कवितीक!

>> शिल्पा सुर्वे, shilpa.surve६@gmail.com

अमोल मटकर असाच एक कवी मनाचा माणूस. त्याने त्याच्या आयुष्यात घडणाऱया छोटय़ा छोटय़ा गोष्टींची कविता केलेय. ’गोष्ट कवितेची’ (www.goshtakavitechi.com) या वेबसाईटवर अमोलच्या कविता
वाचावयास मिळतात.

आपल्या रोजच्या आयुष्यात छोटे मोठे प्रसंग, गोष्टी घडत असतात. कधी आपण त्या विसरून जातो, तर कधी हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवतो. बऱयाचवेळा हृदयाच्या गोष्टी हृदयातच राहतात. पण एखादी कवी मनाची व्यक्ती असेल तर त्याच्या गोष्टींना संवेदनशीलतेचे अलवार पंख लाभतात आणि गोष्टीची कविता बनून जाते. ही कविता पावसाच्या सरींसारखी बरसते आणि चिंब चिंब भिजवून टाकते. अमोल मटकर असाच एक कवी मनाचा माणूस. त्याने त्याच्या आयुष्यात घडणाऱया छोटय़ा छोटय़ा गोष्टींची कविता केलेय. ‘गोष्ट कवितेची’ (www.goshtakavitechi.com) या वेबसाईटवर अमोलच्या कविता वाचावयास मिळतात. यंदाच्या पावसात काव्यप्रेमींसाठी हा हटके नजराणा जणू.

अमोल मटकर हा व्यवसायाने ग्राफीक डिझायनर. कविता हे त्याचे वेड. तो कविता लिहित राहिला, त्याने कधी कवितेचे पुस्तक प्रकाशित केलेले नाही. पण लिहिलेलं कुठेतरी एकत्र असावं, असे खूप दिवसांपासून त्याच्या मनात होते. त्यातूनच ‘गोष्ट कवितेची’ या वेबसाईटचा जन्म झाला. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे तर ‘भावनांच्या गाठोडय़ात जपली होती, कविता गोष्टीतच दडली होती.’ अमोलला गोष्टीतील कविता सापडली. अमोल सांगतो, कविता सुचण्यामागे एक गोष्ट असतेच. ती गोष्ट कळली तर कवितेचा, चारोळीचा गोडवा अधिक वाढत जातो.

‘गोष्ट कवितेची’ या वेबसाईटवर सध्या अमोलच्या सुमारे २५ कविता आहेत. या कविता डाऊनलोड करून वॉल पिक किंवा कव्हर पिक अशा स्वरूपात आपण वापरू शकतो. यातील काही कवितांचा आस्वाद इथे घेऊयात.
गोष्ट ः मित्रांच्या बिल्डींगच्या गच्चीत बसलो होतो. तो ब्रेकअपची गोष्ट सांगता होता. मी चंद्र पहात होतो. चंद्र थोडा झुकून ब्रेकअपची गोष्ट ऐकतोय की काय असं वाटलं. मग फक्त ब्रेकअप झालेल्या मित्राच्या जागी स्वतŠला ठेवलं आणि या ओळी सुचल्या.

‘चंद्रही जरासा झुकला चांदणे ओलावले
आसवे टिपण्यास माझी नभ पुढे सरसावले’

गोष्ट ः पावसात बाईक थोडी स्कीट झाली. पडता पडता वाचलो. एकीकडे गाडी पडताना वाचली आणि दुसरीकडे ही चारोळी सुचली…

‘आज मी भिजलो जरासा
पाय थोडा घसरला
अंतरी मृदगंध आणि
पावसाळा पसरला…’

एका मंदिरात गेलो होतो. खूप रांगते उभा राहिल्यानंतर सभामंडपात प्रवेश मिळाला. तिथे चित्र वेगळंच होतं. देणगी आणि देणाऱयांच्या देणगीच्या रकमेवरून त्यांची रांग ठरत होती व प्रसाद वाटला जात होता. आधी या ओळी टाईप केल्या आणि नंतर दर्शन घेतले.

धार्मिकांच्या भावनांचा व्याप जेव्हा वाढला,
विश्वव्यापक देव आम्ही पावतीवर फाडला

शनिदेवाचा चौथरा ’बाई’च्या स्पर्शाने अपवित्र झाला म्हणून गाईच्या दुधाने त्याचे शुद्धिकरण केले. गाईच्या म्हणजेच बाईच्याच ना… किती ही विषमता?

धर्म भिजव या जरा
मतिच्या दुधाने,
देवळातील तामणाला
विषमतेचा वास येतो…

युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करणारा हा कवी फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल माध्यमांवर व्यक्त होणे अधिक पसंत करतो. वहीच्या मागच्या पानावरच्या ओळी सर्वांसमोर आणण्याची संधी सोशल मिडीयामुळे मिळाली, असे सांगतो. गोविंद फणसेकर या वेबसाईट डिझायनर मित्राने त्याला वेबसाईट तयार करून दिली. या वेबसाइटचे लाँचिंग शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले. स्वतः ग्राफीक डिझायनर पेशा असल्यामुळे प्रत्येक कवितेची कॅलिग्राफी किंवा चित्रे अमोलनेच काढली आहेत. अमोल म्हणतोय, या कविता वाचा, सेव्ह करा, पोस्ट करा. मुख्य म्हणजे गोष्टीची कविता बनवायला शिका… तुम्हीही. मजा येते, एकदा अनुभवून पहाच.