मारुती कांबळेचे काय झाले?

4

>> रजनीश राणे

सत्तरच्या दशकात ‘सामना’ सिनेमा रुपेरी पडद्यावर आला आणि त्यानंतर तब्बल चार-पाच दशके या सिनेमातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या प्रश्नाने राज्यभर काहूर माजवले. मारुती कांबळेची भूमिका साकारणारे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे आजही संवेदना हरवलेल्या समाजाच्या मनातील ‘मारुती कांबळे’ शोधतायत. अभिनयाच्या माध्यमातून जीवन समृद्ध करण्याचे धडे देत आहेत. कणकवलीपासून चंदिगडपर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे, सुरूच राहणार आहे. डॉक्टरांना यंदाचे सन्मानाचे विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने…

1974. तेव्हा वय नऊ-दहा वर्षांचे. म्हणजे तसे न कळण्याचेच. लहानपण, तरुणपण गिरणगावातील अभ्युदयनगरमध्ये गेले. तो काळ उत्सवाचा होता. गिरण्या सुरू होत्या. लालबाग-परळ तेव्हा कॉर्पोरेट झाले नव्हते. चाळीचाळीत सार्वजनिक पूजेचा उत्सव आणि मोठय़ा पडद्यावरील चित्रपट पाहण्याचा उत्साह असायचा. रात्री 10 चे बंधन नसायचे. त्यामुळे 10 वाजता चित्रपट सुरू व्हायचा. त्यासाठी मग 8 वाजल्यापासूनच गोणपाट घेऊन जागा अडवण्याची जबाबदारी आम्हा बच्चे मंडळींवर असायची. त्याचवेळी असे कधीतरी डॉक्टर समोर आले. डॉक्टरांशी तो माझा पहिला सामना. समोर पडद्यावर ‘सामना’ सुरू होता. निळूभाऊ आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाची जुगलबंदी वगैरे काही कळत नव्हतं. मुळात सिनेमा समजण्याचे ते वयच नव्हते, पण ‘मारुती कांबळे’ तेव्हापासून मनात घर करून राहिला तो आजपर्यंत. डॉक्टर मोहन आगाशे पहिल्यांदा भेटले ते असे.

रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात तसे अनेक डॉक्टर कार्यरत आहेत. कुणी लेखक-दिग्दर्शक म्हणून तर कुणी अभिनेता म्हणून. मोहन आगाशे हे त्यापैकीच एक. डॉक्टर अस्सल पुणेकर. पुण्यातच घडले आणि वाढलेसुद्धा. नाटकात यायचे असे काही ठरवलेच नव्हते. चिल्ड्रन्स थिएटरपासून सुरुवात झाली. मग महाराष्ट्र कलोपासक संस्थेतून ‘डाकघर’ केले. रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. अर्थात हे सारे हौस म्हणूनच होते. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज म्हणूनच त्याकडे पाहिले जात होते. दरम्यान, शाळा-कॉलेजची घोकंपट्टी नेटाने सुरू होती. शैक्षणिक ग्राफ हा हुशारीचा असलेल्या डॉक्टरांसमोर इंजिनीयरिंग की मेडिकल असा पर्याय उभा राहिला तेव्हा डॉक्टरांनी दुसरा पर्याय निवडला. पुन्हा नवे पर्याय समोर आले तेव्हा त्यांनी मानसोपचार तज्ञ व्हायचे निश्चित केले आणि पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधील मानसोपचार सुरू झाले.

डॉक्टरकीचे शिक्षण घेताना डॉक्टरांच्या आतील अभिनेत्याचा आवाज काही ते दडपू शकले नाहीत. त्याच दरम्यान जब्बार पटेल आणि सतीश आळेकर या दोन डॉक्टरांच्या सोबत ते आले आणि मग सुरू झाले मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे एक ‘ट्रॉमा केअर सेंटर’. प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन (पीडीए) तेव्हा बालगंधर्व आणि भरत नाटय़ मंदिरात अनेकविध प्रयोग करीत होती. डॉक्टर आगाशेही त्यात सामील झाले. मेडिकलचे अर्थात सायकॅस्ट्रिस्टकडे शिक्षण घेत असतानाच अनेक रुग्णांशी ते बोलत होते. त्यांचा मनोव्यापार समजून घेत होते. एक डॉक्टर म्हणून उपचार करीत होते. पण त्याचवेळी त्यांच्यातील अभिनेत्याची ती प्रयोगशाळा होती हे डॉक्टर आजही कबूल करतात.

डॉ. मोहन आगाशे हे वादळ ठरले ते ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळे. नाटकातील नाना फडणवीसाने अवघ्या राज्यात वादळ उठवले. त्या वादळाला पार करून घाशीराम सातासमुद्रापार जाऊन आला. डॉक्टरांचा नाना प्रचंड गाजला. श्रीमंती मोजण्याची अनेक साधने आहेत. पैसा हे त्यातील फक्त एक आहे. जर आपले जीवनच समृद्ध नसेल तर आपण गरीबच आहोत असे डॉक्टर सांगतात. डॉक्टरांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

डॉक्टरांचा रंगभूमी-सिनेमा क्षेत्रातील ग्राफ प्रचंड मोठा आहे. त्याच्या कक्षा खूप रुंदावल्या आहेत. रंगभूमीनंतर ते चित्रपटात आले. ‘जैत रे जैत’चा नाग्या असो की ‘सिंहासन’मधील बुधाजीराव त्यांनी प्रत्येकाला जिवंत केले. त्या पात्रांचे मनोव्यवहार जाणून घेतले आणि ते पात्र साकारले. ही यादी मोठी आहे, पण त्या यादीतील प्रत्येक पात्राचा अनुभव तोच आहे. डॉक्टरांना पद्मश्री मिळाली, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला. हा गौरव डॉक्टरांचा नव्हता, तर मोहन आगाशे नामक एका रंगभूमीच्या विद्यापीठाचा होता.

बऱयाच वर्षांनंतर त्यांचे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक रंगभूमीवर आले. हे नाटक का स्वीकारले या प्रश्नाला उत्तर ते देतात… लेखक जेव्हा कथानक सांगताना असे काहीतरी सांगतो तेव्हा आपल्या तोंडून ‘अहा’ बाहेर पडते. काटकोन त्रिकोणचे लेखक विवेक बेळे हेसुद्धा डॉक्टरच. ते सांगत असताना म्हणाले, वडिलांची तब्येत बरी नाही असा निरोप आला म्हणून गावाला गेलो होतो. त्यांच्या हाताची नाडी तपासताना लक्षात आले की, आपण गेल्या कित्येक वर्षांत वडिलांच्या हाताला स्पर्शच केलेला नाही. बेळेंचे ते नाटक स्वीकारले याचे कारण ते हेच… संवेदना जपणारे!

डॉक्टर मोहन आगाशे देशभर फिरत असतात. कधी चंदिगडच्या विद्यापीठात तर कधी कणकवलीत. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन नवे टेक्स्ट बुक ते वाचून दाखवतात. नव्या पिढीला काही शिकवत नाहीत, तर त्यांना सजग करतात. संवेदना हरवलेल्या या समाजाच्या हृदयाचे ठोके मोजणारा स्टेथोस्कोप डॉक्टरांच्या गळय़ात आहे, तोवर ‘मारुती कांबळेचे काय झाले’ असा प्रश्न विचारावा लागणार नाही!

[email protected]