शिरीषायन : मी माझं मला

>> शिरीष कणेकर

नऊ वर्षांपूर्वी ‘मी माझं मला’ हे माझं आत्मचरित्र बाजारात आलं आणि मागेच संपलं. (यालाच वाचकांच्या उडय़ा पडल्या असं म्हणण्याचा प्रघात आहे. हे उडय़ा मारणारे वाचक असतात तरी कुठं?) नवीन आवृत्ती काढायचं घाटतंय. मी तोच जुना, आवृत्ती मात्र नवीन.

गेल्या नऊ वर्षांत माझ्या आयुष्यात जे काही बरंवाईट घडलं असेल त्याचा समावेश या नव्या आवृत्तीत करायला हवा का? वाचकांना पुरेसं भोगायला लावलंय, त्यात आता ही सटरफटर भर कशासाठी? पार्टीतील मुख्य पदार्थ सांगितल्यावर चटण्या-कोशिंबिरी कोणी सांगत बसतं का? परंतु आत्मचरित्र येऊन गेल्यानंतर आयुष्यात घडलेल्या गोष्टी, बदलतं वातावरण, मनातील विचारांची वावटळ यांना सटरफटर ठरविणारा मी कोण? उदाहरणार्थ, गेल्या नऊ वर्षांत माझे काही संबंध पराकोटीचे बिघडलेत, विकोपाला गेलेत. सुधारण्याला आता वाव नाही, इच्छाही नाही, पण मी त्याबद्दल अवाक्षरही लिहिणार नाही. माझ्या हातात पेन आहे म्हणून मी लिहायचं, माझी बाजू मांडायची. समोरचा निःशस्त्र आहे. त्यानं काय करायचं? असली एकतर्फी युद्धे जिंकण्यात मला स्वारस्य नाही. समोरचा शत्रू सर्व पातळय़ांवर समान हवा. खालच्या पातळीवरच्या माणसाशी दोन हात सोडा, पण साधं संभाषणही मला जिवावर येतं…

माझ्या आत्मचरित्रात लग्न, पत्नी व संसार यांच्याबद्दल लिहिताना मी हात खूपच आखडता घेतल्याची कुजबुज माझ्या कानावर आली. त्यात तथ्य आहे. विख्यात क्रिकेट समीक्षक सर नेव्हिल कार्डस् ‘ऑटोबायोग्राफी’ या साध्या नावानं लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात म्हणतो, ‘माझ्या वैवाहिक जीवनावर लिहायला मला करंगळीचं नखही पुरेल.’
मला नखही जास्त होईल. जागा उरेल.

असं म्हणतात की लग्न करा किंवा करू नका, पश्चात्ताप अटळ आहे. तरीही वाटतं की, मी लग्न करायला नको होतं. आय अॅम नॉट मॅरिंग टाइप. लग्न हे दुसऱया व्यक्तीशी करायचं असतं हे मी कसं विसरलो? स्वतःवर पाचसात माणसांचं प्रेम करणाऱयानं हा जुगार खेळता कामा नये. पण ज्याच्या गवऱया स्मशानात जाऊन वाट बघत खोळंबल्यात त्याला इतक्या उशिरा उपरती होण्याला काय अर्थ आहे? मी सज्जन, सन्मार्गी, निर्व्यसनी, पापभिरू व घरकाsंबडा आहे एवढय़ामुळे लग्न यशस्वी करू शकेन अशी जर माझी अटकळ असेल तर ती साफ चुकीची होती. माझ्या अपेक्षा अवाजवी होत्या का? सद्गुणांपेक्षा दुर्गुणांना मी जास्त महत्त्व दिलं का? संवेदनशीलता ही मी माझी मक्तेदारी धरून चाललो होतो का? समोरच्या व्यक्तीची कुवत ओळखून ‘अॅडजस्ट’ होणे जर मला जमणार नसेल आणि हटवादीपणे वर्षानुवर्षे कुढत बसणार असेन तर माझा बुद्धिमत्तेचा व एकूणच माज पह्ल ठरत नाही का?

माझी थोरली मावशी इंदूताई एकदा बोलून गेली होती त्याप्रमाणे खरंच मी स्वतःला ‘मिझरेबल’ करून घेत होतो? मी दुःखी असतो तेव्हाच सुखी असतो. दुःखाचा चतकोर तुकडा पुढय़ात ओढून घ्यायचा आणि दिवसांमागून दिवस तो कुरतडत बसायचा. वॉलोइंग इन सेल्फ पिटी! आईवडील, एखादी बहीण असती तर कदाचित मी वेगळा घडलो असतो. माझ्यातील अनावर तुफानाला कुठेतरी मायेचा किनारा मिळाला असता. माझ्या कायम उपसलेल्या तलवारीची धार थोडी बोथट झाली असती. काय सांगावं, तलवार काही काळ खुंटीवर अडकवून ठेवावी असंही मला वाटू शकलं असतं, पण ते होणे नव्हते. माझी मुलं माझी कटू मानसिकता निश्चित बदलू शकली असती, पण त्यांच्या आगमनापूर्वीच माझ्या मनातील ही कटुतेची वीण घट्ट झालेली होती. त्यांनी ती थोडीफार सैल नक्कीच केली. माझ्या वडिलांनंतर मी त्यांच्यावरच माया केली. ती नसती तर मी वेडय़ांच्या हॉस्पिटलात जाऊ शकलो असतो. अण्णा असते तर म्हणाले असते, ‘मिस्टर शिरीष, काहीतरी बडबडू नका.’ आता कसं सांगू अण्णांना की अण्णा, तुमच्या जाण्यापासूनच ही घसरण सुरू झाली. नियती विकटपणे म्हणाली की, हिंमत असेल तर थांबवून दाखव ही रसातळाला घेऊन जाणारी घसरण…

आता वाटतं, माझं सबंध आयुष्यच घुसमटलेलं व वाईट गेलं. लौकिकार्थानं माझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असे म्हणता येणार नाही. पण माझं दुःख, माझा एकटेपणा, मनातील कटुता मला चिरडून टाकायला पुरेसे होते. माझ्या मनाची रोज होत असलेली हत्या मी उघडय़ा डोळय़ांनी बघत होतो. माझ्या नकळत माझ्या मनाला अनिष्ट पंगोरे पडत होते. आजचा शिरीष कणेकर घडत होता. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याच्या काळात मी भाबडय़ा आईवेगळय़ा मुलाचा कडूशार काढा झालो होतो. लहानपणी मी खूप लाघवी होतो असं सांगतात. मग वाटेत कुठं हरवला हा लाघवीपणा? जनरल कडवटपणानं सोन्यासारख्या कोमल भावनांचा चेंदामेंदा केला.

माझ्या आत्मचरित्रात (पक्षी ः ‘मी माझं मला’) मी काही शिताफीनं लपवलंय का? नाही बाबा. एका छळणाऱया फुकटय़ा मित्राला चहातून दोन जुलाबाच्या गोळय़ा घातल्या होता, हे कथनाच्या ओघात सांगायचं राहून गेलं होतं. त्यात शिताफीनं सोडा, नुसतंच लपवण्यासारखंही काही नव्हतं. गोळय़ांनी आपलं काम चोख बजावलं हे कळल्यावर माझ्या मनात परम संतोष झाला होता एवढं बाकी खरं.

हे आणि असंच राहून गेलेलं बरंच काही चरित्राच्या पुढल्या आवृत्तीत घालू का? जाऊ दे, कशाला उगीच पृष्ठसंख्या वाढवत बसू? त्यापेक्षा आहे त्या आवृत्तीवरच थोडे संस्कार करीन म्हणतोय. माझ्यावर संस्कार असतील नसतील, पुस्तकावर करायला हवेत.

[email protected]