मुद्दा : स्त्री वर्गाच्या हितासाठी…!

29


>> शकुंतला बद्दीम

स्त्री स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती यांचा उद्घोष करत पूर्वी स्त्रियांचा शिरकाव नसलेली संशोधन, इंजिनीयरिंग, सैनिकी शिक्षण, विमान उड्डाण अशा अनेकविध क्षेत्रांत स्त्रियांनी आपले स्थान निर्माण केले आणि पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली. आता बस कंडक्टर, रेल्वे मोटरमन, रिक्षाचालक यांसारख्या नोकऱया – व्यवसाय महिला करताना दिसतात. अर्थात त्याचवेळी पुरुषांची बरोबरी करताना आम्ही कमी नाही हे दाखवण्यासाठी आम्हीही पुरुषांसारखे कपडे घालणार, राकट बनणार आणि आमच्यातील भावनाप्रधानतेला दूर ठेवणार असा प्रकारही पाहायला मिळतो. मात्र हे करत असताना निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यात काही असमानता ठेवलेली आहे. या गोष्टीचे भान ठेवले जात नाही असे दिसते. हिंदू धर्मात स्त्री ही शक्तीची देवता मानली जाते. मात्र त्याचवेळेला स्त्रिया पुरुषांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडत आहेत. मग या स्त्रीस्वातंत्र्याला,स्त्रीमुक्तीला काही अर्थ उरतो का? पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी स्त्रीमुक्तीचे पुरस्कर्ते इत्यादी मंडळींनी याचा अवश्य विचार करावा.

गेल्या काही वर्षांपासून जगभरातून चित्रपटसृष्टी आणि अन्य व्यावसायिक आस्थापने यात काम करणाऱया महिलांवर होणाऱया अत्याचारांच्या (लैंगिक शोषण) कथा ‘मी टू’ या ट्विटरवरील ‘हॅशटॅग’च्या माध्यमातून मध्यंतरी जगासमोर मांडल्या गेल्या आहेत. त्याचाच कित्ता गिरवत, ‘नन्स टू’ हा हॅशटॅग चालू झाला. जगात ख्रिस्ती लोकांची संख्या सर्वाधिक आहे. कारण 157 देश ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ती लोकांचे प्रार्थना स्थळ म्हणजे चर्च. या चर्चमधील धर्मोपदेशकांना पाद्री असे म्हणतात. या पाद्रय़ांकडून तेथे काम करणाऱया नन्स म्हणजे भक्तिणींवरही लैंगिक अत्याचार होतात असे आरोप झाले. होत असतात. केरळमधील मध्यंतरी उघडकीस आलेले प्रकरण तर गंभीरच आहे. अत्याचारपीडित नननेच ते चव्हाटय़ावर आणले होते. हिंदुस्थानातही ख्रिस्ती आणि चर्च यांची संख्या काही कमी नाही, परंतु याबाबतीत हिंदुस्थानातील निधर्मी, पुरोगामी, स्त्रीमुक्ती संघटना अवाक्षर काढत नाहीत. प्रसारमाध्यमेही याबाबतीत गप्प का? खेदाची गोष्ट अशी की, हिंदू व्यक्तींवर, संत-महंत, साधू-संन्यासी यांच्या विरोधात प्रसारमाध्यमे गरळ ओकत असतात. ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून शंकराचार्यांसारख्यांची (जयेंद्र सरस्वती) अवहेलना करण्याचा उद्दामपणा केला जातो, हे निंदनीय आहे. त्याच बरोबर पैशाच्या आमिषाला किंवा खोटय़ा प्रचाराला बळी पडून ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱया हिंदूंनीही त्यांच्या ‘छलकपटाला’ बळी न पडता हिंदू म्हणून जगावे.

आपली प्रतिक्रिया द्या