तुला ‘छळते’ रे!

107

>> शिरीष कणेकर

एखादी शपथ मोडली तर काय होतं? पुढल्या जन्मी माणूस वटवाघूळ होतो म्हणे (म्हणजे सध्या जी वटवाघळं आहेत ती मागल्या जन्मी माणसं होती? राममंदिर उभं करण्याच्या शपथा घेणारेही पुढल्या जन्मी वटवाघूळ होणार? बाप रे, या रेटनं आपल्या देशात माणसांपेक्षा वटवाघळांची संख्या वाढणार तर! अन् आपण मिशीवर ताव मारत म्हणणार की, जगात आमची वट (वाघळं) वाढल्येय…)

‘तुला पाहते रे’ या आचरट मालिकेविषयी पुन्हा लिहिणार नाही असं मी म्हणालो होतो, शपथ घेतली होती. आज मी ती मोडतोय. वटवाघूळ होईन ना? होऊ दे. या मालिका उलटं लटकून बघितल्या तरी काय फरक पडणार आहे?

चाळिशीतला नायक व त्याच्या निम्म्या वयाची विशीतली नायिका यांचं (गाढ, निस्सीम व दिव्य) प्रेम हा टवाळीचा, कुचेष्टेचा व विनोदाचा विषय झालाय. काय तर म्हणे ते हनीमूनला जातील तेव्हा दोघांना मिळून एकच तिकीट पडेल. तो ज्येष्ठ नागरिक म्हणून त्याला अर्धे आणि ती अल्पवयीन म्हणून तिला अर्धे, मिळून एक तिकीट.

मोठय़ा वयाच्या पुरुषानं लहान वयाच्या स्त्रीशी लग्न करणं हे कॉमन नसेल, पण त्यात अघटितही काही नाही. दिलीप कुमार व सायरा बानू यांच्या वयात किती अंतर आहे? (दिलीप कुमारचा घरोबा असता तर त्यांनी सायराचा पाळणाही म्हटला असता) बायको मोठी व नवरा लहान अशीही उदाहरणं कमी नाहीत. प्रियांका चोप्रानं सौंदर्य स्पर्धा जिंकली तेव्हा तिचा नवरा निक जोन्स प्राथमिक शाळेत होता (तो हिंदुस्थानात असता तर प्रियांका त्याला शाळेत सोडायला व आणायलाही गेली असती). तेव्हा नवरा व बायकोतील (पक्षी ः विक्रम व ईशातील) वयाचं अंतर हा काही मोठा इश्यू नाही. येता-जाता त्यावर कोरडे ओढण्याचं कारण नाही. त्यानंतर ते काय व कसं दाखवतायत, हा प्रश्न आहे. इथे माझा मालिकेशी व वाहिनीशी उभा दावा आहे.
मी कानोसा घेतला असता मला कळले की, ‘तुला पाहते रे’ ही मालिका दर्शकांत चांगलीच लोकप्रिय आहे (एखादी मालिका लोकप्रिय ठरणार असली तर तिचं नाव ‘तुला पाहते रे’ऐवजी ‘एक प्लेट बटाटावडा द्या’ असं ठेवलं असतं तरी काही फरक पडला नसता). मला खुपणाऱया, खटकणाऱया व आचरटपणाच्या वाटणाऱया गोष्टी मालिकेवर खूश असणाऱयांना खुपत व खटकत नाहीत हे कसं काय? पण त्यांची जर मस्त करमणूक होत असेल, ‘‘उद्या विक्रांत – ईशाचं लग्न आहे’’ असं बापडय़ा नसलेल्या बाया एकमेकींच्या कानात फुसफुसत असतील तर त्यांना इतर गोष्टींशी करायचंय काय? ना देणं ना घेणं. चला रे, ईशा अंबाडीची भाजी, तोंडल्याची कोशिंबीर व घोसाळय़ाची भजी करणार आहे. या सगळय़ा प्रिय गोष्टी आईसाहेब स्वतः पूर्वी का करत नव्हत्या? करत असल्या तर सोडून का दिलं? सगळय़ा कुटुंबाला त्या चोथा का खाऊ देतात? पोळीचा लाडू म्हटल्यावर नुसते डोळे मोठे करून काय होतंय? त्यांनी बनवलेली पंचपक्वान्ने म्हणजे फक्त भाजी का? बॉबी तेवढीच वाढताना दिसतो. अब्जाधीश सरंजामेंच्या घरात सदाशिवपेठी कोकणस्थी कारभार आहे काय?

प्रत्येकाला आयुष्यात एक मायरा कारखानीस भेटायला हवी. साडेतीन हजार कोटींचा व्यवसाय ती एकहाती सांभाळते. विक्रांतवर छुपं प्रेम करते. ईशाचा उघड तिरस्कार करते. विलास झेंडेंशी गुफ्तगू करते. झेंडे फक्त जाकीट बदलतात. ते विक्रांत व मायरा यातल्या नक्की कोणाच्या बाजूनं असतात हे त्यांनाही कळत नाही. त्यांच्या जाकिटाच्या रंगावरून त्यांची भूमिका ठरत असावी. किती छान की नाही? विक्रांत इतका शांत, समंजस, विचारी, धोरणी दाखवलाय, तर मग तो सगळं जग सोडून त्याच्या (व अर्थातच ईशाच्या) लग्नाची संपूर्ण जबाबदारी मायरावर का टाकतो? जैसे उसका दिल कोई दिलही नहीं… साडेतीन हजार कोटींचा बिझनेस असलेल्या विक्रांत सरांच्या ऑफिसात जेमतेम पाच-सात लोकांचा स्टाफ असतो, तेही नसतील तरी चालेल. मायरा आहे ना? ती तर ऑफिसात बसून कर्जतच्या विक्रांत सरांच्या बंगल्यात कुठल्या भाज्या आणल्या जाव्यात हेही ठरवते. तिनं जेवणाचा चार्टच बनवला. विक्रांत सरांच्या पायजम्याची नाडी तुटली तर ती कशी व कोणी घालायची हेही मायरानं लिहून ठेवलं असणार. त्यानंतरही विक्रांत सरांना मायरा ही योग्य जोडीदारीण वाटू नये हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता व वाहिनीवाले यांचा दुष्टावा.

ताजा कलम – एखाद्या आगामी एपिसोडमध्ये विक्रम, ईशा, आईसाहेब, जयदीप, सोनिया, बाबा निमकर, मंदा व बॉबी मिळून मायरा व झेंडे यांचं थाटात लग्न लावून देतील. नवऱयाचे जोडे पळवतात तसे इथे नवऱ्याचे जाकीट पळवले जाईल. ते घालून माहीमकर खोकत बसतील.

कल्पनेची आयडिया कोणाची?
– नोकरीला लागल्या लागल्या घाडचूक केल्याबद्दल विक्रम गाडीत ईशावर सॉल्लिड डाफरतो. ती रडायला लागते (काय करायचं कळलं नाही की रडायचं असं तिला सांगण्यात आलं असावं. ती रडताना जास्त वाईट दिसते की हसताना हेच मला कळत नाही. तिचं सगळंच आवडायला विक्रम सर व्हायला लागेल). त्यानंतर काही सेकंदांतच चिडलेल्या नवीन बॉसच्या खांद्यावर डोकं ठेवून ती झोपते. ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका!

– टाटा-बिर्ला-अंबानी यांच्यासारखा अवाढव्य कारोबार असलेल्या विक्रांतच्या टोलेजंग ऑफिसात महत्त्वाचे कागदपत्र ठेवायला एक ‘सेफ’ नाही. जयदीप महत्त्वाचे टेंडरचे कागद ईशाला घरी नेऊन ठेवायला व दुसऱया दिवशी ऑफिसात घेऊन यायला सांगतो. ती ओटय़ावर ठेवते. ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका!

– जालिंदर हा खलनायक मस्त आहे. तो काहीच करत नाही. तो (झेंडेला) भोः करून घाबरवतो व गायब होतो. नूतन परिणित ईशाला तो चाफ्याची फुलं भेट म्हणून पाठवतो व विक्रमची तंतरते. ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका!

– सज्जन, सरळमार्गी, पापभिरू ईशाचा बाप अरुण निमकर याला देवळाबाहेरच्या भिकाऱयांच्या रांगेत बसवलंय ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका.

– विक्रम-ईशाच्या लग्नाची पत्रिका दीड लाख रुपयांची असते. मुख्यमंत्र्यांबरोबर ऊठबस असणाऱया माणसाच्या लग्नाला वीस-पंचवीस माणसं बोलावलेली असतात. लग्न साधं आणि पत्रिका दीड लाखाची? मुलीला लावायची हळद देशातून व परदेशातून कुठून कुठून (मायरानं) आणलेली असते. ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका!

– जालिंदर त्याच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी विक्रमला बाहेर जाऊ देण्यात येत नाही व त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येते. मग पिझ्झा घेऊन येणारा ‘डिलिव्हरी बॉय’ थेट त्याच्यापर्यंत कसा पोहोचतो? ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका!

– लग्नाच्या दुसऱया दिवशी सकाळी ईशा उठते ती तशीच विक्रमने बनवलेली कॉफी प्यायला बसते. चाळीत आयुष्य गेलेल्या ईशावर उठल्यावर दात घासण्याचे संस्कारही नाहीत? ही भन्नाट कल्पनेची आयडिया कोणाची? ए, सांगा ना, लाजू नका!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या