सादिया शेखच्या निमित्ताने उभे राहिलेले प्रश्न…

>> संजय नहार

आज समाजात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, बेरोजगारी, गुन्हेगारी, नागरिकीकरण, यांसारख्या प्रश्नांमुळे आज शहरात अतिरेकी सहजपणे आसरा घेऊ शकतात त्यामुळे शहरांमध्ये अनेक प्रश्न वाढत आहेत. दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा. त्यासाठी समाजात जागरुकता, आणि सजगता येणे फार गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरणाऱया अफवा या उगाच गैरसमज निर्माण करून, आपल्या सुरक्षा यंत्रणेचे लक्ष विचलित करू शकतात. प्रत्यक्ष दहशतवाद्यांविरुद्ध जेव्हा संघर्ष सुरू होईल तेव्हा तो अधिक गुंतागुंतीचा आणि अडचणीचा होईल हाच या घटनेचा संदेश आहे आणि त्याचवेळी सादिया शेख या मुलीच्या निमित्ताने उभे राहिलेले प्रश्नही हेच आहेत.

काही वर्षांपूर्वी मला एक आंतरदेशीय पत्र आलं होतं, अर्थात तेव्हा ते फक्त पस्तीस पैशांचं होतं. आता अशी पत्रं कुणी पाठवणार नाहीत. त्या पत्रात मला खलिस्तानवाद्यांच्या नावाने धमकी आली होती. त्यात लिहिलं होतं की, ‘आम्ही तुम्हाला ठार मारू वगैरे..’ आधी मला या पत्रातील धमकी म्हणजे कुणीतरी चावटपणा केला आहे असे वाटले. मात्र त्यावेळी ‘वंदे मातरम’ संघटनेचे अनेक तरुण पंजाबला जाणार होते त्यामुळे या धमकीला गंभीरपणे घेऊन यावर काहीतरी केले पाहिजे म्हणून आधी पोलिसांना कळवून टाकलं. मला ताबडतोब पोलिसांनी सुरक्षा दिली, ‘गन’ हातात घेतलेले दोन पोलीस माझ्या अवतीभोवती वर्षभर राहिले. म्हणजे ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी आणि माझ्या जवळचे लोक घाबरून गेले. माझ्या जिवाला धोका आहे हे कळल्यावर आणि मला असं पत्र आलंय ही बातमी पुण्यातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये आली. त्यामुळे पोलिसांनाही पाऊल उचलणे भाग पडले. पण काही दिवस झाले आणि मग सगळं शांत झालं. मला विचार पडला, अशा कितीतरी घटना घडतील, वृत्तपत्रांमध्ये येतील, त्यावर कोठलाही धोका न पत्करण्याच्या भावनेतून शासन लगेच सुरक्षा व्यवस्था पुरवेल.

कालांतराने माझ्या लक्षात आले हा दहशतवादी संघटनांचा एक डाव आहे. अशा हजार-पंधराशे लोकांना पत्रे पाठवायची, एखादी घटना खरोखर करायची त्यामुळे मोठी चर्चा होते, गोंधळ होतो आणि पोलिसांना तसेच सुरक्षादलांना डोळ्यात तेल घालून नेहमी दक्ष राहावे लागते. या घटनेला तीस वर्षांपासून अधिक काळ झाला. अशा प्रकारच्या घटनांना तोंड देणारी यंत्रणा सुधारली असली आणि पोलिसांकडेही अत्याधुनिक यंत्रणा येत असल्या तरीही अतिरेकी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. एक प्रकारे हे सुद्धा युद्धच असते.

पोलिसांना अशा कितीतरी केसेस हाताळाव्या लागतात, त्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात येते. परंतु पोलिसांची कार्यक्षमता, अशी परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य इत्यादींचा अशावेळी कस लागतो आणि दहशतवादी अथवा शत्रू राष्ट्र जाणीवपूर्वक अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करतात अथवा सभोवतालच्या भागात घडलेल्या घटनांचा परिणामही तरुणांवर होत असतो म्हणूनच अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी या मार्गाकडे वळतात.

ही घटना सांगायचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि माध्यमांमध्ये गाजत असलेले पुण्यातील सादिया शेखचे प्रकरण. आज दहशतवाद, आतंकवाद, जहालवाद वाढवण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. अगदी छोटय़ा शहरांपासून ते मोठय़ा शहरांमध्ये अशा गटांतून काम करणारी माणसे आपापले गट निर्माण करत असतात. त्यांच्या गटातल्या लोकांची संख्या वाढवायचा प्रयत्न करत असतात. सादिया शेख ही अशीच एक पुण्यातली तरुणी. तीन वर्षांपूर्वी मला काही वरिष्ठ अधिकाऱयांनी एक मुलगी इसिसच्या संपर्कात फेसबुकद्वारे आली असून आणि तिला आम्ही तिच्या कुटुंबाच्या मदतीने त्यापासून परावृत्त केल्याचे सांगितले. मात्र अशा प्रकारे एखाद्या अतिरेकी संघटनेशी संपर्कात येणे, प्रत्यक्षात त्यांना सहकार्य करणे अथवा त्यांच्यासाठी काम करणे आणि मैदानावर मृत्यूच्या तयारीने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या कृतीला जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रत्येक जहालमतवादी आणि अतिरेकी संघटनांचा प्रयत्न असतो. अशावेळी केवळ पोलीस अथवा सुरक्षा यंत्रणा या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही लढाई समाजातील सर्व घटकांची आहे हे आपण विसरून जातो. अतिरेक्यांना आणि गुन्हेगारांना धडा शिकवणे पोलिसांना अथवा सुरक्षा यंत्रणांना अवघड नसते. मात्र जेव्हा अशा विचारांना जनतेचा पाठिंबा मिळू लागतो तेव्हा लढाईची दिशा बदलावी लागते.

महाराष्ट्रामध्ये घडणाऱया या घटना भविष्यातील येणाऱया संकटाची चाहूल आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आम्ही सरहद संस्थेमध्ये अशा प्रकारच्या घटनांचे बारकाईने अवलोकन करतो. दुर्दैवाने ज्या घटना भविष्यात घडण्याची शक्यता आहे त्याला तोंड देण्यासाठी आपल्या पोलीस दलाला प्रशिक्षित करण्याऐवजी सर्व सत्ताधारी राजकीय कारणांसाठी पोलीस आणि सुरक्षादलांचा वापर करतात. त्यामुळेच मतांच्या स्वार्थासाठी अशा घटनांचा केलेला वापर राज्याच्या आणि देशाच्या दीर्घकालीन फायद्याचा नसतो. सादिया शेख सारख्या घटनांनी पोलिसांची कुचंबणा होते. काहीही केले तरी नुकसान अटळ असते आणि शत्रूला फायदा होतो किंबहुना शत्रू अशा घटनांची वाटच पाहत असतो. आंतरराष्ट्रीय शक्तीसुद्धा यामध्ये सहभागी आहेत.

द्वेष पसरविणाऱया घटनांमुळे धार्मिक आणि जातीय अढी निर्माण होतात. विचारांचा कडवेपणा वाढत जातो. अशीच अवस्था जगभरातल्या घटनांमुळे प्रभावित होऊन सादिया शेखची झाली. अशा सादिया शेख गावागावात निर्माण होणे हे शत्रूचे यश आहे. आपल्याला देशासाठी खरेच जर काही करायचे असेल तर अतिरेक्यांपासून जहालमतवाद्यांना आणि जहालमतवाद्यांपासून समाजाला वेगळे करता आले पाहिजे. समाजाची, लष्कराची आणि पोलिसांची ही जबाबदारी आहे.
सादिया शेख ही मानवी बॉम्ब आहे, अशी बातमी सगळीकडे पसरली आणि मग संपूर्ण हिंदुस्थानची सुरक्षा व्यवस्था तिला शोधायला लागली. ती आत्मघातकी हल्ला करणारी मुलगी आहे अशी बातमी सोशल मीडियावर पसरली, सगळीकडे याची चर्चा झाली. पोलीस यंत्रणा, आर्मी यंत्रणा कामाला लागली. प्रत्यक्षात चौकशी केल्यावर समजले की, ती मुलगी काही अतिरेकी किंवा आत्मघातकी हल्ला करणारी नाही. तसे पाहायला गेले तर, पोलीस गेल्या तीन ते चार वर्षांपासून सादियाच्या मागावर होते. तिच्यावर संशय घेत होते. परंतु प्रत्यक्षात ती तशी नाही असे पोलिसांनाही जाहीरपणे सांगावे लागले.

प्रत्यक्षात ती कोण, ती कश्मीरला का गेली, तिला कुणाची मदत मिळाली, ही बातमी कोणी केली अशा अनेक गोष्टी या संदर्भात अनुत्तरित राहिल्या. ती खरेच आत्मघाती हल्ला करणारी आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. परंतु असा कोण संशयित सापडला तर संपूर्ण यंत्रणा त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागते आणि आपली संपूर्ण ऊर्जा त्याठिकाणी खर्च करते. नेमके इथेच शत्रूचे फावते आणि मग प्रत्यक्ष जे काम करायचे आहे त्याकडे दुर्लक्ष होते. जर या यंत्रणेला योग्य प्रशिक्षण मिळाले तर मुंबई सारख्या शहरांमध्ये अतिरेक्यांना आपलं नेटवर्क करण्यासाठी अनेक अडचणी येतील, ते इतक्या सहजासहजी त्यांचे जाळे शहर, खेड्यांमध्ये पसरवू शकणार नाहीत. पोलीस दलांसाठी हे मोठे आव्हान राहणार आहे.

आज समाजात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, बेरोजगारी, गुन्हेगारी, नागरिकीकरण, यासांरख्या प्रश्नांमुळे आज शहरात अतिरेकी सहजपणे आसरा घेऊ शकतात त्यामुळे शहरांमध्ये अनेक प्रश्न वाढत आहेत. दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा. त्यासाठी समाजात जागरुकता, आणि सजगता येणे फार गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरणाऱया अफवा या उगाच गैरसमज निर्माण करून, आपल्या सुरक्षा यंत्रणेचे लक्ष विचलित करू शकतात. प्रत्यक्ष दहशतवाद्यांविरुद्ध जेव्हा संघर्ष सुरू होईल तेव्हा तो अधिक गुंतागुंतीचा आणि अडचणीचा होईल हाच या घटनेचा संदेश आहे आणि त्याचवेळी सादिया शेख या मुलीच्या निमित्ताने उभे राहिलेले प्रश्नही हेच आहेत.

(लेखक ‘सरहद’ संस्थेचे अध्यक्ष आणि कश्मीर समस्येचे अभ्यासक आहेत.)