अक्षय्य दान

106

>> शिबानी जोशी

धन, संपत्तीवृद्धी, पुण्यसंचय यासाठी आपण दानधर्म करतो. विचार करा आपल्या दानातून एखाद्याचा जीव वाचणार असेल, दृष्टी लाभणार असेल तर…

सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अवयवदान असं आजच्या घडीला नक्कीच म्हणावं लागेल. कारण अन्नदान, धनदान, शिक्षणदान आपण अर्जित केलेलं दान ठरतं, पण अवयव हे निसर्गानेच बहाल केलेले असतात व ते फक्त आपलेच असतात शिवाय अवयवदानामुळे दुसऱया एखाद्याला जीवन देण्याचं अमूल्य कार्य घडत असतं. हेच लक्षात घेऊन आपल्याकडे 10 जून रोजी दृष्टिदान दिवस तसेच 14 जून रोजी ‘जागतिक रक्तदान दिवस पाळला जातो. 2004 सालापासून हा 14 जून हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेले सर्व देश पाळत आले आहेत.

जागतिक रक्तदान दिवस पाळण्यामागचा हेतू काय?
रक्तदानाच्या गरजेचं महत्त्व पटवून देणं, रक्तदात्यांचे आभार मानणं अशा दोन्ही हेतूंनी हा दिवस पाळण्यात येतो. अपघात, प्रसूतिकाळ, मोठमोठय़ा शस्त्र्ाक्रिया किंवा एखाद्या अपंगत्वावर मात करण्यासाठी रक्ताची गरज असते. रक्त वेळेत मिळालं तर हजारोंचे प्राण वाचू शकतात. 2020 पर्यंत सर्व देशांमध्ये स्वयंस्फूर्ती 100 टक्के रक्तदान व्हावं असा जागतिक आरोग्य संघटनेचा ध्यास आहे. आजही जवळ जवळ 73 देशांत नातेवाईक किंवा व्यापारी रक्तस्वरूपात पुरवठा केला जातो. रक्तगट विषयात संशोधन करून नोबेल पुरस्कार मिळालेल्या महान संशोधक कार्ल लॅण्डस्टेनर यांचा जन्म 14 जून 1868 रोजी झाला होता. त्यांच्या जयंतीदिनी हा दिवस 2004 सालापासून पाळायला सुरुवात झाली आहे.

रक्तदान कोण करू शकतं?
रक्तदान, अवयवदानाच्या क्षेत्रात आज अनेकजण काम करीत आहेत. डोंबिवलीचे विनायक जोशी, सुनील देशपांडे यांचा या क्षेत्रातला अनुभव खूप आहे. देशपांडे सांगतात की, आज रक्तदान खूप जण करतात, पण ते स्वतःसाठीसुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळे दर सहा महिन्यांनी प्रत्येकानं रक्तदान करावं. त्यामुळे शरीरातील रक्ताचं पुर्भरण होण्याची गती, कार्यक्षमता वाढते. नवं रक्त तयार होण्याची यंत्रणा कार्यक्षम राहते.

18 ते 65 वर्षे वयाच्या प्रत्येकाने दर सहा महिन्यांनी रक्तदान करावं. यासाठी हिमोग्लोबिन प्रमाणात पाहिजे. शरीरातून इतर कोणताही रक्ताचा स्राव सुरू नसावा तसंच गंभीर आजार नसावा. त्यासाठी आधी चाणी केली जातेच. व्यक्ती निरोगी असल्याची चाचणी झाली की रक्त घेतलं जातं.

रक्तदान कुठे करावं?
रक्तदान शक्यतो सरकारी रुग्णालयं, चांगल्या रक्तपेढीत करावं. व्यापारी रक्तपेढय़ात रक्तदान करणं टाळावं. सिकल सेल, थॅलेसेमिया अशा रोगात सतत रक्ताची गरज असते आणि अशा रुग्णांचं प्रमाणही खूप वाढू लागलं आहे. त्यामुळे केवळ सामाजिक कार्यच नाही तर स्वतःसाठीही रक्तदान करावं. आज रक्तदान करा यासाठी जागरुकता निर्माण होण्याची गरज नाही तर प्रत्येकानं दर सहा महिन्यांनी रक्तदान करावं यासाठी जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.

आपल्याकडे खरं तर अवयवदानाची मोठी परंपरा आहे. प्राचीन काळात दधिची ऋषींनी आपली हाडं देवांना दान केली. त्या हाडांचं ‘वज्र’ हे अस्त्र्ा देवांनी बनवलं व राक्षसांचा पराभव केला. त्यामुळे अवयवदान आपल्या संस्कृतीत नवीन नाही, परंतु लोकांमध्ये असलेल्या गैरसमजांमुळे अजून म्हणावे तितके लोक अवयवदानाकडे वळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. नेत्रदानाबाबतही तसंच म्हणावं लागेल.

10 जूनला महाराष्ट्रात दृष्टिदान दिवस पाळला जातो. नेत्रदानाची गरज का आहे?
आज देशात जवळ जवळ एक ते सवा कोटी अंध व्यक्ती आहेत. त्यापैकी सर्वांनाच नेत्रदानातून दृष्टी मिळू शकत नाही, परंतु त्यातील 30 लाख जणांना नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकते, पण आपल्या देशाला वर्षाला केवळ 25000 ते 30,000 जण नेत्रदान करतात. यासाठी या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात जागरुकता निर्माण झाली पाहिजे असं या क्षेत्रात काम करणारे श्रीपाद आगाशे सांगतात.

नेत्रदानाला इतका कमी प्रतिसाद का मिळतो?
ज्या घरात एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, तिथे लोकांना वाटतं की, आता कुठे फोन करायचा? मग वेळ जाणार? आपल्या माणसाला निधनानंतर आता यातना नकोत, परंतु खरं तर नेत्रदानासाठी फार व्याप नाहीत. जवळच्या नेत्रपेढीला फोन केला की, लगेच तिथले तज्ञ येतात. डोळे सहा तासांच्या आत काढावे लागतात. मृत व्यक्तीचं वय, कोणत्या आजाराने गेला ते कारण तसंच डॉक्टर ‘डेथ सर्टिफिकेट’ इतकंच त्यांना लागतं. 80 वर्षांपर्यंतच्या कोणत्याही मृत व्यक्तीचं नेत्रदान होऊ शकतं. काही वेळा तर फक्त कॉर्निया काढला जातो. काही वेळा काढलेले सर्वच डोळे उपयोगी पडतात असं नाही. परंतु त्यांचा उपयोग सराव किंवा संशोधनासाठी केला जातो.

इतर देशांत नेत्रदानाला कसा प्रतिसाद मिळतो?
आपल्या शेजारचा श्रीलंका हा देश या बाबतीत खूप पुढे आहे. आज श्रीलंका इतर अनेक देशांना डोळे पुरवत आहे. असं आगाशेंनी सांगितलं. त्यांच्याकडे नेत्रदान करायला अनेक जण पुढे येतात ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे मात्र 130 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. 21व्या शतकातही अंधश्रद्धा व अज्ञानाचा पगडा आपल्याकडे आहे. श्रीपाद आगाशे यांनी आतापर्यंत विविध संस्था मंडळांमध्ये 400 व्याख्यानं दिली आहेत; परंतु व्याख्यानांना गर्दी होते. व्याख्यान पटतं व आवडतंही, पण फॉर्म भरणाऱयांची संख्या फार कमी असते असा त्यांचा अनुभव आहे. तरीही गेली 37 वर्षे आगाशे नेत्रदानाविषयी जागरुकतेचं काम करत असून आतापर्यंत 10,000 जणांकडून त्यांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून घेतले आहेत, तर 500 नेत्रहीनांच्या जीवनात प्रकाशाची पहाट त्यांनी आणली आहे.

10 जूनला दृष्टिदान दिवस असतो व 14 जूनला रक्तदान दिवस असतो. हे दिवस नुसते साजरे करण्यापेक्षा आज गरज आहे ती या दानाविषयी जागरुकता निर्माण करण्याची. प्रत्येकानं निसर्गाकडून मिळालेलं हे अवयवाचं दान केलं तर निसर्गानं ज्यांच्या पदरात हे दान टाकलं नाही त्यांना जीवनदान मिळेल हे नक्की.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या