लोकसाहित्यातील गणपती


>> संजय बोरुडे

लोकसाहित्यामध्ये गणपती सर्वत्र भेटतो. सर्व शुभकार्याच्या प्रारंभी ज्याला अग्रपूजेचा मान आहे, ज्याच्या येण्याने सारा आसमंत चैतन्याने फुलून जातो अशा या गणरायाच्या उत्सवामध्ये अशा लोकसंगीताचा धांडोळा घेऊन लोकमानसातील गणेशाची आराधना करायला हवी. मात्र हल्ली डी. जे.च्या दणदणाटात, झिंगाट तालावर उन्मादाने नाचणाऱया तरुणाईला हे लोकसंचित कळेल का, हाही एक प्रश्न आहे.

हिंदुस्थानी अभिजात साहित्य ही जशी एक परंपरा आहे तशीच तिला समांतर अशी लोकसाहित्याचीही परंपरा आहे. ही परंपरा कदाचित लिखित साहित्याच्या आधीपासून आहे. कारण तिचे मौखिक स्वरूप, लिपीचा शोध लागण्याअगोदर श्रम हलके करण्यासाठी मनोरंजन, या मनोरंजनातून प्रबोधन यातून निर्माण झालेल्या लोककथा, लोकगीते, आख्याने, विधीगीते याचा एक मोठा प्रवाह प्रत्येक संस्कृतीमध्ये असतो. म्हणूनच जगभर लोकसाहित्याचा एक ज्ञानक्षेत्र म्हणून अभ्यास केला जातो. लोकसाहित्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा कर्ता कुणी एक व्यक्ती नसते. प्रत्येकजण आपापल्या परीने त्यात भर घालत ते आपल्यापर्यंत येते. लोकसाहित्य हे ऊर्जामय, चैतन्ययुक्त असते. त्यामुळेच जेव्हा जेव्हा अभिजात साहित्य थकते तेव्हा तेव्हा ते लोकसाहित्यातून ऊर्जा घेते असे म्हटले जाते. लोकसाहित्य लोकनीतीला जन्म देते. लोकांना एक नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देते, आचरणाचा मार्ग ठरवून देते, व्यावहारिक शहाणपण शिकवते, व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणते. थोडक्यात हे एक व्यापक असे अभ्यासक्षेत्र आहे.

हिंदुस्थानी संस्कृतीत गणेश उपासना पूर्वीपासून आहे. गणेशाला प्रधान देवता मानणारा गाणपत्य संप्रदायही आपल्याकडे आहे. असा हा गणपती, गणेश, विनायक, विघ्नहर अशा अनेक नावांनी तो आपल्या लोकसंचिताला कवटाळून आहे. गणेशाएवढी लोकप्रियता कोणत्याच देवतेला लाभली नसावी. आबालवृद्धांच्या मनाला मोहिनी घालणारा गणेश हा आपला पारिवारिक सदस्य असल्यासारखी आस्था, प्रेम या देवतेला लाभले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गणेशाला लाभलेला अग्रपूजेचा मान. कोणत्याही शुभप्रसंगी प्रथमतः गणपतीला आवाहन केले जाते. गणेशाचे स्तवन सर्वात आधी केल्याने पुढची संकटे आपोआप टळली जातील, हा अतूट विश्वास लोकमानसात खोलवर रुजलेला आढळतो. कुठल्याही जुन्या मंदिरात अंतराळातून गर्भगृहात जाताना प्रवेशद्वारावरच गणेशपट्टी दिसते आणि मध्यभागी गणेश विराजमान झालेला दिसतो. तंत्रसंप्रदायाच्या आराधनेतही भौमितिक आकारातील गणेशमूर्ती दिसते. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाही ज्ञानेश्वरांनी गणेशाला आवाहन केलेले आहे.

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।

तमाशा किंवा लोकनाटय़ाची बांधणी अनेक लोककलांचा मेळ घालून केलेली आढळते. त्यापैकी गोंधळी लोकसमूहाचा गोंधळ हा प्रकार महत्त्वाचा आहे. गोंधळ हा मातृसत्ताक देवतेच्या धार्मिक विधीशी संबंधित प्रकार आहे. अशा या गोंधळात अनेक देवतांना आवाहन केले जाते. त्यातील एक आवाहन असे आहे –

मोरया गणपती रे गणराजा ।
किती विनवू तुला महाराजा ।
तेहतीस कोटी देवदेवता ।
सर्व अधिगणनायका ।
दैत्य मारून केलीस दशा ।
चेडा, झुटिंग वेताळ म्हैसा ।
दुष्टाला देशी तू सजा ।
किती विनवूं तुला महाराजा ।।

या पद्धतीचा ‘गण’ झाल्यानंतर जगदंबेचे स्तवन करून अनेक देवदेवतांना आवाहन केले जाते.

आधी नमिला गणपती
मग नमा हो सर्जा नाम सरस्वती
याप्रमाणे गणपतीला आद्य मान दिला जातो. हा गण-
गणाचार्य माणचार्य चारखानी चारवाणी
मग नमानी शंभवामी

अशा स्वरूपात असतो किंवा गणेशाला केले जाणारे आवाहन असे असते.

डॉ. रामचंद्र देखणेंच्या ‘गोंधळ : परंपरा, स्वरूप आणि आविष्कार’ या ग्रंथात वरील गणेश आवाहन येते. येथे पंढरपूरचा विठ्ठल आणि गणपती यांचे ऐक्य सूचित केले आहे याचा अर्थच असा आहे की, गणपतीला वेगवेगळय़ा देवतांच्या रूपात लोकमानसाने पूजले आहे.

यानंतर जगदंबेचे स्तवन झाल्यावर पुन्हा देवदेवतांना ‘आवतणं’ दिले जाते. आवतणं म्हणजे निमंत्रण. यात अष्टविनायकांना पाचारण केले जाते.

‘गणेश’ या शब्दाची फोड पाहता ‘गण+ईश अशी आहे. मनाला व वाणीला दिसणारे, गोचर आणणारे जे दृश्य व अदृश्य विश्व आहे, ‘ग’कार रूपी आहे. मनोवाणीस जे अगोदर व संयोग वियोगात्मक आहे. ते जीवात्म परमात्म ऐक्यभाव रूप असून तेच ‘पा कार संज्ञेने ओळखले जाते. या दोन्ही तत्त्वांचा अर्थात गणाचा जो ईश म्हणजे स्वामी तो गणेश होय. गणेशाची आराधना म्हणजे या दोन्ही तत्वांच्या स्वामीची आराधना होय. असे असले तरी विनायक ही पूर्वी विघ्नकारक देवता होती असा एक संदर्भ डॉ. रा. चिं. ढेरे देतात त्या अनुषंगाने विघ्नहर, गजमुख, गणपती, गणनायक, गौरीकुमार या प्रत्येक उपाधिला काही वेगळे अर्थ असू शकतात.

गोंधळातूनच तमाशा निर्माण झाला असल्याने तमाशातही सुरुवातीला सर्व कलाकार रंगमंचावर येतात आणि ढोलकीचा तोडा झाल्यावर, सर्व वाद्यांचा सुमेळ साधल्यावर गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी ‘गण’ सुरू होतो.

आधी गणाला रणी आणील
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना...

हा प्रसिद्ध गण तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर आदी तमाशा संचात नेहमी म्हटला जात असे. याच धर्तीवर आणखी एक गण आम्ही लहानपणी ऐकायचो-

जय शिवशंकर, गिरीजातनया।।
वंदन पहिले तुला गणेशा…
शुभकार्याच्या शुभप्रारंभी
नमन तुज नटवरा…
वंदन करूनी तुजला देवा ।।।
रसिक जनांची करतो सेवा…
कौतुक होऊनि आम्हां मिळावा
सन्मानाचा तुरा…
हो।। हो। जय शिवशंकर...

याच पद्धतीने कोकणातील संकासूर, खेळे, दशावतार, जाखडी नृत्य यांच्यामध्येही गणेश आराधना आढळते. मुंबईमध्ये किंवा मुंबईबाहेर काही विशिष्ट प्रसंगी किंवा गणपती उत्सवात बायका जो गण म्हणायच्या त्याला ‘गणबा’ ही एक संज्ञा वापरात होती. या ‘गणबा’मध्ये मुंबईचा उल्लेख येतो.

एकूणच लोकसाहित्यामध्ये गणपती असा सर्वत्र भेटतो. सर्व शुभकार्याच्या प्रारंभी ज्याला अग्रपूजेचा मान आहे, ज्याच्या येण्याने सारा आसमंत चैतन्याने फुलून जातो अशा या गणरायाच्या उत्सवामध्ये अशा लोकसंगीताचा धांडोळा घेऊन लोकमानसातील गणेशाची आराधना करायला हवी. मात्र हल्ली डी. जे.च्या दणदणाटात, झिंगाट तालावर उन्मादाने नाचणाऱया तरुणाईला हे लोकसंचित कळेल का, हाही एक प्रश्न आहे.

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]