करमणूक नको, पण मालिका आवरा


 • शिरीष कणेकर

टी.व्ही.वरच्या मराठी मालिका बघता? बघा – बघा. यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. डोकं फिरलं तर मला सांगू नका. माझं आधीच फिरलंय. डोकं घरी ठेवून बघा असं म्हणण्याची पद्धत आहे. पण इथं डोकं आणि आपण दोघंही घरीच असतो. यालाच घरमे घुसके मारना म्हणतात. आपण पाकिस्तानी असतो तर टी. व्ही. फोडला असता. आता काय करणार? देव पाण्यात बुडवून मालिका संपायची वाट बघायची. ती संपता संपत नाही. आपण भ्रमिष्ठासारखे वागायला लागतो पण यांना ढिम्म नसते. शेवटी टी. आर. पी. रसातळाला गेल्यावर मालिकेचे नैसर्गिक मरण ओढवते. दुसऱ्या कुठल्याही निधनानंतर लोकांना एवढा आनंद होत नसेल. डोक्यावर घेतलेल्या मालिका शेवटी पायदळी तुडवून जाऊनच निजधामाला जातात. त्यातले घरोघरी पोहोचलेले गाजलेले कलाकार रातोरात विस्मृतीप्राय होतात. सांगा ‘शशांक केतकर कोणी हा पाहिला?’ राष्ट्रीय गुपित असल्यागत कलाकारांची नावं लपविली जातात. त्यामुळे ते बिननावाची राहतात व बिननावाचे विसरले जातात.

kahe-diya-pardes-zee-marathकाही मालिका त्यातल्या आचरटपणामुळे लक्षात राहतात. एका मालिकेत कॅरमबोर्डसारखं किंवा अंडयासारखं गुळगुळीत टक्कल असलेल्या वैभव मांगलेला स्त्रीभूमिकेत खपवण्याचा अघोरी प्रयत्न करण्यात आला होता. (अशाच प्रकारे बिन्नी पितापुत्रांना अष्टपैलू खेळाडू म्हणून हिंदुस्थानी संघात घुसवण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यात आले होते.) खोटे केस लावून कितीही मेक-अपची पुटं चढवली तरी वैभव मांगले हा तरुण, सुंदर स्त्री दिसेल का? (मग दीपक शिर्के काय वाईट होता?) नायक अशोक शिंदे वैभववर लट्टू होतो? आम्ही टी. व्ही.वर केळ्याची सालं, अंड्याची टरफले, उसाचा चोथा फेकू शकत नाही याचा किती फायदा घ्याल? अरे, वर जाऊन देवाला तोंड दाखवायचंय ना? की वाहिनीचा बॉस हाच तुमचा देव आहे? प्रेक्षक नावाचा जागृत देव तुम्ही मानतच नाही असं दिसतंय. हा देव धरून धोबी पछाड घालून आपटेल तेव्हा कळेल. चला, सनी लिऑनला लता मंगेशकरची भूमिका द्या. आता तेवढंच राहिलंय. अबू सालेम बाबा आमटेंची भूमिका करेल का? मेंदू पार्श्वभागात असला की काहीही करायला काहीही वाटत नाही.

majhya-navryachi-bayko-zeeआता मी जातीनं एका महामालिकेची निर्मिती करतो. तिच्यात ‘बाहुबली’, ‘हम आपके है कौन’, ‘चालबाज’, ‘धूलका फूल’ व ‘तुझं आहे तुजपाशी’ हे नाटक यातलं काय घेऊन खुबीनं जोडून मी ‘मालगाडी’ नावाची सुपर हिट मालिका काढीन. म्हणजे कसं बघा. कटप्पा बाहुबलीला मारायला येईल आणि तक्षणी माधुरी दीक्षित ‘दीदी तेरा दिवाना’ गात नाचेल. नाच बघायचा की बाहुबलीचा खातमा करायचा या संभ्रमात कटप्पा पडेल. यात पंचवीस एपिसोडस् मी आरामात काढीन. दरम्यान कटप्पा व बाहुबली करणारे दोन्ही कलाकार बदलले जातील. (संदर्भ – ‘खुलता कळी खुलेना’मधले गीता व मोहन.) मध्येच श्रीदेवी मालिका सोडून गावी जाऊन राहील. (संदर्भ – ‘खुलता कळी खुलेना’ मधली आजी) मध्येच सहा सहा महिने ‘काकाजी’ कुस्तीच्या नावाखाली अंतर्धान पावेल. (संदर्भ – ‘काहे दिया परदेस’ मधला छुट्टन.) राजेंद्रकुमारपासून दिवस गेलेली माला सिन्हा अशोककुमारशी लग्न करते. (संदर्भ – ‘खुलता कळी खुलेना’ मधली मोनिका)…

naktichya-lagnala-yaycha-ha

मला वाटतं या मालिका सुरू होतात तेव्हा त्यांनी जेमतेम सहा महिन्यांची बेगमी केलेली असते. पण प्रेक्षकांना मालिका चक्क आवडायला लागते. आली का पंचाइत? पुढे काय दाखवायचं? मग संबंधित प्रत्येक जण घरून बादली बादली पाणी आणतो व ते मालिकेत सोडतो. मग ती किती का पाणचट होईना. मालिकेच्या कथेशी संबंध नसलेले नवीन ‘ट्रक’ सुरू हातात. आपण काय (व का) बघतोय हेच कळेनासं होतं. ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेत जान्हवी किती एपिसोड मोटार चालवायला शिकत असते सांगा. मला तर वाटलं की मालिका आटोपल्यावर ही सगळी मंडळी ‘मोटर ड्रायव्हिंग स्कूल’ काढणार असावीत व त्याची रिहर्सल चालली असावी. तुम्ही पाहिलंत का जान्हवीला कुठं ‘ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर’ म्हणून? ‘ती सध्या काय करत्येय?’ विचारण्याचे दिवस आलेत. मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता ही आळवावरच्या पाण्यासारखी असते. आज आहे, उद्या नाही. ‘ए काहीही हं श्री’ काल होता, आज नाही. त्यांना अफाट लोकप्रियता कशी पचली असेल? अन् सध्याची घोर उपेक्षा ते कशी पचवत असतील? ‘नांदा सौख्यभरे’ व ‘पसंत आहे मुलगी’ यातील नायक-नायिका कोण होते? ते कुठं गेले? लोकप्रियता इतकी क्षणभंगूर असते?…

 

lagir-jhala-jiलेखकांना दिग्दर्शक ऑर्डरी सोडतो. दिग्दर्शकाला निर्माता सुनावतो. निर्मात्याला वाहिनीप्रमुख नजरेच्या धाकात ठेवतो. वाहिनीप्रमुख ‘मार्केटिंग’वाल्यांच्या तालावर नाचतो. एवढ्या अडथळ्यांची शर्यत पार करून येणारी मालिका खिळखिळी झाली नाही तरच नवल. मला कोणीतरी सांगत होतं की आपल्या मराठी मालिका परवडल्या इतक्या हिंदी मालिका वाईट असतात. म्हणजे मालिकांचे तीन प्रकार असतात. फार वाईट, फारच वाईट व फार्फार वाईट! ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यातल्या कुठल्या प्रकारात मोडते तुमचं तुम्ही ठरवा. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ला टी. आर. पी. रेटिंग चांगलं आहे म्हणे. ते खरं असेल तर बघणाऱ्यांची तीच योग्यता आहे असे खेदानं म्हणावं लागेल. प्रेक्षकांना – विशेषतः स्त्रीवर्गाला लफडेबाज गुरुनाथचा राग येत नाही तर चवचाल बिनलग्नाची बायको शनाया हिचा राग येतो. पुरुषी वृत्ती गृहीत धरून चालणे ही स्त्रीयांची मानसिकता आजच्या युगात अस्वस्थ करते.

हिंदी मालिकांतून झाडू-पोता करणारी शांताबाईही दागिन्यांनी मढलेली असते. ती घरकामासाठी समजा स्वतःच्या मालकीच्या मर्सीडीज गाडीतून आली तर कोणाच्या का पोटात दुखावं? पु.लं.चं स्वप्न होतं की प्रत्येक रंगभूमी कलाकाराकडे गाडी असावी. एकता कपूरचं असं स्वप्न असेल की प्रत्येक कामवालीचा अंबानीच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट असावा व तिनं ‘बिझनेस क्लास’नं विमानप्रवास करावा. गरीबांनी गरीबच राहावं हा कसला विकृत अट्टहास? प्रगतीशील देशातील समाजवादी अर्थव्यवस्थेत गरीब व श्रीमंत असे वर्गभेद असू नयेत यासाठी एकता कपूर करीत असलेले प्रयत्न स्तुत्य नाहीत का? कोणी तिचे पाय का ओढावेत? भरजरी कपडे घालून कोणी घरात वावरत असेल तर त्यात कोणाच्या बाचं काय जातं?…

‘झी मराठी’वर सध्या सुरू असलेल्या मालिकांबाबत काही जुजबी शंका-

‘माझ्या नवऱ्याची बायको’ –

 • गुरूनं ठेवून घेणं ही शनायाच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते का?
 • शनायाला दृष्ट लागू नये म्हणून राधिका कायम डोळ्यांना काजळ चोपडते का?
 • गुरुनाथ सुभेदारचा ऑफिसातला स्टाफ हा काय विनोद आहे?

‘लागिरं झालं जी’

 • सैन्यात भरती होण्याच्या आधीच अज्या असा आखडून का चालतो?
 • शीतल शिकल्येय की अडाणी आहे?
 • रावल्या एकदम स्लो-स्लो बोलतो तो मालिका लांबवण्यासाठी का?

‘खुलता कळी खुलेना’

 • ज्या घरात इतका जीव अडकलाय ते घर सोडून आजी गावी का गेली? ती तात्पुरती गेली की कायमची गेली?
 • मानसीचे आजी-आजोबा काहीही कारण नसताना उठून गावी का गेले? त्यांची नक्की कोणाला अडचण होत होती?
 • विक्रांतचं ‘डिप्रेशन’ सोयीस्करपणे आलं व सोयीस्करपणे गेलं का?
 • चेहरा पाडून घनघोर चर्चा करण्यापलीकडे विक्रांत काय करतो?
 • मोनिकापुढे सर्व पात्रं हतबल का होतात?

‘काहे दिया परदेस’

 • नंबर एकचा पेद्रट असलेला शिव गौरीला कायम धीर कशाच्या बळावर देत असतो?
 • गौरी समोर आली की तिच्याशी प्रेमालाप करणे एवढंच त्याला काम आहे का?
 • अनेकदा दात घशात गेल्यावरही कशाच्या आधारावर तो तोंड उचकटतो?
 • गौरीचा द्वेष करणे व तिचे घरातून उच्चाटन करण्यासाठी कटकारस्थान करणे हा एककलमी कार्यक्रम अम्माच्या आयुष्यात आहे काय?
 • निशाला नक्की काय हवंय?

‘नकटीच्या लग्नाला यायचं हं..’

 • तो वाडा पडण्याची वाट पाहत थकायला झालंय.
 • एवढी लग्न ठरली नाहीत याची ‘नकटू’ला जराही खंत कशी नसते? दर वेळी नवीन उखाणा तयार करण्याचा उत्साह ती कुठून आणते?
 • मराठी चित्रपटसृष्टीतले ‘नवरे’ संपल्याशिवाय मालिका संपणार नाही का?

‘चूकभूल द्यावी घ्यावी’‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांबद्दल जागेअभावी लिहिता येत नाही. क्षमस्व.

[email protected]