्थिती नसल्याने तिच्यासाठी हिंदुस्थानात निमिषा प्रिया ऍक्शन कौन्सिल स्थापन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने न्यायालयास हमी दिली आहे की, ते निमिषाला तुरुंगात आर्थिक सहाय्य करत असून तिला येमेन सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, परंतु ‘दिया’ कायद्याच्या तरतुदीनुसार केंद्र सरकार त्या वाटाघाटीत सहभागी होणार नाही. माध्यमात प्रकाशित माहितीद्वारे याअगोदर 2018 व 2021 साली संयुक्त अरब अमिरात येथे हिंदुस्थानी उद्योपती युसुफ अली व ओबेरॉय यांच्या माध्यमातून दोन वेगळ्या घटनांतील हिंदुस्थानी गुन्हेगारांना ‘दिया’ कायद्याच्या माध्यमातून मृतकांच्या कुटुंबीयांना मोठी रक्कम देऊन हिंदुस्थानात परत आणण्यात आल्याचे उदाहरण आहे. निमिषाच्या बाबतीत अद्याप अशी कुणी व्यक्ती समोर आलेली नाही. मृतक कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाई घेऊन मारेकऱयास क्षमा करण्याचे कार्य हे जमातीच्या नेत्यांसमक्ष करायचे असते. त्यांचा होकार मिळवणे हे अत्यंत कठीण कार्य असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. निमिषाच्या बाबतीत तर सुनावणीदरम्यान महादीच्या समर्थकांनी न्यायालयाच्या समक्ष प्रदर्शन केल्याने दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय महिलेने एका पुरुषाची हत्या केल्याने इस्लामी राष्ट्रात त्याचे पडसाद अधिकच तीव्र बघायला मिळत आहेत. ‘दिया’अंतर्गत चर्चेची एक अनौपचारिक फेरी झाल्याचेसुद्धा प्रकाशित झाले आहे. त्यादरम्यान 70 लाख रुपयांची मागणी झाल्याचे समजते, परंतु ही रक्कम निमिषाच्या आवाक्याबाहेर असल्याचे तिचे म्हणणे आहे. मायदेशी परतण्यासाठी तिने महादीच्या ताब्यातील आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे प्रकाशित झाले आहे. महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेणाऱ्या महादीसारख्या व्यक्तीने परदेशातील महिलेला दिलेल्या वागणुकीला निमिषाने दिलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. त्यामुळे ही घटना केवळ कायद्याच्या मर्यादेतून न बघता मानवतेच्या व निमिषावर झालेल्या अन्यायाच्या दृष्टिकोनातून बघितल्यास निमिषाच्या अपराधाला न्याय मिळू शकेल.

[email protected]