कश्मीरमधील नवे आव्हान

43

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

जम्मू-कश्मीरमध्ये सत्यपाल मलिक यांनी नवे राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला असला तरी दोन ताज्या घटनांमुळे त्यांच्यापुढील आव्हानांमध्ये भर पडली आहे. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावले गेले. हा पाकिस्तानचा सुनियोजित कट असून हिंदुस्थानला बदनाम करण्याचा डाव आहे. त्याचा मुकाबला करावा लागेल. त्यापेक्षा गंभीर आव्हान आहे ते स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनांना जाऊन मिळण्याचे. 2018 मध्ये 131 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले असल्याची माहिती पुढे आली आहे. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.

कश्मीरसंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या घटना जम्मू-कश्मीरच्या शांतता, सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि एकूणच हिंदुस्थानच्या सुरक्षिततेवर परिणाम करणाऱया आहेत. त्यामध्ये एक घडामोड सकारात्मक आहे. ती म्हणजे जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून झालेली सत्यपाल मलिक यांची नियुक्ती. कश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करून नागरिकांना सकारात्मक वातावरण आणि सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने केला जाणारा हा सकारात्मक बदल आहे. सत्यपाल मलिक हे बिहारचे माजी राज्यपाल आहेत. जवळपास 51 वर्षांनंतर पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय राहिलेल्या व्यक्तीला जम्मू-कश्मीरचे राज्यपालपद देण्यात आले आहे. अन्यथा आजवर नोकरशाही किंवा लष्कराशी संबंधित अधिकाऱयांचीच या पदासाठी वर्णी लागत होती. मलिक यांनी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री या पदांवरही काम केलेले आहे. त्यांच्यापुढे कश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान आहे.

सत्यपाल मलिक यांची निवड हा आशेचा किरण मानला जात असला तरी कश्मीरमधील दुसरी घटना राष्ट्राच्या सुरक्षेवर परिणाम करणारी ठरू शकते. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये मोठय़ा प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवले गेले. त्याचबरोबर दगडफेकही मोठय़ा प्रमाणात झाली. कश्मीरमध्ये दगडफेक किंवा निदर्शने होणे ही तशी नवीन बाब नाही, मात्र काही महिन्यांच्या अंतराने इसिसचे झेंडे तिथे दाखवले गेले आहेत ही नक्कीच चिंताजनक गोष्ट आहे. त्यामागचा उद्देश काय आहे याचा विचार होणे आवश्यक आहे.

इस्लामिक स्टेटचे झेंडे कश्मीरमध्ये यापूर्वीही दाखवले गेले आहेत याचा अर्थ कश्मीरमधून त्यांना समर्थन मिळते आहे असे नाही. उलटपक्षी हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला आहे हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानचे हे सुनियोजित धोरण आहे असे नक्कीच म्हणता येईल. याचे कारण जम्मू-कश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम हे शिया पंथीय मुसलमान आहेत आणि इसिस ही सुन्नी पंथीयांची संघटना आहे. सुन्नी पंथीय देशांमध्ये ती अस्तित्वात होती आणि आता तिचा जोर व प्रभाव कमी झालेला आहे. इराक आणि सीरियामधून या संघटनेची मोठय़ा प्रमाणावर पीछेहाट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीरमध्ये इसिसचे झेंडे दाखवले जात आहेत. तथापि, जम्मू-कश्मीरमध्ये शिया पंथीय जनता असल्याने ते इसिसला समर्थन देऊ शकत नाहीत. त्यामुळेच हा पाकिस्तानचा कुटील डाव आहे.
आता प्रश्न उरतो तो पाकिस्तानला असे का करायचे आहे? याचे कारण सध्या पाकिस्तानचा जागतिक स्तरावर तयार झालेली आपली कुप्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहशतवादाची निर्यात करणारी फॅक्टरी म्हणून आज अवघे जग पाकिस्तानकडे पाहते. पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणावर दहशतवाद्यांना प्रशिक्षित केले जाते ही बाब आता जगज्ञात आहे. तेथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षणतळ असून तिथून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी जगभर पसरत आहेत. आजवर हिंदुस्थान हीच गोष्ट सातत्याने जागतिक व्यासपीठावर मांडत आला आहे, मात्र त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास बसत नव्हता. पण जानेवारी 2018 मध्ये खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करून पाकिस्तान दहशतवादाला कसा समर्थन देत आहे यावर बोट ठेवले. तसेच दहशतवादाला मदत करणे थांबवले नाही तर पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवण्यात येईल असा सज्जड दमही त्यांनी भरला होता. अमेरिकेने ही भूमिका घेतल्यामुळे इतर युरोपीय देशही त्याच मार्गाने जाणार आहेत. साहजिकच याचे प्रतिकूल परिणाम पाकिस्तानला भोगावे लागू शकतात. कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या दिशेने प्रवास करते आहे. पाकिस्तानला जगाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. ही आर्थिक मदत घेण्यासाठी पाकिस्तानला आपली प्रतिमा बदलणे गरजेचे आहे. त्यामुळेच पाकिस्तान आपला देश लोकशाहीला समर्थन करणारा, लोकशाही रुजलेला आणि दहशतवादाची निर्यात न करणारा आहे असे चित्र निर्माण करते आहे. हे करत असताना पाकिस्तान हिंदुस्थानला आरोपीच्या पिंजऱयात उभा करू पाहत आहे. जगात दहशतवादाची निर्यात हिंदुस्थानकडून होते आहे असे चित्र निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यासाठीच हिंदुस्थानात इसिसचे समर्थक वाढताहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. जम्मू-कश्मीरमध्ये हे समर्थक आहेत असे दाखवण्यासाठी इसिसचे झेंडे दाखवले जाताहेत आणि हिंदुस्थानात इसिसचा पुनर्जन्म होतो आहे असे चित्र पाकिस्तानकडून तयार केले जात आहे. हिंदुस्थानात पुन्हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना पाय रोवायचा प्रयत्न करताहेत असा कांगावा पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर करायचा आहे. त्यामुळेच अशा निदर्शनांमध्ये जाणीवपूर्वक इसिसचे झेंडे दाखवले जातात.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इसिसच्या रडारवर हिंदुस्थानचा समावेश नाही. हिंदुस्थानी मुसलमानांनी या दहशतवादी संघटनेला सातत्याने नाकारले आहे. युरोपमधून मागील काळात शेकडोंच्या संख्येने निर्वासित नागरिक इसिसमध्ये जात होते, पण तसा प्रकार हिंदुस्थानात दिसला नाही. आतापर्यंत केवळ 25 तरुण इसिसमध्ये गेले असल्याची माहिती पुढे आली आहे. युरोपच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे कश्मीरात इसिसचे झेंडे दाखवणे ही हिंदुस्थानची बदनामी करण्याची पाकिस्तानची धूर्त चाल असून एका सुनियोजित रणनीतीचा तो एक भाग आहे.

कश्मीरमधील तिसरी महत्त्वाची घडामोड मात्र चिंताजनक आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण प्रकाशित झाले असून त्यामधून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. जम्मू-कश्मीरमध्ये या वर्षी म्हणजे 2018 मध्ये 131 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले असल्याचे हा अहवाल सांगतो. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. 2000 पासून पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा संख्येने तरुण दहशतवादाकडे वळले आहेत. 2000 मध्ये एकूण 54 तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले होते. 2017 मध्ये ही संख्या 126 होती, मात्र चालू वर्षी जुलै महिन्यापर्यंतच 131 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये गेले असतील तर ही वाढ नकारात्मक बाब आहे.

साधारणतः जम्मू-कश्मीरचा विचार करता दक्षिण कश्मीरमध्ये प्रामुख्याने शोपिया या जिह्यातील सर्वाधिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळतात. आताही 131 पैकी 35 तरुण हे शोपिया जिह्यातील असल्याचे समोर आले आहे. हे तरुण दहशतवादाकडे आकर्षित होतात याचा विचार केला तर एक गोष्ट कळते की, जैश ए मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा या संघटना त्यांच्या आकर्षणाची केंद्रे आहेत. सध्या मात्र एक नवी संघटना पुढे येते आहे. ‘अन्सार गजवत उल हिंद’ असे या संघटनेचे नाव आहे. अल कायदा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ओसामा बिन लादेन याने स्थापन केली होती. अन्सार गजवत उल हिंद ही संघटना ओसामाला मारल्यानंतर गाळात गेलेल्या अल कायदाला बांधील असणारी आहे. या संघटनेला जास्तीत जास्त तरुण जाऊन मिळत आहेत. ही संघटना कट्टर इस्लामचे समर्थन करणारी आहे. त्यामुळे हा कट्टरतावाद कश्मीरात आणण्याचे प्रयत्न होताना दिसताहेत. त्याला समर्थनही मिळते आहे.

चौकट
बुरहान वाणीला मारल्यानंतर त्याच्यासारखाच एक नवीन चेहरा पुढे येऊ लागला आहे. कश्मिरी तरुणांसाठी बुरहान वाणी हा हीरो होता. त्यामुळे त्याला मारल्यानंतर खूप मोठी निदर्शने जम्मू-कश्मीरमध्ये झाली. त्याच्या पश्चात आता झाकीर राशिद भट ऊर्फ झाकीर मुसा हा नवा चेहरा समोर आला आहे. ‘अन्सार गजवत अल हिंद’ या संघटनेचा तो म्होरक्या आहे. तो तरुणांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत आहे. ही बाब नक्कीच गंभीर आहे. कश्मीरातील मूलतत्त्ववाद वाढणे ही चिंतेची बाब आहे. सीमेवर कुंपण घालून दहशतवाद्यांना थांबवता येईल, पण स्थानिक स्तरावर लोकप्रिय होणारे दहशतवादी हेदेखील तितकेच विघातक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्याविरोधात पावले उचलावी लागतील. यासाठी मुख्यत्वे करून बेरोजगारीच्या मुद्दय़ाकडे लक्ष द्यावे लागेल, यासाठी विकासाची गती वाढवावी लागेल. पण दहशतवाद हाच तेथील विकासाचा शत्रू आहे. त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात कठोर धोरण अवलंबिलेच पाहिजे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या