जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दी, एकत्र येणे हीच श्रद्धांजली

>> संजय नहार

जालियनवाला बाग हत्याकांड हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक झाले. हिंदुस्थान पुन्हा एक होण्याची प्रक्रिया या घटनेपासून सुरू झाली. यापूर्वी देश, भाषा, धर्म, जात आणि राज्य यांमध्ये विभागलेला होता. आता पुन्हा सर्वांनी देश सामर्थ्यवान बनविण्यासाठी एक होणं हीच जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल.13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी आणि रामनवमी हे सण एकत्र आले होते. त्याला 100 वर्षे झाली. या वर्षी पुन्हा बैसाखी तसेच रामनवमी हे 100 वर्षांनी एकत्र आले आहेत आणि आजही त्यावेळी होती तेवढीच गरज देश म्हणून सर्वांनी एक होण्याची आहे.

हिंदुस्थान एक होता का? एक आहे का? असे अनेक प्रश्न इतिहासाने पुढच्या पिढय़ांसाठी शिल्लक ठेवले आहेत. याचे उत्तर म्हणजे जेव्हा जेव्हा आघात होतात तेव्हा तेव्हा देश एक होण्याची प्रक्रिया बलवान होते. अशीच देश म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया 100 वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये शहीद झालेल्या हजारो नागरिकांच्या बलिदानानंतर सुरू झाली होती.

ज्याला ब्रिटिशांविरुद्धचे पहिले सशस्त्र युद्ध म्हटले जाते, त्या 1857 च्या उठावानंतर या देशामध्ये स्वातंत्र्याची ऊर्मी जागी होऊ लागली आहे याची जाणीव झाल्याने ब्रिटिश सावध झाले होते. हा उठाव मोडल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख सदैव वेगळे राहिले तरच आपल्याला हिंदुस्थानवर राज्य करणे शक्य आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यामुळे त्यानंतर छोटय़ा मोठय़ा घटना घडल्या तरी ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठाव झाला नाही.

1857 नंतर म्हणजे 48 वर्षांनी, 1905 मध्ये ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी असलेल्या कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे देशात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढू लागला. प्रारंभी या असंतोषाचा केंद्रबिंदू मुख्यतः पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र होता. त्यातूनच पुढे 1913 साली देशाला सशस्त्र मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गदर चळवळीचा जन्म झाला. गदर म्हणजे बंड. अमेरिका आणि कॅनडामध्ये जे हिंदुस्थानी राहत होते त्यांनी, त्यातील मुख्यतः पंजाबी लोकांनी पुढाकार घेऊन ही क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती. ज्यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम नेते होते. पक्षाचे मुख्य कार्यालय सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथे होते. त्या संघटनेत परमानंदभाई, सोहनसिंह भकना, हरदयाल, मोहम्मद इक्बाल शेदाई, कर्तारसिंग सराभा, अब्दुल हाफिज मोहम्मद बरकातुल्ला, सुलेमान चौधरी, आमीर चौधरी, रासबिहारी बोस आणि गुलाब कौर यांचा समावेश होता. या चळवळीत नंतर महाराष्ट्रातील पांडुरंग खानखोजे आणि तरुण क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे हे सहभागी झाले आणि या चळवळीला एक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. त्या अर्थाने हे ब्रिटिशांविरुद्धचा हा दुसरा सशस्त्र उठाव होता. मात्र तोदेखील ब्रिटिशांनी मोडून काढला. कर्तारसिंग सराभा तसेच त्यांच्या सहकाऱयांविरुद्ध बंडाच्या कटाचा तर विष्णू गणेश पिंगळेंविरुद्ध राजद्रोहाचाही गुन्हा दाखला करण्यात आला. 16 नोव्हेंबर 1915 रोजी त्यांना लाहोरमध्ये फाशी देण्यात आली.

अशा घटनांमुळे पूर्ण हिंदुस्थानात ब्रिटिश सरकारविरोधात रोष वाढत होता. लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर येण्याची आणि सरकारला विरोध करण्याची हिंमत दाखवू लागले. निराश ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. हिंदू, मुस्लिम, शीख दंगे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले अथवा अशा प्रयत्नांना बळ दिले. आंदोलने दडपताना ब्रिटिशांना विरोध करणाऱयाला विनाचौकशी तुरुंगात टाकणे, सरकारला विरोध करणाऱयाविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे, वृत्तपत्रांच्या हक्कांवर गदा आणणे, लोकांना एकत्र येऊ न देणे असे प्रकार ब्रिटिश सरकारने सुरू केले. अत्याचार अधिक कठोरपणे करता यावेत यासाठी सरकारने रौलेट ऍक्टची तरतूद केली. या कायद्यातील तरतुदीला विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रहाचे आवाहन केले. या काळात पंजाबमधील आंदोलनाचे नेतृत्व करणारे डॉ. सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांना या कायद्यान्वये 10 एप्रिल 1919 रोजी अटक करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली. अमृतसरच्या जिल्हाधिकाऱयाच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. जागोजागी हजारो लोक रस्त्यावर आले. त्यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. एका युरोपियन नागरिकाचीही हत्या झाली आणि एका युरोपियन महिलेवर काही आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला. अर्थात तिला वाचविलेही स्थानिकांनीच. या थैमानात अनेक सरकारी इमारतींना आगी लावण्यात आल्या. ब्रिटिशांकडून झालेल्या गोळीबारात पंधरापेक्षा अधिक लोक शहीद झाले.

डॉ. सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेनंतर ज्या हिंसक घटना घडल्या, त्यामुळे ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर पिसाळला आणि आंदोलनकर्त्यांना अद्दल घडवू हा निर्णय झाला. 11 व 12 एप्रिल हे दोन दिवस शांततेत गेले, पण 13 एप्रिलला बैसाखीचा सण होता. हा सण रब्बी पिकाच्या कापणीनंतर पूर्ण उत्तरेत मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी 13 एप्रिल 1699 साली गुरू गोविंदसिंग यांनी लढाऊ अशा खालसा पंथाची स्थापना केली होती. 13 एप्रिल 1919 या दिवशी बैसाखी, खालसा पंथाची स्थापना आणि रामनवमी हे सण एकत्र आले. त्यामुळे डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध आणि रौलेट ऍक्टला विरोध करण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासमोरील जालियनवाला बागेत ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र आले. या निषेध सभेचे आयोजन कन्हैयालाल भाटिया आणि मोहम्मद बशीर यांनी केले होते. त्याच काळात पंजाबमध्ये कश्मिरी मुस्लिमही मोठय़ा संख्येने राहत होते. डॉ. सैफुद्दीन किचलू हे कश्मिरी मुस्लिमच होते. त्यामुळे या सभेत शेकडोंच्या संख्येने पंजाबी आणि कश्मिरी मुस्लिमही सहभागी झाले होते.

आधीच पिसाळलेल्या ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याच्या हुकमावरून ब्रिटिश लष्कराने आणि पोलिसांनी जालियनवाला बागेतील सभेसाठी जमलेल्या हजारो निःशस्त्र लोकांवर रायफलींच्या 1,600 फैरी झाडल्या. या सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी एका अरुंद चिंचोळ्या गल्लीचाच आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे गोळीबार सुरू झाल्यावर जीव वाचवण्याचा काहीही पर्याय उरला नाही. शेकडोंनी या बागेतील विहिरीमध्ये उडय़ा मारल्या आणि त्यात त्यांचे प्राण गेले. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या हत्याकांडात शहीद झालेला सर्वात लहान मुलगा कश्मिरी मुस्लिम होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे 484 लोकांचा मृत्यू झाला. अनधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा दीड हजाराहून अधिक आहे. शेकडो लोक क्रूर पद्धतीने मारले गेले. तिथूनच हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली, तर लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यंत सर्वांनी त्याचा तीव्र निषेध केला. या हत्याकांडातून शहीद भगतसिंगसह अनेक क्रांतिकारक जन्माला आले. तर या जालियनवाला बागेतील गोळीबारात जखमी झालेल्या क्रांतिकारक उधमसिंग यांनी 13 मार्च 1940 साली म्हणजे 21 वर्षांनी लंडनमध्ये जाऊन रेजिनाल्ड डायर याची हत्या केली आणि जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांडाचा बदला घेतला.

हिंदुस्थान पुन्हा एक होण्याची प्रक्रिया या घटनेपासून सुरू झाली. 13 एप्रिल 1919 ला जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडले तेव्हा बैसाखी आणि रामनवमी हे सण एकत्र आले होते. त्याला 100 वर्षे झाले. या वर्षी तो योग पुन्हा 100 वर्षांनी आला आहे. आजही जालियनवाला बागेतील हत्याकांड आठवले की, अंगावर शहारा येतो. आजही त्या स्मृती जपण्यासाठी तेथील विहीर, संग्रहालय आणि नंतर उभारलेल्या स्मारकाला भेट देण्यासाठी हजारो लोक येतात आणि तेथील माती आपल्या कपाळाला लावून देशासाठी काही करण्याचा संकल्प करतात.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांनी दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या संसदेत जालियनवाला बाग हत्याकांडाचा ‘लाजिरवाणी घटना’ असा उल्लेख केला. या घटनेनंतर हिंदू, शीख, मुस्लिम सर्वच एकत्र आले, पण 1947 साली पुन्हा फाळणी झाली. जालियनवाला बागेत ब्रिटिशांविरुद्ध एकत्र लढलेले हिंदू व मुस्लिम ब्रिटिशांच्याच कारस्थानाचे बळी ठरून एकमेकांविरुद्ध लढले आणि लाखोंच्या संख्येने मृत्युमुखी पडले. त्यानंतर देश एक होण्याऐवजी विभागला गेला. आता जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण होताना पुन्हा एकदा देश म्हणून एक येण्याची वेळ आली आहे. तसे एकत्र होणे हीच जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती शताब्दी समितीचे संयोजक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या