हिंदुस्थानी तत्त्वचिंतन : पाश्चात्त्य विचारवंतांवरील प्रभाव

1

>> साहेबराव गे. निगळ

आपल्या वैदिक ज्ञानाचे प्रचंड भांडार असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी पाश्चात्त्य विचारवंतांवर मात्र हिंदुस्थानी तत्त्वचिंतनाचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. प्रश्न एवढाच की, आपले वैदिक विचार व संस्कृती आपल्यापर्यंतच का पोहोचत नाही? आपण कर्मकांड, अंधश्रद्धा व फलज्योतिष यातून बाहेर का येत नाही? याबाबत आत्मनिरीक्षणाची अत्यंत गरज आहे.

गेल्या अडीचशे वर्षांत हिंदुस्थानींवर पाश्चात्त्य विचारांचा व आचारांचाही प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. आजच्या हिंदुस्थानातील विज्ञान व तंत्रज्ञान बहुअंशी पाश्चात्त्यांकडून मिळालेला वारसा आहे. आपल्या लोकांवर इंग्रजी भाषेचा पडलेला प्रभाव तर पदोपदी जाणवतो. ‘थँक यू’, सॉरी यासारखे शब्दप्रयोग सर्रासपणे, सर्वत्र वापरले जातात. ‘अंकल’ हा शब्द हिंदुस्थानी अर्धशिक्षित रिक्षावालेही सर्व शहरांमध्ये वापरताना दिसतात. आपल्या खंडप्राय देशावर एका व्यापारी कंपनीने शंभर वर्षे राज्य केले. हा तर एक सामाजिक-राजकीय क्षेत्रातील चमत्कारच म्हणावा लागेल. सुमारे बारा हजार किलोमीटरवरून काही ब्रिटिश व्यापारी इ.स. 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी काढतात व 1757 मध्ये बंगाल हे राज्य आपल्या ताब्यात घेतात व पुढे जाऊन देशावरच कब्जा मिळवितात. आमच्याकडील संस्थानिक व त्यांचे पुरोहित व आमचे धर्मगुरू काय करीत होते? हाही एक मोलाचा प्रश्न आहे. त्यातून आमच्यात पराभूत मनोवृत्ती (Defeatist mentality) निर्माण झाली. ते जेते (Victors) होते व आम्ही जीत (Vanguished) होतो. जेत्यांची मानसिकता वेगळी असते. अनेक पाश्चात्त्यांना वाटणे साहजिकच होते की, जितांकडे बहुमोल असे काय असणार? हिंदुस्थानात विज्ञान तर नाहीच, परंतु तत्त्वज्ञानही नाही? अशी विधाने काही ब्रिटिश विचारवंत व साहित्यिक करू लागले.

परंतु हळूहळू पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यास सुरू झाला आणि हिंदुस्थानचा प्राचीन उज्ज्वल भुतकाळ पाश्चात्त्य विद्वांनासमोर येऊ लागला. 1784 साली न्यायमूर्ती विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. न्या. जोन्स हे संस्कृतभाषाप्रेमी होते. त्यांना संस्कृत शिकविण्यासाठी आमचे ब्राह्मण तयार नव्हते. पुढे एका सद्गृहस्थाने काही अटींवर न्यायमूर्तींना संस्कृत शिकविण्यास होकार दिला. त्यांच्या सर्व जाचक अटी मान्य करून जोन्ससाहेब संस्कृत शिकले. विल्किन्सने भगवद्गीतेचे भाषांतर 1892 च्या आसपास केले. हीच भाषांतरित गीता प्रथम इंग्लंडला पोहोचली. गर्व्हनर जनरल वॉस हेस्टिंग्ज यांनी त्या ग्रंथाला उद्बोधक प्रस्तावना लिहिली.

अमेरिकन विचारवंत इमरसन (1803-1882) एकदा लंडनला गेले होते. तिथे त्यांची व कार्लाईल या विद्वानाची भेट झाली. भेटीअंती कार्लाईलने इमरसन या विचारवंताला भेट म्हणून भगवद्गीता (भाषांतरित) दिली. इमरसन यांना अमेरिकन सॉक्रेटिस म्हटले जाते. तसेच त्यांना लोकशाहीचा तत्त्वज्ञ असेही म्हटले जाते. हेन्री थोरो (1817-1862) हा विचारवंत इमरसन विद्यार्थीमित्र होता. इमरसनकडून थोरोला भगवद्गीता मिळाली. थोरो म्हणत असे, ‘मी रोज भगवद्गीतेच्या विचारांमध्ये स्नान करतो.’ बाल्ट व्हिटमन (1819-1892) हा गुढवादी कवी होता. तोही इमरसनचा वैचारिक वारसदार म्हणून प्रसिद्ध आहे. व्हिटमन यांचा ‘लिव्हज ऑफ ग्रास’ नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या पुस्तकाविषयी इमरसन म्हणतात, या कवितासंग्रहावर भगवद्गीतेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.

मॅक्स मुल्लर (1823-1900) हा जर्मनीचा संस्कृत पंडित होता. या पंडिताने ब्रिटनमध्ये राहून सेक्रेड बुक्स ऑफ द इस्ट या नावाने जवळजवळ 50 संस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले व करवून घेतले. आपल्या बौद्धिक कारकीर्दीच्या शेवटी ‘हिंदुस्थानकडून आपण काय शिकावे?’ या नावाने व्याख्याने दिली. ही व्याख्याने ‘व्हॉट इंडिया कॅन टिच अस’ या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. सुरुवातीला मॅक्स मुल्लर एक ख्रिश्चन म्हणून जरी दोषदृष्टीने वैदिक साहित्याकडे वळले असले तरी तेच पुढे वेदान्नाचे स्तुतिपाठक बनले. म्हणून मॅक्स मुल्लरला मोक्षमुल्लर म्हणून ओळखले जाते. असे अनेक विद्वान संस्कृत भाषेचा गौरव करू लागले. स्वतः न्या.जोन्स यांना आपला अभिप्राय दिला व म्हणाले, संस्कृत भाषा ही ग्रीक व लॅटिन या अभिजात भाषांपेक्षा श्रेष्ठ आहे. अमेरिकन ज्ञानोपासक व इतिहास संशोधक विल डय़ूरांट म्हणत असे की, संस्कृत ही अनेक युरोपियन भाषांचीसुद्धा जननी आहे. मेरी बेकर एड्डी (1821 ते 1910) ही विदुषी ‘ख्रिश्चन विज्ञान’ या धार्मिक अभियानाची जननी होती. ‘ख्रिश्चन सायन्स जर्नल’मध्ये ती लेख लिहीत असे. तिच्या लेखांमध्ये व व्याख्यानांमध्ये ती गीता व उपनिषदांमधील वचने उद्धृत करीत असे. जगप्रसिद्ध थिऑसॉफिकल सोसायटी या संघटनेच्या संस्थापक मॅडम हेवीना पी बलाव्हाट्स्की (1831 ते 1891) या म्हणत असत, थिओसॉफीच्या तत्त्वचिंतनात वेद, वैदिक, मुणी व भगवान बुद्ध यांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश विदुषी ऍनी बेझंट या थिऑसॉफिस्ट होत्या. 1907 मध्ये त्या हिंदुस्थानात आल्या. हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेणाऱया या विदुषीने वैदिक साहित्याचा अभ्यास करून उपनिषदे व भगवद्गीता यांच्यातील विचारांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली.

फिलिप गोल्डबर्ग यांनी ‘अमेरिकन वेद’ (2010) नावाचा ग्रंथ लिहिला आहे. गेल्या शे-दीडशे वर्षांत हिंदुस्थानी हिंदू आध्यात्मिक व सांस्कृतिक नेत्यांनी जे कार्य अमेरिकेत केले त्यांच्या कार्याचा सविस्तर माहिती देणारा हा ग्रंथ आहे. 1893 साली जगाच्या वैचारिक व सांस्कृतिक इतिहासात एक महान घटना शिकागो शहरात घडली. कोलंबसच्या स्मरणार्थ एक भव्य प्रदर्शन या शहरात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा भाग म्हणून पार्लमेंट ऑफ वर्ल्डस रिलिजन्स या नावाची एक जागतिक धर्म परिषद भरविण्यात आली होती. स्वामी विवेकानंदांनी ही परिषद अक्षरशः गाजविली. युनिरेदियन चर्चेसमध्येसुद्धा स्वामीजींची हिंदू संस्कृती, हिंदू धर्म व भगवद्गीता अशा अनेक विषयांवर प्रभावी व्याख्याने झाली. योगावरही त्यांनी व्याख्याने दिली. 1902 साली स्वामीजींनी अमेरिकेत वेदान्न सोसायटी स्थापन केली. आजही ती कार्यरत आहे. स्वामी प्रभवानंदांनी लॉस एंजलिस येथील वेदान्न सोसायटीद्वारा प्रचंड कार्य केले. याच माध्यमातून ख्रिस्तोपद ईशरवूड, अल्डस, हक्स्ले, ह्यूस्टन स्मिथ, गेराल्ड हर्ड, जोसेफ कॅम्बेलसारखे वेदान्नी विचारवंत व लेखक तयार झाले 1920 साली सिद्धयोग परंपरेचे परमहंस योगानंद अमेरिकेत गेले. गेल्या 70-80 वर्षांत अनेक हिंदुस्थानी सत्पुरुषांनी हिंदुस्थानी वेदान्न व योग यांचा अमेरिकेत प्रसार केलेला आहे. श्री योगी अरविंद घोष यांचे चिंतनही पाश्चात्यांना आकर्षित करते. अमेरिकेतील योगी फ्युअरस्टिन जॉर्ज, पंडित डेव्हिड फ्रॉली, फ्रान्सचे पत्रकार गॉरिअरसारख्या अनेकांनी हिंदुस्थानी विचारांचा अभ्यास केलेला आहे. डेव्हिड फ्रॉली स्वतःला वामदेवशास्त्र म्हणवून घेतात. गॉरिअर आपले विचार मांडताना लिहितात, हिंदुस्थानला आधुनिक शिवाजी महाराजांची गरज आहे, असे त्यांचे प्रतिपादन असते. पुण्याजवळ लोहगाव परिसरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे म्युझियमही सुरू केले आहे. जॉर्ज फ्यूअरस्टिन हे योगाचे मोठे विद्वान आहेत, ते योगीपण आहेत. त्यांनी योगावर ज्ञानकोश (Encydopaeria 7 yaga) लिहिला आहे. पोर्तुगालमधील अमरबा सूर्यानंद हे पोर्तुगीज योगी जागतिक योगदिनासाठी इ. स. 2000 पासून कार्यरत होते.

अशा काळात आपण कोठे आहोत? आमच्या समाजात आमचे वैदिक विचार व संस्कृती का पोहोचत नाही? आम्ही कर्मकांड, अंधश्रद्धा व फलज्योतिष यातून बाहेर का येत नाही? अमंगळ भेदाला आम्ही कधी मूठमाती देणार? याबाबत आत्मनिरीक्षणाची अत्यंत गरज आहे.