आहे पुणे जवळ तरीही… हिंजवडीची घुसमट

>> राजा गायकवाड

पुणे-हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणजे महाराष्ट्रातील उद्योग जगताचा मानबिंदू. 1990नंतर हिंजवडी आयटी पार्क तयार होऊ लागला आणि देशभरातील नव्हे तर संपूर्ण जगातील मोठमोठय़ा कंपन्यांनी हिंजवडीकडे धाव घेतली. आज येथे तब्बल 135पेक्षा जास्त आयटी कंपन्या असून त्यामध्ये सुमारे साडेतीन लाख कर्मचारी काम करत आहेत. त्यातील एक लाख 75 हजारांपर्यंत आयटी इंजिनीअर्स आहेत. या प्रत्येक इंजिनीअर्सवर आयटी कंपनी तासाला 25 डॉलर खर्च करते. त्यामुळे एकटय़ा हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांची दरवर्षी लाखो कोटींची उलाढाल होत असून त्या माध्यमातून राज्य आणि देशालाही आर्थिक सुबत्ता येत आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे कंपनी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास कोंडीत अडकावे लागत आहे. त्यामुळे लाखो लिटर इंधन विनाकारण जळत आहे. तसेच कंपन्यांचे हजारो कोटींचे थेट नुकसान होत आहे. परिणामी, कर स्वरूपात सरकारला मिळणारा महसूलही बुडत असल्याने हिंजवडीच्या वाहतूक कोंडीमुळे थेट राष्ट्रीय ऩुकसान होऊ लागले आहे.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. देश परदेशातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. पुण्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन ते देशातील बंगळुरू किंवा परदेशातील आयटी कपन्यांमध्ये नोकरी करतात. जर पुण्यालगतच एखादा आयटी पार्क उभा राहिला तर मनुष्यबळाची कमतरता राहणार नाही, ही गोष्ट शासनाने हेरली आणि हिंजवडीला राज्यातील सर्वात मोठा आयटी पार्क उभा रहिला. अनेक बहुराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीrय, राष्ट्रीय आणि राज्यातील कंपन्यांनी येथे आपला उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. पुणे – पिंपरी चिंचवड शहर, ग्रामीण भाग, सातारा, कोल्हापूर, मुंबई या भागांबरोबरच देशातील सर्व राज्यांतील आणि जगभरातील तरुणाई नोकरीसाठी हिंजवडीला येऊ लागली. आज हिंजवडीमध्ये तब्बल साडेतीन लाख कर्मचारी काम करत आहे. मात्र, हिंजवडी आयटी पार्कचा विकास होत असताना पायाभूत सुविधांकडे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही. पायाभूत सुविधांसाठी जे काम केले गेले ते आयटी पार्क विकासाच्या वेगापुढे खूपच धीम्या गतीचे होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हिंजवडी आयटी पार्क वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये भूमकर चौक आणि वाकड चौक या दोन ठिकाणांहून प्रवेश करता येतो. या चौकांमध्ये सहा वेगवेगळे मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या भागातच मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे अवघ्या सहा किलोमीटर अंतरासाठी या कर्मचाऱयांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडी अडकून पडावे लागते. हिंजवडीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक लहान मोठय़ा उपाययोजना करण्यात आल्या. मात्र वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या सर्वच उपाययोजना त्रोटक ठरत आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकूण सहा फेज होणार आहेत. त्यापैकी दोन फेजचे काम पूर्ण झाले असून तिसऱया फेजचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतुकीची समस्या खूपच भीषण रूप धारण करणार असल्याची कल्पना या कर्मचाऱयांना आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी सोडत असल्याचेही दिसून आले आहे.

वाहतूक कोडींमुळे कर्मचारी तासन् तास रस्त्यावर अडकून पडतात. दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते तीन तास एवढा वेळ लागतो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात इंधन खर्च होते. मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. तसेच या वाहतूक कोंडीची कर्मचाऱयांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. हे कर्मचारी नेहमीच तणावग्रस्त राहू लागले आहे. याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. तसेच कंपनीत नऊ ते साडेनऊ तास काम करावे लागते. कंपनीत येताना तीन आणि जाताना तीन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे कुंटुंबाला वेळ देता येत नसल्याने कौटुंबिक स्वास्थ्यही हरवत चालले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम कर्मचाऱयांचा क्रयशक्तीवरही होत चालला आहे. परिणामी, कर्मचारी आपल्या क्षमतेप्रमाणे कामही करू शकत नाही. आयटी पार्कमध्ये तब्बल 1 लाख 75 हजारांच्या जवळपास आयटी इंजिनीअर्स काम करतात. या इंजिंनीअर्सवर कंपनी तासाला 25 डॉलर्स खर्च करते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे कर्मचारी वेळेत कंपनीत पोहचत नाहीत. नियोजित कामे वेळेत होत नाहीत. वाहतूक कोंडीमुळे क्रयशक्तीवर झालेल्या परिणामाने कर्मचारी अपेक्षित काम करू शकत नाहीत. या सर्वाचा परिणाम कंपनीच्या आर्थिक धोरणांवर होत आहे. कंपनीची उलाढाल कमी होते. परिणामी, कंपनीकडून सरकारला मिळणारा महसूलही कमी होत आहे. विनाकारण जळणारे लाखो लिटर इंधन, प्रदूषण आणि बुडणारा महसूल यांमुळे हिंजवडीच्या वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रीय नुकसान होऊ लागले आहे, असे हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल चरणजीतसिंग भोगल यांनी सांगितले.

हिंजवडी आयटी पार्क पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत होते. आता पीएमआरडीएच्या हद्दीत येते. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांच्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र वाहतूक कोंडी सुटली नाही. आता खास आयटी वर्ग डोळ्यासमोर ठेवून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो करण्यात येणार आहे. मात्र, मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडणार आहे. त्यामुळे चांदणी चौक – पिंरगूट – घोटावडे – हिंजवडी, पाषाण – सुस – चांदे – नांदे – घोटावडे आणि बाणेर – बालेवाडी – म्हाळूंगे – चांदे – नांदे – घोटावडे या तीन अंतर्गत मार्गांचे विस्तारिकरण होणे गरजेचे आहे. या मार्गामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचे विभाजन होण्यास मदत होईल. हिंजवडी आयटी पार्कामधील कंपन्या बाहेर जाणार नाहीत. अद्याप गेल्याही नाही. या उलट दिवसेंदिवस कंपन्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांची संख्याही वाढत आहे. या सर्वांना वाहतुकीची पायाभूत सुविधा मिळावी, वाहतूक कोंडीतून मुक्ती व्हावी, यासाठी अंतर्गत मार्गांचे विकसन गरजेचे आहे. तसेच सध्याच्या मार्गांवरील अतिक्रमणे हटविणे, मार्गांचे विस्तारिकरण करणे, रखडलेले रस्ते पूर्ण करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे अशा उपाययोजनाही करणे गरजेचे आहे, असे कर्नल भोगल यांनी सांगितले.